सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
बा. भ. बोरकर
बाळकृष्ण भगवंत बोरकर (30 नोव्हेंबर 1910 – 8 जुलै 1984) हे कवी, लेखक, कथाकार होते.
बा.भ.मूळचे गोव्याचे. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात व धारवाडला झाले . कर्नाटक कॉलेजमध्ये शिकत असताना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिले. थोडे दिवस मुंबईला राहून ते गोव्याला परतले. तिथे एका इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. नंतर त्यांनी पुण्याच्या रेडिओ स्टेशनवरही काम केले.
त्यांचा पहिला कवितासंग्रह 1930मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ‘जीवन संगीत’, ‘चैत्रपुनव’, ‘चांदणवेल’, ‘कांचनसंध्या’ वगैरे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.
त्यांच्या कवितेवर भा. रा. तांबे यांचा प्रभाव होता. निसर्गसौंदर्य, दिव्यत्वाचा साक्षात्कार, समृद्ध शब्दभंडार, नादमय रचना ही त्यांच्या कवितेची लक्षणे होती. अक्षरगणवृत्ते, मात्रा, जातिवृत्ते यावर त्यांची हुकमत होती.
कवितांव्यतिरिक्त त्यांनी इतरही लेखन केले.त्यांची ‘कागदी होड्या’, ‘चांदण्याचे कवडसे’, ‘सासाय’ इत्यादी ललित लेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्टीफन झ्वाइगच्या कादंबऱ्यांचा व महात्मा गांधीसंबंधित काही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. रवींद्रनाथ टागोरांवरही त्यांनी काही पुस्तके लिहिली. कोकणी भाषेत त्यांच्या दहा साहित्यकृती आहेत.
मराठी ‘आमचा गोमंतक’ व कोकणी ‘पोर्जेचो आवाज’चे संपादक म्हणूनही बा.भ.नी काम केले.
भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता.
बा. भ. बोरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी माती, फोंडिया.कॉम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈