सुश्री ज्योति हसबनीस
निष्पर्ण वृक्ष
(प्रस्तुत है पतझड़ के निष्पर्ण वृक्ष से संबन्धित स्मृतियों पर आधारित सुश्री ज्योति हसबनीस जी का भावप्रवण आलेख ‘निष्पर्ण वृक्ष’)
निष्पर्ण वृक्ष …अत्यंत कळाहीन ..असंख्य पर्णहीन फांद्यांच्या रूपात उरलेला ..वठलेला ..शुष्क ..नीरस ..सारा जीवनरसच आटलेला ..अनंताकडे एकटक बघणारा ..चमकणाऱ्या वीजेकडे आशेने बघणारा ..कल्पनेनेच शहारणारा …मनोमन उसासणारा ..हिरव्यागार माळरानावर आपलं एकाकीपण निमूटपणे जगणारा .. ..क्वचित विसाव्याला आलेल्या एखाद्या पक्ष्याच्या अस्तित्वाने मोहरणारा …त्याच्या चाहुलीने, पंखांच्या हालचालीने ..मंजुळ सादेने सुखावणारा ..आणि नकळत गतवैभवात रमणारा !!
गच्च पर्णसंभाराच्या हिरव्या ओल्या आठवणीतले कित्येक ऋतू मनात जागत असतील याच्या. गोड शीळ घालत फुलणारं पक्ष्यांचं प्रेम, कटीखांदी खेळवलेल्या उबदार घरट्यांतला पिल्लांचा चिवचिवाट, चोचीतल्या चिमणचाऱ्यातलं वात्सल्य, आणि सारं आकाश पंखांवर पेलण्याचे पिल्लांनी आईच्या मदतीने गिरवलेले असंख्य जीवनधडे, पिल्लाची भरारी बघणारी
आईची कौतुकभरली नजर, रिते होणारे घरटे, साऱ्याचा मूक साक्षीदारच ना तो! वाटेवरच्या पांथस्थाला आपल्या शीतल प्रेमाच्या सावलीत कितीदा तरी निवांत केलं असेल त्याने. प्रेमी जनांच्या गोड गुपितांना ह्याचाच तर आधार! कित्येकदा मनोरम प्रीतीचे मळे फुलले असतील याच्या साक्षीने!
लहरी निसर्गाच्या विक्षिप्तपणाचे कैक घाव सोसून देखील एखाद्या स्थितप्रज्ञासारखा पाय घट्ट रोवून आजवर अविचल उभा आहे हा, आपल्या मातीत पसरलेल्या असंख्य मुळांना जगण्याचं बळ देत …आपल्या निष्पर्ण फांद्या सांभाळत …आणि त्यांची समजूत काढत ..कारण आता विसाव्याला पक्षी येणार नाहीत, त्यांच्या गुलाबी मनाला निष्पर्ण फांद्यांची भुरळ पडणार नाही, सुरक्षितता आणि ऊब हरवून बसलेल्या ओक्या बोक्या फांद्यांच्या कटीखांदी घरटी झुलणार नाहीत.
पांथस्थांचं शांतवन , प्रीतीची गुपितं यापैकी काहीच साधणार नाही. आयुष्यातलं गमकच हरवलेला हा एकाकी वृक्ष मात्र डोळ्यांत स्वप्न जागवतोय असा भास झाला मला अचानक …स्वप्न ..तुटलेपणाचे ..
भंगलेपणाचे ..पण त्या तुटलेपणातही एक चमक होती भंवतालाशी अतूट नातं जपता आल्याची, कुणाच्या तरी आयुष्याशी आजवर स्वत:ला जोडता आल्याची, सांधता आल्याची ! त्याच्या श्वासाश्वासात कृतकृत्यता जाणवत होती आयुष्य सार्थकी लागल्याची, मातीशी इमान राखल्याची !
© ज्योति हसबनीस