सुश्री मंजुषा सुनीत मुळे
संपादकीय ३१ जानेवारी २०२२
प्रा.श्री. श्रीनिवास रघुनाथ कावळे
आज ३१ जानेवारी — खात्रीशीर आधार असल्याशिवाय मोघम विधाने करायची नाहीत, या शिस्तीचे काटेकोर पालन करणारे लेखक प्रा.श्री. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचा आज स्मृतिदिन. ( १३/९/१९३० – ३१/१/१९९० ).
पुण्याच्या स.प.महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री. कावळे यांनी, ‘ सुगम तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती ‘, सामाजिक मानसशास्त्र ‘, तर्कशास्त्र ‘, ‘ पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिंतन ‘, यासारखे वाचकाला विचार-प्रवृत्त करणारे ग्रंथ लिहिलेले आहेत.
“ डॉ. श्री. र. कावळे : व्यक्ती आणि विचार “ या स्मृतिग्रंथात असलेल्या एकूण तीस लेखांपैकी एकवीस लेख श्री. कावळे यांनी लिहिलेले आहेत, ज्यातून त्यांची चिंतनपद्धती, तात्विक भूमिका आणि लेखनशैली स्पष्टपणे लक्षात येते. उरलेले नऊ लेख त्यांच्या स्मरणार्थ लिहिलेले आहेत.
त्यांचे वैशिष्ट्य हे की, “ मलावरोध : प्रतिबंधक उपाय “, “ निसर्गोपचारातील आहार आणि उपवास“, “ योग आणि मानसिक उपाय “, यासारखे त्यांचे लेखन म्हणजे, एका तत्वज्ञाच्या पठडीत न बसणारे साधे विषयही तात्विक पातळीवर कसे हाताळता येतात, याचे उत्तम उदाहरण आहे.
त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रणे —- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, प्राचार्य प्र. रा. दामले . याखेरीज, ‘ गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य ‘, आणि ‘ M.N.Roy and J.P. on social Change ‘, ही पुस्तके: आणि, ‘ श्री समर्थांचे मनाचे श्लोक ‘, गुरुदेव रानडे : ग्रंथ परिचय ‘, ज्ञानेश्वरीतील अध्यात्म ‘, ‘ शैक्षणिक प्रबोधन आणि स्थानिक स्वराज्य संस्था ‘ अशी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांना आदरांजली वहाणारीही नऊ-दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
“ देवमाणूस “ म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या श्री. श्रीनिवास कांबळे यांना विनम्र अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवी श्री. नारायण रामचंद्र मोरे उर्फ कवी अशोक
“ कवितेस प्रणयपत्रिका “ या आगळ्यावेगळ्या विषयावरची कविता ‘ कवी ‘ म्हणून ज्यांना ओळख देऊन गेली, ते कवी श्री. नारायण रामचंद्र मोरे उर्फ कवी अशोक यांचाही आज स्मृतिदिन. त्यानंतर अनेक मासिकांमधून त्यांच्या कविता, अनेक लघुकथा आणि कितीतरी स्फुटलेख प्रसिद्ध झाले होते. ‘ मनोरंजन ‘ मासिकाचे सहसंपादक, मग कार्यकारी संपादक, असणारे श्री. मोरे यांनी ‘ नवजीवन ‘, आणि सुवर्ण ‘, ही स्वतःची मासिके अनेक वर्षे यशस्वीपणे चालवली. वयाच्या केवळ विसाव्या वर्षी त्यांनी मुरारबाजी देशपांडे यांच्यावर “ संग्रामसिंह “ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर “ शिवशार्दूल “ ही चारचारशे पानांची दोन खंडकाव्ये लिहिली होती. शिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र काव्यरुपात लिहिण्याचा ध्यास घेऊन, त्यासाठी चौदा वर्षे अथक परिश्रम घेऊन, त्यांनी ‘ चंद्रकांता ‘ वृत्तात “ शिवायन “ हे महाकाव्य लिहिले, ज्यातील काव्यांची संख्या ८२७६ एवढी आहे. हे त्यांचे सहजसुंदर आणि ओघवत्या भाषेतले काव्य आचार्य अत्रे यांना अतिशय आवडले, आणि त्यांनी श्री. मोरे यांना ‘ महाकवी ‘ असे म्हणायला सुरुवात केली. या महाकाव्यातील बऱ्याच काव्यांना स्नेहल भाटकर यांनी सुंदर चाली लावल्या आहेत.
ज्यांच्या या महान कामगिरीबद्दल “ शिवायन म्हणजे मोरे, आणि मोरे म्हणजे शिवायन “ अशी अत्रे यांनी जणू व्याख्याच करून टाकली, अशा कवी नारायण मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈