सौ. मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ TCOC : टाटा कोड ऑफ कंडक्ट… लेखक : श्री मंदार जोग ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी शक्यतो वैयक्तिक काहीही समाज माध्यमांवर लिहीत नाही. पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे. म्हणून थोडे लिहितो आहे. मी टाटा जॉईन केल्यावर इंडक्षन नंतर माझ्या बॉस बरोबर कॅफेटेरिया मध्ये बसलो होतो. तेव्हा त्याने एक कानमंत्र दिला. तो म्हणाला “मंदार तू स्किलमध्ये कमी असलास तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे तुला ट्रेन करतील. पण TCOC शी प्रतारणा केलीस आणि तू रतन टाटा देखील असलास तरी तुला नोकरीवरून काढून टाकतील हे विसरू नको!”
टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपनीज्मध्ये TCOC म्हणजे टाटा कोड ऑफ कंडक्ट नावाची एक नियमावली आहे जी सर्व कर्मचाऱ्यांना लागू असते. तिथे उल्लंघन केल्यास क्षमा नाही. बाकी स्कील सेटमध्ये एव्हरेज .. क्वचित बिलो एव्हरेज असलेले काही लोक टाटांच्या कंपनीत सरकारी सेवेत काम केल्यासारखे वर्षानुवर्ष काम करून आज उत्तम पगार घेत असलेले मला माहीत आहेत! टाटा कर्मचाऱ्यांची काळजी घेतात, त्यांना ट्रेन करतात, त्यांची क्षमता वाढायला वाव देतात. पण कोड ऑफ कंडक्ट बाबत नो कॉम्प्रोमाईज! त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये टाटा कर्मचारी म्हणून माणसाने कसे वागावे आणि कसे वागू नये ह्याबद्दल अगदी मूलभूत माहिती आहे. कोणतेही जाचक बीचक नियम नाहीत. बेसिकली टाटा समूह ज्या सचोटी, तत्त्व आणि सर्व समावेशन ह्यासाठी ओळखला जातो त्याचे पालन करावे आणि त्यासाठी काय करू नये हे त्यात सांगितलेले आहे.
इथे फार काही लिहिता येणार नाही. पण एक गंमत सांगतो. एका विभागाने एका विशिष्ट ट्रेनिंगसाठी काही कोटिंचं एक टेंडर काढलं. आम्ही ते बीड केलं. तिथे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही अर्धे पैसे आम्हाला कॅश द्या, मग हव्या त्या किंमतीची ऑर्डर आम्ही तुम्हाला देतो. मग पुढे ती तुम्ही पूर्ण केलीत की नाही हे पण आम्ही विचारणार नाही. टाटा कंपनी असल्याने अर्थात आम्ही नकार देऊन काही लाखांचं होऊ घातलेल्या नफ्याचं नुकसान करून घेतलं. पण सहा महिन्यांनी त्या विभागाचं ऑडिट झाल्यावर ऑडिटरनी त्यांना प्रश्न विचारला की गल्ली बोळात असलेल्या किरकोळ कंपन्यांना तुम्ही कामासाठी नियुक्त केलं आहे मग टाटा कंपनीला का नाही? मला त्या अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी अडचण सांगितली. आम्ही मात्र एकही पैसा देणार नाही ह्यावर ठाम होतो. त्यांना आम्हाला पूर्ण पैशांची काही लाखांची ऑर्डर अखेर द्यावी लागली!
बाकी टाटा समूह, त्यांचा दानधर्म, ते टाटा ट्रस्ट मधून करत असलेली अवर्णनीय समाज सेवा ह्याबद्दल माहिती शोधल्यास उपलब्ध आहे. त्यावर वेगळे लिहायची गरज नाही. पण १९९१ मध्ये चेअरमन बनल्यावर ५ बिलियन डॉलर इतकी उलाढाल असलेल्या टाटा समूहाला २०२३-२४ मध्ये टाटा समूहाच्या त्याच तत्वांवर आणि मूल्यांवर अढळ रहात १६५ बिलियनपेक्षा जास्त उलाढाल आणि १० लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारा समूह बनवणाऱ्या एका अत्यंत हुशार, तत्त्वनिष्ठ, प्रेमळ, चाणाक्ष, निस्वार्थी आणि अतिशय साधे जीवन जगणाऱ्या उद्योगमहर्षी श्रीयुत रतन टाटा साहेब ह्यांचं आज निधन झालं आहे ! म्हणून हा लेख प्रपंच!
विशेषतः हल्ली आपल्या पैशांनी सरकार विकत घेणारे, भंगार भिकार नशेबाज बॉलीवूड नटनट्या नाचायला बोलावून त्यांच्यासह नाचकामाचे फोटो प्रसारित करून आपल्या भ्रष्ट श्रीमंतीची सूज बाजारात मांडणारे, व्यवस्थेला झुकवून आणि आपल्या दाराला जुंपून भ्रष्ट राजकारणी लोकांशी संगनमताने पैसा कमावणारे “व्यापारी” पाहिले की रतन टाटा ह्यांना(च) “उद्योगपती” म्हणावं अस वाटतं! मग ते सामान्य लोकांसाठी नॅनो सारखी गाडी बनवणे असो, ताज हॉटेलमध्ये हल्ला झाल्यावर तिथले कर्मचारी आणि इतर मृतांसाठी केलेले काम असो, जे आर डी टाटांनी सुरू करून नंतर सरकारने हडपलेली आपलीच एअर इंडिया परत सरकारला पैसे देऊन तिथल्या सरकारी वृत्तीच्या आणि वकुबाच्या स्टाफसकट विकत घेणे असो.. रतन टाटा साहेबांनी ते सर्व केलं. आजही अनेक नवनवीन स्टार्टअप मध्ये त्यांची स्वतःची वैयक्तिक आर्थिक गुंतवणूक आहे!
मी मागेही अनेक लेखांमध्ये उल्लेख केल्यानुसार लता, बाळासाहेब, रतन टाटा, अमिताभ, सचिन ही आमची काही श्रद्धास्थाने आहेत. बाळासाहेब आणि लता नंतर आज रतन टाटा साहेबही गेले! आमच्या श्रद्धेच्या मंदिरातील आणखी एक मूर्ती भंग पावली! भारताच्या उद्योग जगतातील ध्रुव तारा आज अस्ताला गेला. भारतातील philanthropy च्या कोहिनूरला आज तडा गेला. लाखो करोडोंचा पोशिंदा आज स्वर्गस्थ झाला. सर्वत्र धंदा आणि धंदेवाल्यांचा चिखल दिसत असताना त्यात उगवलेलं सचोटीचं दुर्मिळ कमळ आज कोमेजलं, भारताच्या प्रगतीच्या क्षितीजावरचा तेजस्वी सूर्य आज अस्ताला गेला. आज सर्वार्थाने #भारतरत्न रतन टाटासाहेब गेले! टाटा समूहाचे RNT गेले! आज जणु देवाचाच स्वर्गवास झालाय ! आजचा दिवस देशाच्या आणि माझ्याही आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे!
साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! ईश्वर तुम्हाला सद्गती देवो हीच प्रार्थना! फार फार वाईट झालंय आज !
.,..
लेखक : श्री मंदार जोग
माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈