श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
बाबूराव अर्नाळकर
चंद्रकांत सखाराम चव्हाण हे मूळ नाव असलेले प्रसिद्ध मराठी रहस्यकथा लेखक म्हणजेच बाबूराव अर्नाळकर! आयुष्यभर त्यांनी याच टोपणनावाने लेखन केले.
त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रीक पर्यंत झाले होते.पण वाचकांच्या सर्वख थराला आवडतील अशा 1042 रहस्यकथा लिहून त्यांनी लोकांमध्ये वाचनाची गोडी लावली. ज्या काळात ना.सि.फडके,साने गुरुजी,वि.स.खांडेकर यांचा खूप मोठा वाचक वर्ग होता,त्या काळात अर्नाळकर यांनी आपलाही एक वाचक वर्ग तयार केला होता. विजयदुर्ग किल्ल्यावरून परतताना त्यांना एक कथा सुचली.ती कथा म्हणजे ‘सतीची समाधी’.त्यांची ही पहिली कथा करमणूक मासिकातून प्रसिद्ध झाला.ज्येष्ठ लेखक नाथमाधव यांच्या वाचनात ही कथा आली.त्यांनीच अर्नाळकर यांना रहस्यकथा लिहायला प्रोत्साहन दिले.तेव्हापासून बाबूरावांनी अखेरपर्यंत आपली लेखणी रहस्यकथांसाठी वाहून घेतली.नाथमाधव यांच्याप्रमाणेच त्यांना आचार्य अत्रे,यशवंतराव चव्हाण,अनंत काणेकर,पु.ल.देशपांडे,वि.भि. कोलते यांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले.
त्यांनी 1942 च्या चळवळीतही भाग घेतला होता.तसेच स्वा.सावरकरांच्या आवाहनानुसार त्यांनी 1946 ते1948 या काळात सैन्यात काम केले होते.त्या दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा लेखन चालू ठेवले.
त्यांच्या कथा पाश्चिमात्य कथांवर आधारित असल्या तरी त्याला मराठी समाजजीवनाचे सुंदर रूप दिलेले असल्यामुळे त्या अस्सल देशीच वाटत असत.त्यांच्या प्रत्येक कथेचा शेवट ‘सत्यमेव जयते’ ने होत असे.
त्यांच्या पाचशे कथांचे लेखन झाल्यावर महाराष्ट्र शासनाने 10,000/रूपये देऊन त्यांचा सन्मान केला होता.
पोलिस अधिकारी आनंदराव, चंद्रवदन उर्फ काळापहाड, कृष्णकुमारी, चारूहास, धनंजय, छोटू, पंढरीनाथ, झुंजार, दर्यासारंग ही त्यांची वारंवार येणारी लोकप्रिय पात्रे !
त्यांच्या कथा लता मंगेशकर, बालगंधर्व यांच्याकडून रसिकतेने वाचल्या जात असत.
त्यांची काही पुस्तके: कृष्णसर्प, काळापहाड, कालकन्या, कर्दनकाळ, अकरावा अवतार, ज्वालामुखी, चौकटची राणी, वेताळ टेकडी, रूद्रावतार, भद्रंभद्र, भीमसेन, मृत्यूचा डाव, राजरहस्य, चोरांची दुनिया इत्यादी.
वयाच्या 90 व्या वर्षी 05/07/1996 ला त्यांचे दुःखद निधन झाले व मराठी रहस्यकथांचे एक पर्व अस्तास गेले.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन 🙏
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈