श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “एक वरदहस्त जन्मतो तेव्हा !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब बंगळुरू मध्ये त्यांच्या प्रयोगशाळेत काही कामात मग्न होते. त्या शहरात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सेवा करीत असलेले डॉक्टर प्रसाद काही निमित्ताने साहेबांच्या प्रयोगशाळेत आले. त्यांनी सहज उत्सुकता म्हणून तेथील एका उपकरणास हात लावला. ते धातूचे उपकरण एका महत्वाच्या संरक्षण प्रणालीमध्ये वापरले जायचे होते. आणि तो विशिष्ट धातू पदार्थ खास प्रयोगांती तयार केला गेला होता.
डॉक्टर प्रसाद यांनी ते उपकरण दोन्ही हातांनी उचलून ते किती जड आहे, हे पाहण्यासाठी उचलले… तर ते अगदी सहज उचलले गेले ! एखादा प्याला पाण्याने भरलेला आहे असा आपला समज असतो आणि आपण तो त्याच्या वजनाच्या अंदाजाने उचलायला जातो आणि तो प्याला उचलला की तो अनपेक्षितपणे हलका आहे, हे आपल्या ध्यानात येते तेंव्हा जशी आपल्या मनाची अवस्था होते, तशी अवस्था डॉक्टर प्रसाद यांची झाली !
एवढे मजबूत आणि मोठे उपकरण आणि वजन अगदी नाममात्र ! डॉक्टर प्रसाद यांच्यातील मेडिकल डॉक्टर आता जागा झाला ! त्यांनी डॉक्टर कलाम साहेबांना विचारले… “ माझ्या पोलिओ रुग्णांना तीन चार किलो वजनाचे calipers (आधार देणाऱ्या धातूच्या पट्ट्या) शरीरावर वागवत वावरावे लागते. त्या पट्ट्या या धातूंच्या बनवल्या तर? “
कलाम साहेबांनी स्वतः रुग्णालयात जाऊन ते बालरुग्ण पाहिले… त्या धातूच्या पट्ट्यांचे वजन पेलत पेलत केविलवाण्या हालचाली करणारे… वीस – तीस रुग्ण होते !…. कलाम साहेब तात्काळ त्यांनी प्रयोगासाठी वापरायला म्हणून तयार केलेल्या धातूपासून पोलिओग्रस्त रुग्णांसाठी calipers तयार करण्याच्या कार्याला लागले…. देशाच्या संरक्षण विषयक प्रकल्पात अतिशय व्यग्र असतानाही साहेबांनी मुलांसाठी वेळ काढला… आणि तीन चार किलो वजनाचे caliper अगदी काही शे ग्राम वर आणून ठेवले… मुलांच्या शरीरावरचा आणि त्यांच्या पालकांच्या मनावरील भार या महान शास्त्रज्ञाच्या सहकार्यामुळे, संशोधनामुळे अगदी हलका झाला होता ! सुमारे पन्नास हजार रुग्णांना या नव्या पद्धतीच्या उपकरणाचा त्यावेळी लाभ झाला!
१५ ऑक्टोबर…. डॉक्टर कलाम साहेबांचा जन्मदिवस…. ! एवढा प्रचंड माणूस भारताला दिल्याबद्दल देवा… तुझे किती आभार मानावेत?
(१५ ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे जगाने मान्य केले. पण जगात हा दिवस तसा फारसा साजरा केला जात नाही, असे दिसते… पण आपण केला पाहिजे!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈