2 ऑक्टोबर – संपादकीय – दि . २ ऑक्टोबर — आपल्या देशातल्या दोन महान नेत्यांची जयंती
स्व महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेले महत्वाचे योगदान सर्वच भारतीय जाणतात. १५० वर्षे पारतंत्र्यात असणाऱ्या देशाला शांतीपूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देता येईल हा त्यांचा ठाम विश्वास त्यांनी अनेकांच्या मनावर बिंबवला. “ जनहो खादी वापरा “ हा ‘ स्वदेशी ‘ वस्तूंना पुरस्कृत करणारा संदेश लोकांना देतांना त्यांनी स्वतःपासून तो अमलात आणण्यास सुरुवात केली. भारतीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आवाज उठवत त्यांनी कितीतरी सत्याग्रहांचे नेतृत्व केले. तसेच अनेक सामाजिक सुधारणा करण्यात ,अस्पृश्यता-निवारण मोहिमेत, जातीय एकता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांमध्ये ते नेहेमीच सक्रीय होते. त्याहीआधी , म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ,भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते, जिथे ते तब्बल २१ वर्षे राहिले. तिथे राहणाऱ्या भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. त्यांना तिथे वांशिक वर्णभेदाला तोंड द्यावे लागले. पण त्यांचे अहिंसावादाचे तत्व त्यांनी सोडले नाही. आणि त्याच मार्गाने स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा तिथल्या भारतीयांना दिली. १९१५ साली गोपाळ कृष्ण गोखले या उदारमतवादी नेत्याच्या सल्ल्याने ते भारतात परतले. आणि भारतात राजकीय कार्य करण्यास सुरुवात केली. मा. श्री. गोपाळ कृष्ण गोखले यांना ते आपले “ राजकीय गुरु “ मानत असत. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली. तसेच १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा त्यांना “ राष्ट्रपिता “ म्हणून संबोधले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सत्तास्थापनेच्या वेळी मात्र ते स्वतः सत्तेपासून लांब राहिले. अशा या थोर नेत्यास अतिशय आदरपूर्वक श्रद्धांजली.
स्व लाल बहादूर शास्त्री
१९०४ साली वाराणसी येथे एका प्राथमिक शिक्षकांच्या घरी लाल बहादूर यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी ऐकलेल्या गांधीजींच्या भाषणाने ते प्रभावित झाले. पुढे काशी विद्यापीठात अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी मिळवली. पण त्या आधीपासूनच, विदेशीवर बहिष्कार आणि स्वदेशीचा वापर याचा पुरस्कार करण्यात त्यांचा खूप पुढाकार होता. पुढे समानतेचे सूत्र हाती धरून शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. “ सर्व्हन्टस ऑफ दि पीपल्स “ सोसायटीचे सदस्य म्हणून काम करता करता ते पुढे त्या सोसायटीचे अध्यक्ष झाले — आणि असा त्यांच्यातला ‘ विधायक कार्यकर्ता ‘ घडत गेला. तेव्हाच्या काँग्रेसचे मवाळ धोरण त्यांना मान्य नव्हते. पण विशेष म्हणजे सत्तेची लालसाही कधीच नव्हती. तरीही पुढे त्यांना आधी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद, नंतर काँग्रेसचे सचिवपद, मग रेल्वेमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पण एका रेल्वे-अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची असल्याच्या धारणेने त्यांनी आपणहून ते मंत्रिपद सोडले. १९६४ साली पं. नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना एकमताने पंतप्रधानपद बहाल केले गेले. ही जेमतेम दीड वर्षांची त्यांची कारकीर्द भारतीयांच्या कायम लक्षात राहील यात शंका नाही. कारण याच काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, पण भारताने त्यांना नमवले. याच काळात “ जय जवान , जय किसान “ या त्यांच्या घोषवाक्याने पूर्ण देश भारावून गेला. पण हे युद्ध संपल्यानंतर अगदी काहीच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी त्यांनी केलेल्या अनेक महत्वाच्या कार्यांसाठी त्यांना मरणोत्तर “ भारतरत्न “ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. खरं तर हा त्या पुरस्काराचा गौरव होता असेच म्हणावेसे वाटते. अशा या महान नेत्यास अतिशय भावपूर्ण आदरांजली .
आज २ ऑक्टोबर हा सुप्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री. चिंतामण द्वारकानाथ तथा सी. डी. देशमुख यांचा स्मृतिदिन….. भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे, आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर असणारे श्री. देशमुख हे पंडित नेहेरुंच्या, स्वतंत्र सार्वभौम भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले पहिले अर्थमंत्री होते. त्याहीआधीच, म्हणजे १९४४ साली, ब्रिटिश भारताच्या शासनाने त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना “ सर “ हा किताब बहाल केला होता. १९४३ ते १९४९ या काळात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतांना, १/१/१९४९ रोजी या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले. भाषावार प्रांतरचना करतांना सरकारने बेळगाव आणि कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून त्यांनी अर्थमंत्रीपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. ते संस्कृत- पंडित होते. कालिदासाच्या “ मेघदूताचा “ त्यांनी केलेला समवृत्त काव्यानुवाद, उत्कृष्ट अनुवाद म्हणून वाखाणला गेला आहे. कै. श्री. देशमुख यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
संपादक मंडळ प्रतिनिधी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈