सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
शांता शेळके
शांता शेळके (12 ऑक्टोबर 1922 – 6 जून 2002) या प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, लेखिका, अनुवादिका , साहित्यिका , पत्रकार व प्राध्यापिका होत्या.
आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’मध्ये 5वर्षे उपसंपादक म्हणून काम केल्यावर त्या अध्यापनाकडे वळल्या. नागपूरमधील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या.
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे.’कविता स्मरणातल्या’, ‘गोंदण’, ‘तोच चंद्रमा’वगैरेसारखे काव्यसंग्रह, ‘आतला आनंद’, ‘धूळपाटी’ वगैरे ललित लेखसंग्रह,’आंधळी’, ‘ चौघीजणी’, ‘मेघदूत’ वगैरे इंग्रजी/ संस्कृतमधून केलेले अनुवाद, ‘नक्षत्रचित्रे’सारखे व्यक्तिचित्रसंग्रह अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शांताबाईंनी असंख्य गीते लिहिली.अगदी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘खोडी माझी काढाल तर’सारखी बालगीते, ‘गजानना श्री गणराया’सारखी भक्तीगीते, ‘चांदण्या रात्रीतले ते’पासून ‘शारद सुंदर चंदेरी राती’पर्यंत, ‘शालू हिरवा पाच नि मरवा’पासून ‘मध्यरात्रीला पडे तिच्या’पर्यंत, ‘तोच चंद्रमा नभात’पासून ते ‘वादळवारं सुटलं रं ‘पर्यंत विविध प्रकारची, वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी गीते त्यांनी लिहिली आणि ती सर्व गीते रसिकांच्या पसंतीला उतरली, त्यांच्या ओठांवर रूळली.
शांताबाईंवर ‘आठवणीतील शांताबाई’, ‘शांताबाई’, ‘शांताबाईंची स्मृतिचित्रे’, ‘शब्दव्रती
शांताबाई’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.
1996साली आळंदीला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाईंनी भूषवले होते.
शांताबाईंना गदिमा गीतलेखन पुरस्कार, ‘मागे उभा मंगेश’साठी सूरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार ( चित्रपट :भुजंग), साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.
शांताबाईंच्या सन्मानार्थ शांता शेळके साहित्य पुरस्कार दिला जातो.
☆☆☆☆☆
रामचंद्र दत्तात्रेय रानडे
गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे (3 जुलै 1886 – 6 जून 1957) हे आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत होते.
कर्नाटकातील जमखंडीमध्ये त्यांचा जन्म झाला.
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी पहिली शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली.
एम.ए.(तत्त्वज्ञान)च्या परीक्षेत त्यांना ‘परीक्षकापेक्षा परीक्षार्थीला अधिक माहिती आहे’ असा शेरा मिळाला.
फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गंगनाथ झा यांच्या निमंत्रणावरून गुरुदेव रानडे अलाहाबाद विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तिथे अधिष्ठाता व कुलगुरू ही पदेही भूषवली.
गंगनाथ झा यांच्या शब्दांत ‘रानडे लौकिक व पारलौकिक अशा दोन जगात वावरत. म्हणूनच त्यांना ह्याच भौतिक जगात दिव्यानुभूती शक्य झाली.
‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’चा अपवाद वगळता त्यांनी आपले तत्त्वज्ञान कोठेही न मांडता विविध प्रदेशातील, संस्कृतीतील संतांचे साक्षात्कार अभ्यासून त्यातील साम्यस्थळे दाखवली. ग्रीक व लॅटिन भाषांच्या व्यासंगामुळे व कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील वास्तव्यामुळे मराठी, कानडी, हिंदी साहित्याच्या परिशीलनामुळे त्यांच्या चिंतनाचा परीघ विस्तारला.
गुरुदेव रानडेंनी विपुल लेखन केले. त्यातील बहुतांश इंग्रजीत आहे. ‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’, ‘ अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘द भगवदगीता ऍज अ फिलॉसॉफी अँड गॉड रिअलायझेशन’, ‘ वेदांत :द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट’, ‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतवचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’ इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
‘इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू’ हे त्रैमासिक सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांचे निंबाळचे समाधिस्थळ अध्यात्म विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन ( बेळगाव) ही संस्था त्यांचे आध्यात्मिक विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गुरुदेवांवर ‘गुरुदेव रानडे :साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान’, ‘गुरुदेव रानडे :ऍज अ मिस्टिक’ वगैरे आठ मराठी/इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
चरित्रकार शं. गो. तुळपुळे यांनी ‘परमार्थाचे पाणिनी’ या शब्दांत गुरुदेवांचा गौरव केला आहे.
शांताबाई शेळके व गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोश
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈