सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

विष्णुदास भावे

विष्णुदास अमृत भावे (9ऑगस्ट 1819 – 9 ऑगस्ट 1901)हे आद्य मराठी नाटककार होते.त्यांना मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जाते. त्यांचा उल्लेख ‘महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी’असा होतो.

त्यांचा जन्म सांगली येथे झाला.त्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडे नोकरीला होते.

विष्णुदास अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करू शकणाऱ्या असंख्य लाकडी बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. त्या वापरून ते ‘सीतास्वयंवर’ हे नाटक करणार होते. परंतु तत्पूर्वी कर्नाटकातील भागवत मंडळींप्रमाणे कीर्तनी खेळ रचण्याची आज्ञा सांगलीचे राजे पटवर्धन यांनी त्यांना दिली व 1843 साली भावेंनी ‘सीतास्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले.

पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून भावेंनी अनेक ठिकाणी अनेक नाटकांचे प्रयोग केले.

1853मध्ये त्यांनी मुंबईला ‘इंद्रजितवध’चा पहिला नाट्यप्रयोग केला. त्यांनी ‘इंद्रजितवध’, ‘राजा गोपीचंद’, ‘सीतास्वयंवर’ वगैरे नाटकांचे अनेक प्रयोग केले. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘सीतास्वयंवर’ या नाटकात त्यांनी गीतलेखनही केले होते.’राजा गोपीचंद’ या नाटकाचे हिंदी प्रयोगही त्यांनी केले होते.

विष्णुदास भावेंनी बनवलेल्या लाकडी बाहुल्या पुढे रामदास पाध्येंच्या हातात आल्या. त्यांनी  पत्नी अपर्णा पाध्येंच्या सहकार्याने खूप अभ्यास करून त्याच बाहुल्या वापरून ‘सीतास्वयंवर’चा प्रयोग केला.

भावेंवरील चनुलाल दुबे यांच्या पुस्तकाचा ‘हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे’ हा मराठी अनुवाद व्यंकटेश कोटबागे यांनी केला.

☆☆☆☆☆

वामन शिवराम आपटे

वामन शिवराम आपटे (1858 – 9 ऑगस्ट 1892) हे कोशकार होते.

आपटेंचा जन्म सावंतवाडीजवळील एका खेड्यात समृद्ध परिवारात झाला.ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले.

त्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना केलेल्या मदतीमुळे त्यांचे शालेय जीवन सुरळीत पार पडले.90%पेक्षाही जास्त गुण मिळवून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केले. त्यावेळी त्यांना भाऊ दाजी संस्कृत पुरस्कार मिळाला. नंतर गणित घेऊन प्रथम श्रेणीत एम.ए. केले व भगवानदास  शिष्यवृत्ती मिळवली.

त्यानंतर उत्तम सरकारी नोकरीचा मोह टाळून ते लोकमान्य टिळक, चिपळूणकर, आगरकर

यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक व व्यवस्थापक म्हणून काम करू लागले.

पुढे ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

‘द स्टुडंट्स इंग्लिश – संस्कृत डिक्शनरी’, ‘द स्टुडंट्स संस्कृत -इंग्लिश डिक्शनरी’, ‘संस्कृत – हिंदी कोश’, ‘स्टुडंट्स गाईड टू संस्कृत कॉम्पोझिशन’, ‘द स्टुडंट्स हँडबुक ऑफ प्रोग्रेसिव्ह एक्सरसाईझेस (भाग 1 व 2) इत्यादी पुस्तके जगभरात मान्यताप्राप्त आहेत.

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments