श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
लक्ष्मण सिद्राम जाधव (१९४१ – ५ जून २०१९)
लक्ष्मण सिद्राम जाधव हे स्टेट बॅंकेत अधिकारी होते. त्र्यं. वि. सरदेशमुख यांची कादंबरी ‘डांगोरा एका नगरीचा’ ची मुद्रण प्रत तयार करताना त्यांना खर्यात लेखनाची वैशिष्ट्ये कळली. त्यानंतर त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी ‘होरपळ’ हे आत्मचरित्रात्मक पहिले पुस्तक लिहिले. हे आत्मकथन खूप गाजले. सुनीता दागा यांनी त्याचा ‘दाह’ म्हणून हिंदीत अनुवाद केला. तोही गाजला. त्याबद्दल अनुवादिकेला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ‘पराभूत धर्म’, ‘सुंभ आणि पीळ’, ‘मावळतीची उन्हे’ आशा सरस साहित्यकृती निर्माण केल्या.
लक्ष्मण सिद्राम जाधव यांची पुस्तके –
कविता संग्रह
१. केतकीची फुले, २. गुदमरलेले शालीन जगणे, ३. परतीचे पक्षी, ४. पाथेय
किशोर कादंबरिका – तुमचा खेळ होतो पण , शूर जवान
आत्मचरित्र – सूळकाटा ( होरपळच्या पुढचा भाग )
पुरस्कार – १. महाराष्ट्र शासनाचा चा २०११-२०१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार ‘होरपळ’ साठी मिळाला.
२. महाराष्ट्र शासनाचा, दलित साहित्य अण्णाभाऊ साठे पुरस्कार, ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठी २०१४ साली मिळाला.
३. ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठीच मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार २०१५साली मिळाला.
४. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वा. म. जोशी पुरस्कार ‘सुंभ आणि पीळ’ या पुस्तकासाठी २०१५ मध्ये मिळाला.
५. सोलापूरचा, डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचा साहित्य सेवा पुरस्कार त्यांना २०१६मध्ये मिळाला.
☆ ☆ ☆ ☆ ☆
ग. ह. खरे ( १०जानेवारी १९०१- ५जून ८५ )
ग. ह. खरे हे महाराष्ट्रातले नावाजलेले इतिहास संशोधक होते. दक्षिणेतील मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र , महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनात्मक विपुल लेखन केले. त्यांनी मराठी फारसी भाषेतील, ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली.
संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. पुस्तके त्यांनी लिहिली. भारत इतिहास मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मंडळाला २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे, ३० ताम्रपट व शेलालेख मिळवून दिले.
पुणे विद्यापीठाने त्यांना १९८४ साली सन्माननीय डी. लिट. पदवी दिली. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे डॉक्टरेट पदवीसाठी मार्गदर्शक व परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.
लक्ष्मण सिद्राम जाधव व ग. ह. खरे यांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈