श्रीमती उज्ज्वला केळकर
आत्मसाक्षात्कार
☆ मी… तारा… भाग – ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!
डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. : तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )
तारा– ताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्या घटनाही घडल्या असतीलच ना!
ताराबाई– हो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली…… इथून पुढे )
ताराबाई– हो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली. त्याच वेळी घरातल्यांचाही चंगला पाठीबा मिळत गेला. ताराबाईंच्या आईलाही त्यांचं खूप कौतुक होतं. मित्र-मैत्रिणी मिळत गेल्या. त्या आजतागायत मिळताहेत. ताराबाईंचं नशीब इतकं चांगलं की त्यांना वयापेक्षा लहान असलेल्या मित्र-मैत्रिणी, वयाची ८० वर्षं ओलांडली, तरी मिळताहेत. त्यांना हा आपल्या जीवनातला मोठा भाग्ययोग आहे, असं वाटतं. त्यांच्याशी चर्चा, गप्पा हेही आनंदाचे क्षणच की! पण काही आनंदाचे क्षण अचानकही त्यांना लाभले आहेत. विशेषत: अनेक पुरस्कारांच्या बातम्या त्यांना अकस्मित रीतीने कळालेल्या आहेत.
प्रबंधाला पुरस्कार मिळाल्याची बातमी पेपरमध्ये कुठे तरी कोपर्यात छापून आली होती. कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी ती त्यांना दाखवत विचारलं, ‘ही बातमी बघितली का?’ त्यानंतर विद्यापीठाचं पत्र आलं. असे अनेक पुरस्कार; म्हणजे सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, सु. ल. गद्रे पुरस्कार, खाडीलकर पुरस्कार, आंबेडकर शिष्यवृत्ती, असे अनेक… सामान्यत: निवृत्त झालं की लोक विशेषत: प्राध्यापक मंडळी सुशेगात रहातात. पण ताराबाई निवृत्तीनंतरही बोलत राहिल्या. लिहीत राहिल्या. व्याख्याने देत राहिल्या. सेवा निवृत्तीनंतरही दरवर्षी एक पुस्तक आणि एक पुरस्कार त्यांच्या खात्यावर जमा आहे, ते अगदे आत्ता आत्तापर्यंत कोरोना सुरू होण्याच्या काळापर्यंत, त्यांचं पुस्तक आलेलं आहे. ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ हे ते पुस्तक.
अचानक मिळालेले काही धक्कादायक आनंदाचे क्षण असे आहेत, की काही मोठ्या पदावर असलेल्या मोठ्या व्यक्तींनी, साहित्य क्षेत्रातल्या नव्हे हं, अन्य क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींनी, मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी, कुठून तरी फोन नंबर मिळवून ताराबाईंना फोन केला आहे आणि त्यांचे पुस्तक आवडल्याचे सांगितले आहे. लेखकांनी, विद्यार्थ्यांनी, घरच्यांनी कौतुक केले, तर त्याचे विशेष काही नाही. त्यांना कौतुक असतेच. पण ज्यांनी खटाटोप करून, नंबर शोधून काढून, लेखन आवडल्याबद्दल फोन केला, त्याचे स्वाभाविकपणेच ताराबाईंना अप्रूप वाटते.
मुंबईला असताना अचानक एकदा इनामदारांचा फोन आला. ‘कोण इनामदार?’ ताराबाईंनी विचारलं, ‘पोलीस कमिशनर इनामदार… ’
‘यॅस! आय अॅम पोलीस कमिशनर इनामदार… ’ ताराबाई गडबडून गेल्या. यांचा आपल्याला का फोन आला असेल?’ त्या विचार करत असतानाच इनामदार म्हणाले. ‘तुमचं पुस्तक वाचलं. ‘स्त्री मुक्तीचा आत्मस्वर. खूप आवडलं, म्हणून फोन केला. ताराबाईंना हे अगदीच अनपेक्षित होतं पण त्यामुळे आनंद द्विगुणित झाला. हेच पुस्तक आवडल्याचा काही महिन्यांपूर्वी आनंद करंदीकरांचाही फोन आला होता. हे पुस्तक अनेकांना आवडलं आणि त्याच्या आवृत्त्याही निघाल्या. आकाशवाणी साठी, पु. मं. लाड व्याख्यानमालेत ३ व्याख्याने दिली होती, त्यावर हे पुस्तक आधारलेले आहे.
अगदी एवढ्यातच काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपवर मेसेज आला, ‘ तुमचा ‘लोकसाहित्यातील सीता’ हा लेख खूप आवडला. तो मेसेज अभय बंग यांचा होता. तर असे काही धक्कादायक आनंदक्षण मिळत गेले. त्यामुळे हार्ट अॅटॅक वगैरे काही आला नाही, पण आनंद खचितच झाला. सांगायचं तात्पर्य असं की लेखनामुळे बर्याच चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत गेल्या. त्यामुळे जगणं हे ओझं झालय, असं अजून तरी वाटत नाही.
तारा – आत्तापर्यंत तुम्ही आपल्या लेखनाचा धावता आढावा घेतलात, आता मागे वळून बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? एवढं लेखन झालं, त्याचं कौतुक झालं, पुरस्कार मिळाले, त्यामुळे तुम्हाला धन्यता वाटत असणारच! नाही का?
ताराबाई– ते धन्यता वगैरेसारखे शब्द ताराबाईंच्या व्यक्तिमत्वात बसत नाहीत.
क्रमश: भाग १
डॉ. ताराबाई भावाळकर
संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९
प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈