मराठी साहित्य – आलेख – जीवन त्यांना कळले हो – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
जीवन त्यांना कळले हो
(प्रस्तुत है जीवन में छोटी-छोटी बातों में प्रसन्नता ढूँढने के लिए आपको प्रेरित करता सुश्री ज्योति हसबनीस जी का यह आलेख । )
छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधणं , आणि त्या आनंदात हरवून जाणं , हा एक स्वभाव असतो . हा जर आपला स्थायी भाव असला तर प्रतिकूल परिस्थितीतदेखील अनुकूलता निर्माण करण्याचं कसब अंगी मुरतं , आणि सारंच साधं सोपं सरळ वाटू लागतं . कामाचे डोंगर त्यातल्या अवघड चढणींसकट सुकर होतात लीलया पार होतात .
घराचं छोटंसं रिनोव्हेशनचं काम काढलं तेव्हा कामगारवर्ग खुप जवळून परिचयाचा झाला माझ्या . त्यांच्या सवयी , लकबी , स्वभाव , साऱ्या कंगोऱ्यांसकट अनुभवास आलं माझ्या . सकाळी कामावर येतांना नीटनेटकी चापून चोपून साडी नेसलेली नीला आल्या आल्या शर्टाचा डगला चढवून चेहऱ्यावर ओढणी गुंडाळणार आणि केसांत ओढणीच्या कडेने दोन टप्पोरी शेवंतीची फुलं माळणार ! टेबलावर ठेवलेल्या मोठ्ठ्या आरशासमोर क्षणभर थबकणार आणि समाधानाने पुढे सरकणार ! हवं ते मिळाल्याचा आणि आवडतं ते साधल्याचा आनंद तिच्या चमचमत्या डोळ्यातून ओसंडून वाहणार ! हो ..रसिकतेला बंधनं कुठली ? फुलं सजवायला अगदी फुलदाणीचंच बंधन कशासाठी …फुलं सजवायला एक छोटासा पाईपचा तुकडा देखील पुरतो , आणि तो ठेवायला , मातीचे ढिगारे जरी असले तरी एखादा कोपरा देखील मिळतो . थोडीशी वाळू आणि थोडंसं पाणी टाकून सजवलेली फुलं दिवसभरच्या नीरस कंटाळवाण्या कामात देखील चेहऱ्याची टवटवी अबाधित ठेवायला मनापासून मदत करतात ही तिच्या वृत्तीतली किती मोठी सकारात्मकता !
ग्रॅनाईट मोल्डिंग फिटिंग चं काम करणारा युसूफ सतत गुणगुणत राहणार किंवा मोबाईलची गुणगुण ऐकणार! आवडतं गाणं ऐकतांना त्याचा चेहरा असा काही लकाकणार की वाटावं सारी सुखं याच्या पायाशी लोळण घेतायत जणू ! जुगाड करून खोलीत लावलेला ट्यूबलाईट,त्या लाईटमध्ये अखंड चालणारे त्याचे हात , कसंबसं चार्जर सांभाळत , लटकत, गुणगुणणारा बापडा मोबाईल ,आणि सूरात सूर मिसळत कामात तल्लीन झालेला , चिवटपणे कामाचा फडशा पाडणारा युसूफ ..! खरंच सूरात आनंद शोधत भान विसरत , समाधानाने वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडण्यात खरी गंमत आहे ही किती सकारात्मक मानसिकता !
चहा, जेवण एकत्र घेतांनाचा त्यांचा आपसातला संवाद , हास्य विनोद म्हणजे एक प्रकारचा life on a lighter mode ची झलकच जणू ! खरंच छोट्या छोट्या गोष्टी देखील किती शिकवतात आपल्याला . हातातोंडाची मिळवणी असलेलं त्यांचं चाकोरीतलं आयुष्य , आणि त्या चाकोरीत जगतांनादेखील सुखाचे छोटे छोटे कण वेचणं , त्यातला आनंद लुटणं , त्यातलं आंतरिक समाधान आणि त्याची पसरलेली चेहऱ्यावरची तृप्ती सारंच अगदी हातात हात घालून वावरत असतं असं जाणवतं या मंडळींना बघून !
आंतरिक समाधान पैशाच्या सुबत्तेवर , समाजातल्या प्रतिष्ठेवर , सामाजिक स्थानावर अवलंबून असतं हे यांच्या कधी गावीही नसतं मग अशा प्रश्नांचं उलटसुलट जाळं विणण्यात त्याची उत्तरं शोधण्यात आपण का रंगून जातो आणि काल्पनिक सुखाच्या मागे धावत छोट्या छोट्या आनंदाला मुकतो , आयुष्याची लज्जत आणि रंगतच हरवून बसतो ??
© ज्योति हसबनीस