श्रीमती उज्ज्वला केळकर
आत्मसाक्षात्कार
☆ मी… तारा… भाग – ५ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!
डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. : तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )
(मागील भाग शेवट…
तारा – आत्तापर्यंत तुम्ही आपल्या लेखनाचा धावता आढावा घेतलात, आता मागे वळून बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? एवढं लेखन झालं, त्याचं कौतुक झालं, पुरस्कार मिळाले, त्यामुळे तुम्हाला धन्यता वाटत असणारच! नाही का?
ताराबाई– ते धन्यता वगैरेसारखे शब्द ताराबाईंच्या व्यक्तिमत्वात बसत नाहीत .… इथून पुढे )
ताराबाई– ते धन्यता वगैरेसारखे शब्द ताराबाईंच्या व्यक्तिमत्वात बसत नाहीत. ताराबाईंचं जगणं हे आवडक चवडक जगणं आहे. जसा प्रवाह आला, तशा त्या चालत गेल्या. ज्यावेळी जे लिहावासं वाटलं ते लिहिलं. करावसं वाटलं ते केलं. कर्तव्य पार पाडली. माणसं जवळ आली, त्यांना स्वीकारलं. सोडून गेली, त्याची खंत केली नाही. काही संधी सुटून गेल्या. त्याचीही खंत केली नाही. आयुष्यात सगळं चांगलं झालं, असं आता ८० वर्षं ओलांडल्यावर ताराबाईंना वाटतं. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्म. लहांपणापासूनच्या आठवणी अजूनही लख्खं आहेत. पहिला स्वातंत्र्यदिन आठवतोय. पुण्याला शनिवारवाड्यापुढे ऐकलेली म. गांधी, नेहरू यांची भाषणे आठवताहेत. आता यावस्थेला येईपर्यंत पाहिलेली अनेक परिवर्तने आठवताहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैयक्तिक, परिवारात घडलेली परिवर्तने… हे सगळं पाहताना वाटतं, एका जन्मात अनेक जन्म झाले आहेत आपले.
तारा- एवढी सगळी परिवर्तने बघितल्यावर तुम्हाला असं नाही का वाटत की माणसाचं आयुष्य खूप बदललय. सगळी जण म्हणतात, जीवनात खूप बदल झालाय… बदल झालाय… खरंच झालाय का इतका बदल माणसाच्या आयुष्यात?
ताराबाई – ताराबाईंचं वाचन पुष्कळ आहे. मार्क्सपासून वेदांपर्यंत आणि लोकसाहित्यापासून धर्मशास्त्रापर्यंतची अनेक पुस्तके त्यांच्या कपाटात सुखाने नांदत आहेत आणि डोक्यातसुद्धा. त्यांच्या ५००० – ६००० पुस्तकांच्या संग्रहालयातलं एकही पुस्तक असं नाही, जे त्यांनी वाचलेलं नाही. हे सगळं वाचल्यानंतर खरंच विचार करावासा वाटतो, माणूस बदललाय का? मन अंतर्मुख होतं. काही कोटी वर्षापूर्वी आदिमानव जन्माला आला. आज माणूस अवकाशात जाऊन पोचलाय. पण त्या वेळी माणसात दिसणारी, हाव, हिंसा, युद्धप्रवृत्ती आजच्या माणसातही दिसते. पोशाख बदलला. रहाणी बदलली. बाह्य बदल झाले, पण आंतरिक बदल झालाय का? असं प्रश्न त्यांना पडतो.
लोकसंस्कृतीचा प्रवाह आदि ते अद्यतन वाहतो आहे. कधी तो सहज नैसर्गिकपणे वाहतो. कधी कुणी त्याला मुद्दाम वळण देतं. या अवलोकनात, ताराबाई म्हणतात, त्यांच्यापुढे कुणी फार मोठी व्यक्ती नसते. त्यांच्यापुढे असते, ती जात्यावर दळण दळणारी बाई. विशेषत: गेले वर्षभर आपण ज्या परिस्थितीत, मन:स्थितीत जगतो आहोत, जीवनाच्या ज्या अशाश्वतेत जगत आहोत, त्या परिस्थितीत… कुठली तरी महामारी आली आणि तिने सगळ्या मनुष्य जातीला हदरवून सोडलं. त्याची राजसत्ता, अर्थसत्ता, कुटुंब, शिक्षण… सगळं अशाश्वत असल्याची जाणीव करून दिली. सगळं अशाश्वत आहे, हे माझ्या लोकपरंपरेतील अनक्षर बाईला कळलेलं होतं. बाई हा समाजाच्या उतरंडीतला सगळ्यात खालचा, तळातला भाग समजला जातो. माझी बहिणाबाई म्हणते, ‘शेवटी काय? तर शेवटी श्वास संपला. ’ तो कधी ना कधी संपणारच आहे. मधल्या करोनाच्या काळात ही श्वासाची अशाश्वता, सगळ्यांनी जवळून अनुभवली आहे. म्हणून आता मी, माझ्याबद्दल बोलणं फार क्षुद्र वाटायला लागलय कारण मी कोण? संतांनी सांगितलं, तत्वज्ञांनी उत्तर शोधायचा प्रयत्न केला. माझ्या जात्यावर दळणार्या बाईनेही सांगितलं. रोकडेपणाने आणि फार सोपेपणाने सांगितलं. माणसाला, मी हे केलं… ते केलं… असं केलं… तसं केलं… असं सांगायची सवय आहे. हा मी… मी… मी… चा फुगा बहिणाबाई चौधरी दोन –चार शब्दात फोडून टाकते.
‘अरे मी कोण मी कोण?
आला मानसाले ताठा
म्हणे गळ्यातला श्वास
तू कोण? तू कोण?
गळ्यातला श्वास कुठल्याही क्षणी अडतो. विचारतो, ‘तू कोण आहेस?’
जन्मल्यापासून माणसाचा श्वास चालू होतो.
‘आला शास गेला शास याचं न्यारं रे तंतर अरे जगणं मरणं एका शासाचं अंतर’
एक श्वास नाही आला की संपलं. तुझ्या हातात काय आहे? माझ्या हातात काही नाही, हे सांगण्यासाठी, हे वर्ष आपल्यासमोर उभं आहे. हेच तत्वज्ञान संतांनी संगीतलय. तत्वज्ञान्यांनीही सांगितलय आणि जात्यावर दळण दळणार्या लोकसंस्कृतीतल्या बाईनेही सांगितलय. जात्यावर दळण दळणारी बाई आपल्या शेजारणीला म्हणते, इथे शेजीबाईच्या ऐवजी ताराबाई म्हणू, आपला तृतीय पुरुषी उल्लेख करत…
‘अग अग ताराबाई, नको म्हणूस माझं माझं
नदीच्या ग पलीकडे जागा साडे तीन गज. ’
तेवढंच तुझं. पण आता दुर्दैव असं की कोरोनाच्या काळात, आता तेवढी मिळाली, तरी बास झालं, असं म्हणावं लागणार आहे. आशा स्थितीत ताराबाईंना स्वत:बद्दल काय बोलायचं? आत्मसंवाद कसा साधायचा? असा प्रश्न पडलाय. कारण आता माणसाला स्वत:च्या ‘मी’पणातून बाहेर काढण्याची वेळ आलीय, असं ताराबाईंना वाटतं. या स्थितीत लोकपरंपरेतील ती अनक्षर स्त्री आपली गुरू ठरते आहे आणि तिला वंदन करून इथे थांबावं, असं त्यांना वाटतय.-
– समाप्त –
डॉ. ताराबाई भावाळकर
संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९
प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈