मराठी साहित्य – आलेख – सोबत…सात जन्मांची – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
सोबत…सात जन्मांची
(प्रस्तुत है सात जन्मों के सम्बन्धों पर आधारित सुश्री ज्योति हसबनीस जी का आलेख ‘सोबत…सात जन्मांची’)
सात जन्माची सोबत करण्याच्या आणाभाका घेऊन हळूच एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश करतो आपण. जोडीने संसार सुरू होतो. काडी काडी जमवून मेहनतीने घरटं बांधलं जातं. घरट्याला आकार देण्यात, वादळ वाऱ्याचा सामना करत घरट्यातली ऊब राखण्यात, घरट्यातल्या चिवचिवाटातलं स्वर्गसुख लुटण्यात आयुष्याची मध्यान्ह संपून उतरणीची ऊन्ह कधी सुरू होतात लक्षातच येत नाही. मध्यान्ह ओसरल्याचं निवलेपण तर असतं, पण सांजसावल्यांचं भय देखील मनात दाटायला सुरूवात होते. आपल्याच आपल्याला व्यापून टाकणाऱ्या लांब लांब सावल्या …मन काजळणाऱ्या …एक अनामिक हुरहूर लावणाऱ्या!
आतापर्यंतच्या प्रवासातील सारी वळणं, खाच खळगे, चढ उतार जोडीने पार केलेले असतात. अगदी कुठल्याही क्षणी हातावरची आश्वासक पकड कधी ढिली झालेली नसते, कायमच शब्दांच्या, स्पर्शाच्या खंबीर साथीने इथवरचा प्रवास झालेला असतो ….पण …अचानक हा हात हातातून सुटला …अगदी कायमचा तर …
अवचित एखाद्या कातरवेळी, हळव्या क्षणी मनात येणारा हा विचार अक्षरश: जिवाच्या पार चिंधड्या करून टाकतो, नाही का?
सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या बातम्यांपर्यंतच्या दिवसभराच्या टाईम टेबलची एकमेकांच्या सोयीने केलेली आखणी, आणि तिचा सहज स्वीकार हेच अंगवळणी पडलेल्या मनाला, हे एकटेपण पेलवेल, झेपवेल?? व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे जगणं, स्वत:चा स्वतंत्र असा दिनक्रम आखणं, लौकिकार्थाने कुणाशी कायमच जोडलं गेलेलं पण आता केवळ स्वत:शीच उरलेलं नातं समर्थपणे निभावता येईल? अंधाराशी मैत्री करता येईल? रात्रीच्या कुशीत निवांतपणा साघता येईल? असे असंख्य विचार मनात थैमान घालू लागतात. काजळी धरलेली दिवली कशी अंधारालाच उजळवत आपलं केविलवाणेपण जपते तशी मनाची अवस्था होते अशा वेळी…पण मनाची अशी घालमेल, अशी तगमग, आणि येणारी मरगळ थोपवता यायलाच हवी.
जिव्हाळ्याची मुलं बाळं, जोडलेली जिवाभावाची माणसं, जोपासलेले छंद, या साऱ्यांनी परिपूर्ण असलेलं आपलं आयुष्य ह्या एकाकीपणाला असं घाबरेलच कशावरून? आणि एकाकीपण कसं? आपल्या घरट्यात आहेतच की जोडीदाराची स्पंदनं! समान आवडीचे छंद जोपासतांना नकळत मनात तर साधला जाणारच आहे ना संवाद त्याच्याशी! खचल्या क्षणांना ऊभारी देणारे त्याचे शब्द जपलेच आहेत ना कायम मनाशी!
कृष्णमेघी वीज चमकावी आणि अवघा आसमंत उजळून निघावा, अगदी तसा एक विचार मनात आला, की सात जन्माची सोबत अशी एवढ्यात कशी संपणार? अजून तर कित्ती एकत्र प्रवास करायचाय, मधुर स्मृतींची खुप सारी गाठोडी बांधायची आहेत अगदी सात जन्म पुरतील एवढी … आणि हो ती एकत्र वाहायची देखील आहेत ..अगदी सात जन्म बरोबरीने! जोडीदाराची साथ असणारच आहे कायम, एकमेकांमध्ये असलेलं रूजलेपण सात जन्म पुरणारं तर नक्कीच आहे, उगाचच नाही म्हणत जोडीदाराला सात जन्मांचा सोबती ! खरंच त्याच्याबरोबरच्या मघुर क्षणांची सोबत अक्षरश: सात जन्मांची ..!!
© ज्योति हसबनीस