सुश्री मंजुषा सुनीत मुळे
५ डिसेंबर – संपादकीय
आज ५ डिसेंबर : –
ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्लेषणापासून ते बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांच्या सखोलतेपर्यंत, आपल्या अतिशय बारकाईने केलेल्या अभ्यासपूर्ण समीक्षेसाठी ख्यातनाम असलेले ज्येष्ठ समीक्षक श्री. मधुकर वासुदेव, म्हणजेच म.वा. धोंड यांचा आज स्मृतिदिन. ( ०४/१०/१९१४ –०५/१२/२००७ )
‘आपल्या अतिशय मर्मग्राही आणि धारदार लेखनाने मराठी समीक्षेच्या प्रांगणात स्वतःचा स्वतंत्र असा ठळक ठसा उमटवून गेलेले समीक्षक ‘ असे श्री. धोंड यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. कुठल्याही प्रकारच्या साहित्याची समीक्षा करतांना, त्याला अगदी मूलगामी संशोधनाची जोड असलीच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. आणि त्यामुळे साहित्याचा अभ्यास करतांना त्यांच्या चौकस मनाला अनेक प्रश्न पडत असत. आणि त्या प्रश्नांची उत्तरे सापडेपर्यंत ते थांबत नसत. त्या संदर्भातल्या ज्ञात-अज्ञात अशा सगळ्या संदर्भांचा ते चिकाटीने शोध घेत असत. असा सूक्ष्म अभ्यास करणे हा त्यांचा जणू उपजत व्यासंग होता, याची प्रचिती त्यांनी केलेल्या प्रत्येक समीक्षेत आवर्जून येते. त्यांच्या समीक्षेला साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, अशा वेगवेगळ्या अभ्यास-क्षेत्रातले संदर्भ असायचे, ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक लेखनात एक समृद्धता नक्कीच जाणवायची.
समीक्षेबरोबरच त्यांनी स्वतःही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. “ काव्याची भूषणे “ हे त्यांचे पहिले पुस्तक, ज्यात काव्यातील अलंकार व अलंकारशास्त्र या विषयावर सोदाहरण अशी
विस्तृत चर्चा केलेली आहे. “ मऱ्हाटी लावणी “ हे पुस्तक म्हणजे ‘ लावणी ‘ या वाङ्मयप्रकारासंदर्भात केलेले सर्वांगीण आणि सखोल विवेचन आहे. हा एक विशेष आणि महत्वपूर्ण ग्रंथ समजला जातो. याची दुसरी आवृत्ती “ कलगीतुरा “ या नावाने काढली गेली. कुठल्याही विषयातील त्यांच्या चिंतनाचं वेगळेपण आणि स्वतंत्रता यामध्ये प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.
“ज्ञानेश्वरी“ म्हणजे तर त्यांनी आयुष्यभर घेतलेला ध्यासच होता. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचे फक्त निरूपण किंवा भाष्य नाही, तर ती ‘ मराठी गीता ‘ आहे हे त्यांचे ठाम मत अर्थातच त्यांच्या गाढ्या अभ्यासातून प्रकट झालेले होते. ज्ञानेश्वरीला विश्वसाहित्यात मानाचे स्थान मिळणे हा मराठी भाषेचा आणि साहित्याचा गौरव असल्याचे ते अभिमानाने म्हणत असत. “ ज्ञानेश्वरीतील लौकिक दृष्टी “ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे, त्यांच्या समीक्षणाचे, विश्लेषणाचे, एक वेगळेच मर्म उलगडून दाखवणारे ठळक उदाहरण आहे असे उचितपणे म्हटले जाते. या ग्रंथाला १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.
ऐसा विटेवर देव कुठे, तरीही येतो वास फुलांना, चंद्र चवथीचा, जाळ्यातील चंद्र, ज्ञानेश्वरी–स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य, अशी त्यांची इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. इतर अनेक संतांच्या साहित्याविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. याव्यतिरिक्त, रणजित देसाईंची ‘ स्वामी ‘ कादंबरी, आणि विजय तेंडुलकर यांचे ‘ सखाराम बाईंडर ‘ यावरही त्यांनी समीक्षणात्मक भाष्य केले आहे.
“समीक्षा“ ही साहित्याची वेगळी वाट अतिशय सुशोभित आणि समृद्ध करून गेलेल्या श्री. म.वा.धोंड यांना मनःपूर्वक प्रणाम.
☆☆☆☆☆
आजपासून आम्ही चित्रकाव्य हे चित्रकार सुश्री उषा ढगे यांचे सदर सुरू करत आहोत. दर 15 दिवसांनी चित्र आणि त्याचं वर्णन करणारी कविता आपल्या भेटीला येईल.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :- इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈