☆ 25 सप्टेंबर- संपादकीय ☆
स्व बाळकृष्ण हरी कोल्हटकर
25 सप्टेंबर – मराठीतील सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर (बाळकृष्ण हरी कोल्हटकर) यांचा आज जन्मदिन (जन्मदिनांक 25 सप्टेंबर 1926). ते उत्तम नाटककार होते. दिग्दर्शक, अभिनेते होते आणि उत्तम कवीही होते. अनेक नाटकात त्यांची स्वत:ची पदे आहेत. त्यांची नाटके कौटुंबिक आणि भावनाप्रधान आहेत.
वाहतो ही दुर्वांची जुडी, दुरितांचे तिमिर जावो, देव दीनाघरी धावला, वेगळं व्हायचय मला इ.त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी 30 हून अधिक नाटके लिहिली.
त्यांच्या दुरितांचे तिमिर जावो या अतिशय प्रसिद्ध नाटकामधील एक गीत—-
☆ तू जपून टाक पाऊल जरा ☆
जीवन सुख-दु:खाची जाळी
त्यास लटकले मानव कोळी
एकाने दुसर्यास गिळावे
हाच जगाचा न्याय खरा
हीच जगाची परंपरा
तू जपून टाक पाऊल जरा–
जीवनातल्या मुशाफिरा ।।
पापपुण्य जे करशील जगती
चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुके माप ओतुनी
जे केले ते तसे भरा. ।।
निरोप जेव्हा येईल वरचा
तेव्हा होशील सर्वांघरचा
तोवर तू या रिपू जगाचा
चुकवून मुख दे तोंड जरा।।
दानव जगती मानव झाला
देवाचाही दगड बनविला
कोण कोठला तू तर पामर
चुकून तुझा करतील चुरा ।।
तू जपून टाक पाऊल जरा —–
प्रस्तुती – उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई – अभिव्यक्ती (मराठी)
चित्र साभार – कोल्हटकर, बाळ (बाळकृष्ण हरी) – profiles (marathisrushti.com)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈