☆ ‘डॉ. तारा भवाळकर कोण आहेत !‘ — लेखक : हेमंत राजोपाध्ये ☆ प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे ☆
८७ वर्षाची तरुण, तडफदार लेखिका!
इथल्या उग्र जातीय दर्प आणि पुरुषप्रधान दुर्गंधीने बरबटलेल्या विषम समाजव्यवस्थेची चीड असलेली..
केवळ परंपरेतील सत्त्वाचे पोवाडे गात बसण्यापेक्षा त्या परंपरातील हीण कसे दूर करता येईल, यासाठी आयुष्यभर लेखन- संशोधनासोबतच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारी..
उच्चभ्रू पेठांमधल्या आणि गढींमधल्या पवित्र सरंजामी वातावरणात झाकून ठेवलेल्या दुर्गंधी वास्तवांना समाजासमोर आणणारी…
तंजावरमधल्या राजे आणि दरबारी कवींपासून ते कैकाडी समाजातल्या उन्मुक्त बाणेदार ‘महामाये’पर्यंत सर्वांमध्ये सहज मिसळून जाणारी…
शनिवार पेठेतील वेदशास्त्रसंपन्न चित्रावशास्त्रींच्या व्युत्पन्न सहवासाच्या बालपणीच्या स्मृतींविषयी चिकित्सक आदर बाळगणारी…
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाखाली शिरजोर झालेल्या अमर्याद मुजोर पुरुषप्रधानतेच्या ‘हलक्या दिलाची’ चिरफाड करणाऱ्या आदिवासी बाईचं तेज अंगी बाणवणारी…
भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून, देवल, खाडिलकरांच्या नाटकांपर्यंत कानोसा घेत लोकनाट्य आणि अभिजन व बहुजन समाजातील विविध लोकपरंपरांचा समग्र, साक्षेपी आढावा घेणारी,
आदिशक्ती महामायेच्या महन्मंगल रूपाला कुबटपणा आणणाऱ्या व्यवस्थेत पिचलेल्या कैकाडी समाजातील स्त्रीपासून कथित उच्चभ्रू जातीय, वर्गीय सोन्याच्या पिंजऱ्यात डाळिंबाचे दाणे मिटक्या मारत खाणाऱ्या ब्राह्मण, मराठा स्त्रीपर्यंत समस्त स्त्रियांच्या मुक्तीची गरज ओळखणारी,
लोकश्रद्धांना गौण न मानता त्यांचं सामाजिक, राजकीय स्थान ओळखणारी मात्र अंधश्रद्धा आणि त्यातील शोषण यांच्याविरोधात ८४-८५ व्या वर्षीही खणखणीत आवाज उठवणारी,
अभिजन आणि बहुजन संस्कृतीतील अमर्याद विविधांगी मर्यादा आणि त्यांना उन्नत, समावेशक आणि प्रगल्भ करू शकणाऱ्या त्याच सांस्कृतिक संचितातले सत्त्व आधुनिकतेच्या चौकटीत बसवू पाहणारी,
डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या महविद्वानासोबत अभ्यास, संशोधन, लेखन करणारी, लक्ष्मण मानेंसारख्या शोषित समाजातून आलेल्या माणसासोबत तळागाळातील लोकांच्या दुःखांना वाचा फोडण्यात अग्रणी असणारी,
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या प्रागतिक विचारवंतांच्या कौतुक/आदरास पात्र ठरलेली,
हरिवंशराय बच्चन यांच्या संस्कृतप्रचुर मधुशालेचा अनुवाद करण्यापासून ते तेलुगू, तमिळ प्रदेशातील भटक्या स्त्रियांच्या गाण्यांतील शब्द आणि भावनांचा तरल पण चिकित्सक भाष्यासह अनुवाद करणारी,
अन्याय पाहून चिडणारी, रस्त्यावर उतरणारी, जवळच्या माणसांपासून ते मोठाल्या पदांवरील माणसांच्या चुका परखडपणे मांडणारी,
बाणेदार, आक्रमक, सहृदय, ग्रेसफुल, प्रेमळ बाई म्हणजे डॉ. ताराबाई भवाळकर.
त्यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं हे मराठी समाज आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विश्वासाठी सुखावह बाब आहे.
कर्कश, एकांगी आणि मुजोर झालेल्या राजकीय सामाजिक भवतालात अशा विद्वान, परखड आणि सहृदय व्यक्तींना पुन्हा अशा जबाबदारीची धुरा देणं हे येऊ घातलेल्या बदलाचं लक्षण आहे, ही आणखी सुखावह बाब!
ताराताई भवाळकर यांच्या ग्रंथसंपदेची आणि निवडक मानसन्मानांची सूची ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका डॉ. वीणा गवाणकर यांनी दिली आहे, ती अशी:
ग्रंथसंपदा
अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)
आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)
बोरी बाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)
मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)
मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
महामाया
माझिये जातीच्या (सामाजिक)
मातीची रूपे (ललित)
मायवाटेचा मागोवा
मिथक आणि नाटक
यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा (माहितीपर)
लोकपरंपरेतील सीता
लोकसंचित (वैचारिक)
लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
लोकांगण (कथासंग्रह)
संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
स्नेहरंग (वैचारिक)
सन्मान आणि पुरस्कार
पीएच. डी. च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.
आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं. ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)
‘लोकसंचित’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार
पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
(१. ताराबाईंच्या ग्रंथांची आणि मानसन्मानांची सूची आयती उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका Veena Gavankar यांचे आभार
२. चौफेर व्यासंगी वाचक, रसिक असलेले पुण्यातील ज्येष्ठ, सुप्रतिष्ठ व्यावसायिक आणि आर्याबाग सांस्कृतिक मंचाचे संस्थापक श्री. Kalyan Taware यांनी सूचना केल्याने हा परिचय लिहायची प्रेरणा मिळाली.)
लेखक : हेमंत प्रकाश राजोपाध्ये
प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈