श्री सुहास रघुनाथ पंडित
३ डिसेम्बर – संपादकीय
बहिणाबाई चौधरी
(११ ऑगस्ट, इ.स. १८८० – ३ डिसेंबर, इ.स. १९५१)
जगण्याचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात नेमकेपणाने सांगण्या-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन.(1951).
स्वतः निरक्षर असूनही उच्च शिक्षितांनी ज्या कवितांचा अभ्यास करावा अशा कवितांच्या रचना बहिणाबाईंनी केल्या आहेत.ऐन तरूण वयात वैधव्य प्राप्त झाल्यामुळे आयुष्याला सामोरं जाऊन झुंझताना येणारे अनुभव,दिसणारं जग,भवतालचा निसर्ग त्यांनी आपल्या अहिराणी या बोलीभाषेतून कवितेत उतरवला. अहिराणी, खानदेशी आणि मराठी भाषेतून त्यांनी काव्यरचना केली आहे. त्या निरक्षर असल्यामुळे लिखित स्वरूपात त्या सर्वच्या सर्व उपलब्ध नाहीत.पण त्यांचे चिरंजीव कवी सोपानदेव चौधरी यांच्या प्रयत्नातून ज्या कविता उपलब्ध झाल्या त्या लोकांसमोर येऊ शकल्या आणि मराठी कवितेला एक अनमोल खजिना प्राप्त झाला. संसार, माहेर, शेतीची साधने, कापणी, मळणी, शेतीतील प्रसंग, सण, सोहळे हे त्यांच्या कवितांचे विषय. जे अनुभवलं ते लिहीलं त्यामुळे कसदार साहित्य निर्माण झालं.
‘आला सास,गेला सास,जीवा तुझं रे तंतर,
अरे जगन-मरन एका सासाचं अंतर’
हे शब्द असोत किंवा
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ हे शब्द ;
जगण्याची अनिश्चितता,स्त्री ची सुख दुःखे असे कितीतरी विषय त्यांनी सहजपणाने हाताळले आहेत.
‘अरे संसार संसार ,जसा तवा चुलावर’ हे गीत तर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. पण अशा कितीतरी कविता त्यांच्या ‘बहिणाबाईंची गाणी’ या संग्रहीत काव्यसंग्रहात वाचायला मिळतात.हे त्यांचे काव्य ‘फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या रूपाने इंग्रजीत जाऊन पोचले आहे.श्री.के.ज.पुरोहित यांनीही काही कवितांचे भाषांतर केले आहे.हा त्यांच्या कवितांचा सन्मान आहे.एवढेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र विद्यापिठालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.एका अशिक्षीत कवयित्रीच्या नावाने विद्यापीठ निघावे असा सन्मान जगात बहुतेक पहिलाच असेल.
जगणं आणि अनुभवणं शब्दांतून साकारणा-या कवयित्रीला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम!
☆☆☆☆☆
केशव मेश्राम :
ज्येष्ठ लेखक केशव मेश्राम यांचाही आज स्मृतीदिन आहे. परंतू दि 24/11/21च्या अभिव्यक्तीमध्ये आपण त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वविषयी जाणून घेतले आहे.म्हणून पुनरावृत्ती टाळत आहोत.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश, बहिणाबाईंची गाणी.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈