श्रीमती उज्ज्वला केळकर
आत्मसाक्षात्कार
☆ मी… तारा… भाग – ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!
डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )
तारा – याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?
ताराबाई– लिहिलय….. इथून पुढे )
ताराबाई– ज्याला संकीर्ण स्वरूपाचं म्हणता येईल, असं ताराबाईंनी खूप काही लिहिलय. सुरुवातीच्या काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांचा… खंडकाव्याचा… ‘मधुशाला’चा अनुवाद त्यांनी केलाय. निरनिराळी व्यक्तिचित्रे असलेले, ‘माझीये जातीचे’ सारखे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ सारखा एखादा कथासंग्रह आहे. ललित लेखन आहे. समीक्षा लिहिल्या आहेत. काही संपादनं केली आहेत. आचार्य जावडेकर यांच्या जेलमधील पत्रांचे संपादन केलं आहे. रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन केले आहे. त्याला प्रस्तावना लिहिल्या आहेत. ज्याला अवडक-चवडक म्हणता येईल, असं आत्मकथनपर लेखनही त्यांनी बरंच केलं आहे.
तारा– तर ताराबाई, तुमच्या एकंदर लेखनाचा धावता परिचय तुम्ही करून दिलात, आता तुम्हाला मागच्या आयुष्याकडे वळून पहाताना काय वाटत? धन्यता वगैरे… ? आणि ही वाटचाल करताना तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं का? तुम्हाला कुणाचं काही घ्यावसं वाटलं का? किंवा तुमच्यासमोर लेखनाबाबत कुणाचे आदर्श होते, याबद्दल काही सांगाल का?
ताराबाई– त्याचं काय आहे, एकाच एका मार्गदर्शकाची ताराबाईंना कधी गरज वाटली नाही आणि ते शक्यही नव्हतं. कारण त्या महाविद्यालयात गेल्या नाहीत. शिकणं आणि शिकवणं या गोष्टी एकाच वेळी त्या परस्परावलंबी अशा करत गेल्या. पण सुदैवाने प्राथमिक शिक्षणापासून, कुणी ना कुणी तरी, ज्यांना आपण गुणी माणसं म्हणतो, मोठी माणसं म्हणतो, ते पाठीवर हात ठेवणारे लोक मिळत गेले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला दिशा दाखवणारी, रा. चिं. ढेरे, प्रभाकर मांडे यासारखी जेष्ठ मंडळी, नरहर कुरूंदकर, मुंबई विद्यापीठाच्या उषाताई देशमुख, सरोजिनी वैद्य अशी मंडळी भेटत गेली. सरोजिनी वैद्य यांच्या बरोबर त्या अमेरिकेला एक संशोधनपर निबंध वाचण्यासाठीही जाऊन आल्या. १९९१मध्ये आरीझोना स्टेट युनुव्हर्सिटी, अमेरिका येथील चर्चासत्रात त्यांचा सहभाग होता आणि यावेळी त्यांनी आपला लोकसाहित्यावरील संशोधनपर निबंध वाचला होता.
शांताबाई शेळके यांनी ताराबाईंचे लोकसाहित्यावरचे लेखन वाचल्यानंतर म्हंटले होते, ‘ताराबाई स्त्रीकेन्द्रित लेखन करतात. स्त्रियांविषयी पोटातिडिकेने लिहितात पण स्त्रीमुक्तीवाल्यांच्या लेखनात जी उंच पट्टी जाणवते, ती ताराबाईंच्या लेखनात नाही. त्यांचे लेखन आक्रोशी नाही. ’ कोल्हापूरला ताराबाईंना एक पुरस्कार मिळाला होता. ‘मंगल पुरस्कार’. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना तो दिला गेला होता. हा पुरस्कार शांताबाई शेळके यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यावेळी बोलताना हे उद्गार त्यांनी काढले होते. हे भाषण चालू असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनासाठी शांताबाईंची एकमताने निवड झाल्याची बातमी आली. त्यामुळे हा प्रसंग ताराबाईंच्या विशेष स्मरणात आहे.
बेळगावच्या इंदिरा संत जवळिकीच्या. कुसुमाग्रज हे नेहमीच पाठीशी होते. ताराबाईंच्या ‘लोकनागर रंगभूमी’ पुस्तकाचं पु. ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केलं होतं. पुण्याला किर्लोस्कर शताब्दीच्या निमित्ताने भाषणे करायची संधी, त्यांना पु. ल. देशपांडे यांच्या प्रशस्तीमुळे मिळाली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पत्र पाठवून विश्वकोशात अतिथी संपादक म्हणून काम करण्याची विनंती केली होती. त्यावेळी विश्वकोशात लोकसाहित्य हा विषय प्रथम समाविष्ट झाला. असे ताराबाईंच्या पाठीवर हात ठेवणारे, प्रोत्साहन देणारे असे अचानक भेटत गेले. जगण्याच्या प्रवाहात, कुणी येतात, भेटतात, कुणी हात सोडून जातात, तसं त्यांच्याबाबतीतही झालं.
अडचणी येतच असतात. एकीकडे नोकरी, घर सांभाळणं, लेखन, भाषण, संशोधन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत असताना, काही बर्या-वाईट गोष्टी घडत असतात. ताराबाई म्हणतात, ‘वाईट ते सोडून द्यायचं!’
तारा– ताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्या घटनाही घडल्या असतीलच ना!
ताराबाई– हो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली.
क्रमश: भाग ३
डॉ. ताराबाई भावाळकर
संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९
प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈