सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

राम शेवाळकर

राम बाळकृष्ण शेवाळकर (2 मार्च 1931 – 3 मे 2009) हे लेखक,वक्ते,समीक्षक होते.

त्यांनी मराठी व संस्कृत साहित्यात एम. ए. केले. त्यांनी काही वर्षे कॉलेजात संस्कृत शिकवले.25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते वणी येथील कॉलेजचे प्राचार्य होते.

शेवाळकरांनी ‘असोशी’, ‘निवडक मराठी आत्मकथा’, ‘अंगारा’ वगैरे 59 पुस्तके, समीक्षणे लिहिली.

रामायण, महाभारत या विषयांसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संत, तसेच वि. दा. सावरकर, विनोबा भावे यांच्यावरही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे.

1980 मध्ये हृदयनाथ मंगेशकरांनी ‘अमृताचा घनू ‘ हा ज्ञानेश्वरांच्या रचनांवरील सांगितीक कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यात शेवाळकर ज्ञानेश्वरांच्या रचनांवर विद्वत्तापूर्ण विवेचन करत असत. रसिकांनी त्यांना चांगलीच दाद दिली.

शेवाळकर महाराष्ट्र राज्य फिल्म सेन्सर बोर्डचे  11 वर्षे सदस्य होते.

1994मध्ये पणजीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

नागपूर विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट. प्रदान केले.

त्यांना दीनानाथ मंगेशकर, कुसुमाग्रज पुरस्कार, नाग भूषण पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले.

☆☆☆☆☆

वि. द. घाटे

विठ्ठल दत्तात्रेय घाटे (18 जानेवारी 1895 – 3 मे 1978) हे शिक्षणतज्ज्ञ, लेखक व कवी होते. कवी दत्त यांचे ते ज्येष्ठ पुत्र.

वि. द. घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललित लेखनप्रकार हाताळले.

त्यांची ‘दिवस असे होते’ (आत्मचरित्र), ‘दत्तांची कविता’, ‘काही म्हातारे व एक म्हातारी ‘(व्यक्तिचित्रण), ‘नाट्यरूप महाराष्ट्र'(इतिहास), ‘नाना देशातील नाना लोक’, ‘पांढरे केस हिरवी मने’, ‘यशवंतराव होळकर’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

आचार्य अत्रे यांच्याबरोबर त्यांनी संपादित केलेली ‘नवयुग वाचनमाला’  महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तके म्हणून नावाजली गेली.

1953 साली अहमदाबादला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अनंत देशमुख यांनी वि. द. घाटे यांचे चरित्र लिहिले.

☆☆☆☆☆

हमीद दलवाई

हमीद उमर दलवाई (29 सप्टेंबर 1932 – 3 मे 1977) हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते.

महात्मा फुले यांच्या प्रभावामुळे त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

तोंडी तलाक, बहुपत्नीत्व इत्यादीमुळे मुस्लिम स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी म्हणून 1966मध्ये 7मुस्लिम महिलांना घेऊन त्यांनी मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला.

महंमद पैगंबरांचे जीवन, कुराण – हदीस याबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा होऊन त्या समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचारविचारात उदारता यावी यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता व लोकशाही ही दोन मूल्ये त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.

परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.

‘इस्लामचे भारतीय चित्र’, ‘ राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’, त्याचप्रमाणे ‘इंधन'(कादंबरी), ‘लाट'(कथासंग्रह) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत ‘हे त्यांचे चरित्र लिहिले आहे.

‘हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट’ हा लघुपट हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जानेवारी 2017मध्ये त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

☆☆☆☆☆

जगदीश खेबुडकर

जगदीश खेबुडकर( 10 मे 1932 – 3 मे  2011)हे मराठी गीतकार व साहित्यिक होते.

खेबुडकर हे पेशाने शिक्षक होते.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘मानवते, तू विधवा झालीस ‘ हे पहिले दीर्घकाव्य लिहिले. महात्मा गांधींच्या खुनानंतर खेबुडकरांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून त्यांना हे काव्य सुचले.

लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले.

संत एकनाथ, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर यांचा खेबूडकरांवर प्रभाव होता. साधेसोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी 3500 कविता आणि 2500हून अधिक गीते लिहिली.त्यांनी सुमारे  325 चित्रपटांसाठी गीते लिहिली.25 पटकथा -संवाद,50 लघुकथा,5 नाटके,4 दूरदर्शन मालिका,4 टेलिफिल्म्स, 5 मालिका गीते इत्यादी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली.

त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांएवढी मोठी होती. ग. दि. माडगूळकरांनंतर इतका मोठा गीतकार झाला नाही.त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 36 दिग्दर्शक,44संगीतकार,34 गायकांसमवेत काम केले.

1974 साली त्यांनी स्थापना केलेल्या ‘स्वरमंडळ’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘रामदर्शन’ हा रामायणावरील वेगळा प्रयोग सादर केला. त्यानंतर त्यांनी 1980मध्ये ‘रंगतरंग’ व  1982मध्ये ‘रसिक कला केंद्रा’ची स्थापना केली. ‘रंगतरंग’तर्फे सादर केलेल्या ‘गावरान मेवा’चे 2000पेक्षा जास्त प्रयोग झाले.1986 मध्ये त्यांनी नाट्यकलेच्या सेवेसाठी ‘नाट्यछंद’ व ‘अभंग थिएटर्स’ची स्थापना केली.

खेबुडकरांना 60हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांत 11वेळा राज्य शासनातर्फे मिळालेला पुरस्कार, गदिमा पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार,3 जीवनगौरव पुरस्कार इत्यादीचा समावेश आहे.

राम शेवाळकर, वि. द. घाटे, हमीद दलवाई, जगदीश खेबुडकर    यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments