श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ७ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
भगवान रघुनाथ कुलकर्णी अर्थात बी.रघुनाथ
कथा, कादंबरी व काव्य लेखन करणारे बी. रघुनाथ हे मराठवाड्यातील परभणीचे. त्यांनी हैद्राबाद येथे मॅट्रीक पर्यंत शिक्षण घेतले.कौटुंबिक परिस्थितीमुळे शिकणे शक्य नसल्यामुळे त्यांनी निजामाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी स्विकारली.
तरूण वयातच त्यानी लेखनाला सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथील ‘राजहंस’ या मासिकात प्रसिद्ध झाली. तेथून त्यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला. कवितेशिवाय कथा, कादंबरी व निबंध लेखन हे त्यांचे लेखनाचे मुख्य प्रकार होते. कथा लेखन हीच आपली खरी ओळख आहे असे ते स्वतः मानत. सामाजिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी केलेले कथा व कादंबरी लेखन मराठी साहित्यात महत्वाचे ठरते. आत्ममग्नतेला शब्दरूप देणारा लेखक असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.तसेच त्यांना प्रादेशिक कथा कादंबरीचे जनक मानले जाते. यावरून त्यांच्या लेखनाचे महत्व लक्षात येईल.
निजामशाहीत असल्यामुळे त्यांच्या भाषेवर उर्दू भाषेचा प्रभाव जाणवतो. त्यांची कविता ही नवता व नाविन्याची आस लागलेली कविता आहे असे जाणकारांनी म्हटले आहे. त्यांच्या कवितांचे विषय विविध असले तरी त्यात प्रणयाराधन व स्त्रीदेहाचे वर्णन अधिक आहे. सामाजिक आणि राजकीय जाणीव व्यक्त करणा-या कविताही त्यांनी लिहील्या आहेत. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात आणि प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी निर्मिलेली साहित्य संपदा याप्रमाणे:
काव्यसंग्रह: आलाप आणि विलाप, पुन्हा नभाच्या लाल कडा
कथासंग्रह: साकी, फकीराची कांबळी, छागल, आकाश, काळी राधा.
कादंबरी: हिरवे गुलाब, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळले पाहिजे, आडगावचे चौधरी, ओ, बांबू दडके.
स्फूटलेखन: अलकेचे प्रवासी.
काही गाजलेल्या कविता: उन्हात बसली न्हात, घन गरजे, तुजवर लिहीतो कविता साजणी, दुपार, सांज, लहर, या जगताची तृषा भयंकर, ते न तिने कधी ओळखीले.
सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला कार्यालयीन कामकाज चालू असतानाच त्याना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
रामचंद्र भिकाजी जोशी
रामचंद्र भिकाजी जोशी हे संस्कृत आणि मराठी भाषा व व्याकरणाचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी व्याकरण,भाषेतील अलंकार व काही धार्मिक विषयांवरील पुस्तके लिहिली आहेत.
ग्रंथसंपदा: शिशुबोध व्याकरण, बालबोध व्याकरण, प्रौढबोध व्याकरण, मराठी पद्य वाचन, मराठी शब्द सिद्धी, मराठी भाषेची घटना, अलंकार विवेक, लग्नविधी आणि , सोहळे, धर्म आणि नीतिपर व्याख्याने, यापैकी मराठी भाषेची घटना हा एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ मानला जातो.
रा.भि.जोशी यांचे 1927 मध्ये निधन झाले.
बी.रघुनाथ आणि रा.भि.जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भः आधुनिक मराठी काव्य संपदा – संपादक-मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ता.काॅम, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈