मराठी साहित्य – आलेख – प्रतिसाद – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

प्रतिसाद 

(यह सत्य है  कि ईश्वर ने  मानव हृदय को साद-प्रतिसाद  के  भँवर में उलझा कर रखा है जबकि प्रकृति अपना कार्य करती रहती है। उसे प्रतिसाद से कोई लेना देना नहीं है। इस तथ्य पर प्रकाश डालती यह रचना सुश्री ज्योति हसबनीस जी के संवेदनशील हृदय को दर्शाती है।) 

सरलेली संध्याकाळ, अलगद होणारं निशेचं आगमन, उगवतीचा चंद्र आणि आकाशातल्या चांदण्यांशी स्पर्धा करणारी चांदणफुलं अंगभर दिमाखाने मिरवणारा , दैवी सुगंधाने सारा भंवताल भारून टाकणारा डौलदार प्राजक्त ..

आषाढाचे मेघ , श्रावणाची सर सारं काही अंगाखांद्यावर झेलून तृप्तीच्या हुंकारात लाल ,पिवळ्या ,गुलाबी ,जांभळ्या रानफुलांनी नटलेली देखणी सह्यपठारे ..उष:कालची तांबूस पिवळी आभा पांघरत कोवळ्या सूर्यकिरणांत लखलखणारी हिमशिखरे ..आपल्या ऋतुचक्रात सातत्य राखणारा निसर्ग असं विविधरंगी दर्शन देत साद घालत असतो , आणि आपण जसं जमेल तसं कधी अनाहूतपणे तर कधी आवर्जून याची दखल घेत प्रतिसाद देत असतो ,सृष्टीची ही रूपं नवलाईने न्याहाळत असतो , त्यातल्या अपूर्वाईच्या गोडीने नादावून जात असतो .

खरं तर साद -प्रतिसाद हा खेळ मानवाचा , निसर्गाला त्याच्याशी काय देणं घेणं ? तुमच्या कौतुकाने तो काही बहर वाढवणार नाही की प्रतिसाद मिळाला नाही म्हणून बहर आवरता घेणार नाही …मी केलं हे सारं , हा त्याचा पुसटसा देखील अभिनिवेशही नाही …पण हाडामासाच्या जित्या जागत्या माणसाचं तसं नाहीय ना ! माणसाला देवाने अतिशय तरल आणि संवेदनशील  ‘मन’ बहाल केलंय आणि साद – प्रतिसादाच्या खेळांत त्याला पुरतं अडकवलंय ! अपेक्षांचं ओझं खांद्यावर वागवत , जमेल तसा त्याचा भार हलका करत असतांना , हक्काच्या गोतावळ्यातला एखादा कौतुकाचा कटाक्ष त्याला कृतकृत्य करतो ! मस्त मेन्यू आखून दिवसभर खपून छान बेत जुळवून आणला आणि ‘काय छान झालंय सगळं’ अशी हवीहवीशी दाद देत पदार्थांचा आस्वाद घेऊन मंडळी तृप्त झाली की मिळालेल्या प्रतिसादाने मन सुखावतंच ! मैफलीतली वाद्यांची रंगलेली जुगलबंदी , रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाविना अपुरीच होय ! ..काळजाचा वेध घेत आत अलवारपणे झिरपणारे सूर कानात साठवत उत्सफूर्तपणे तोंडातून निघणारा ‘ वन्स मोअर ‘आणि तो ऐकल्यावर गोडसं हसून तितक्याच तडफेने पुन: ती गझल ऐकवणारा कलाकाराचा आनंदाने उजळणारा चेहरा ह्या प्रतिसादाचं बोलकं रूपच नव्हे काय ?

स्वान्तसुखाय अनेक गोष्टी आपण करतो . आपले छंद तर स्वान्त सुखायच असतात ! छंद मग तो रांगोळी रेखाटण्याचा असो , लेखनाचा असो , समाजाप्रति  काही देणं लागतो ह्या जाणीवेतून अनेक संस्थांमध्ये कार्यरत राहून त्या संस्थांच्या कार्यशैलीत झोकून देता देता आपलं स्वत:चं एक स्थान तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न देखील त्या छंदाची दुसरी बाजूच नव्हे काय ? आणि हे सारं मिळणाऱ्या प्रतिसादावरच अवलंबून असणार ना! स्वान्तसुखाय जरी माणूस हे सारं करत असला तरी योग्य त्या व्यासपीठाद्वारे  स्वत:तल्या कलागुणांचं प्रगटन करण्याचा त्याचा स्थायीभावच असतो . आणि योग्य त्या प्रतिसादानेच हे कलागुण बहरतात हे वास्तव आहे ! आणि तसे ते बहरायलाच हवेत ! त्यांना प्रतिसाद हा मिळायलाच हवा !

स्त्री स्वत:साठीच साजशृंगार करत असली तरी , तिच्या साडीचं , निवडीचं , केलेलं कौतुक तिला सुखावून जातं , पाठवलेला लेख खुप आवडला असं जेव्हा मोबाईलवरून कळवलं जातं तेव्हा मोरपीस फिरतंच ना गालावर ..! आणि प्रतिसादाच्या अपेक्षेनेच तर मोबाईल नंबरही देत असतो ना आपण पेपरमध्ये !

*प्रतिसाद* ..केलेल्या कामाची पोचपावती ..परिश्रमाचं कौतुक हे सारं सारं माणसाचं जीवन सुखकर बनवण्यात खुप मोठ्ठी भूमिका बजावतं ! जितक्या तत्परतेने हाकेला ओ दिली जाते तितक्याच तत्परतेने साद घातली असता प्रतिसाद ही मिळावा …तृप्तीची साय ही त्याविना धरलीच नाही जाणार माणसाच्या जीवनावर !!

© ज्योति हसबनीस