श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “प्राण घेतलं हाती !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कॅप्टन अरुण ‘सिंह’
तीन हजार फूट उंचीवरील डोंगरावरील गुहेत एक – दोन नव्हेत, तब्बल वीस अतिरेकी लपून बसलेले आहेत… ते कधीही खाली उतरून आपल्या भारताच्या सीमेत घुसून रक्तपात घडवून आणतील अशी खात्रीच आहे. आपल्या हद्दीत एक पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेकी घुसणे म्हणजे एकावेळी शेकडो नागरीकांच्या आणि सैनिकांच्याही जीवाला मोठा धोका.. हे तर वीस होते! ही पिसाळलेली श्वापदे माणसांत घुसण्यापुर्वीच त्यांना गाठून मारलं पाहिजे! ठरलं…
कॅप्टन अरुण ‘सिंह’ साहेब या श्र्वापदांचा समाचार घ्यायला निघाले.. सोबत निवडक सहकारी होतेच. पण त्या पहाडावर पोहोचायला तब्बल दहा तासांची उभी चढण चढावी लागली… खांद्यांवर, पाठींवर शस्त्रे घेऊन. निघताना थोडंफार काही खाल्लं असेल तेवढेच. सोबतीला अंधार आणि पाऊस होताच… पण थांबता येणार नव्हतं.
अतिरेकी शोधायचे आणि त्यांना खलास करायचे काम अतिशय धोकादायक. कारण ते अगदी आरामात नेम धरून बसलेले असतात. खालून वर येणारे लोक त्यांच्या शस्त्रांच्या टप्प्यात अलगद येतात. याला एकच उपाय जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर चालून जायचे… सिंह जसा हत्तीवर धावून जातो तसे!
आपण कोणत्या कामगिरीवर निघालो आहोत, कुठे निघालो आहोत हे घरच्यांना सांगण्याची सोय, परवानगी आणि इच्छाही नव्हती.
ही काही पहिलीच मोहीम नव्हती अरुणसिंग यांची. काश्मीर खोऱ्यात केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल एक सेना मेडल आधीच त्यांच्या नावावर आहे. घरी सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असलेले वडील आहेत, आई आहे. आजोबा सुद्धा फौजेत अधिकारी होते. त्यांच्या सारखाच गणवेश अरुण सिंग यांनी अंगावर चढवला होता.. स्वकर्तृत्वाच्या जोरावर.
अरुण सिंग यांनी केवळ सहा वर्षांच्या कारकीर्दीत अनेक कठीण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. यात पर्वतारोहण, अतिउंचीवरील युद्धाभ्यास, खोल समुद्रात सूर मारून कामगिरी फत्ते करणे, पाण्याखालून केले जाणारे युद्ध, कमांडो अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. पुढे ते स्वयंस्फूर्तीने 9, PARA SPECIAL FORCES मध्ये दाखल झाले.
त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी साहेबांचा साहाय्यक (ए. डी. सी. ) म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती, पण अरुण साहेबांना प्रत्यक्ष युद्धभूमीत लढण्यातच जास्त रस असल्याने त्यांनी ही मोठी संधी नाकारली.
कठोर शारीरिक मेहनत करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. एका प्रशिक्षणात पाठीवर चाळीस किलोग्राम वजन घेऊन साठ किलोमीटर्सचे अंतर चालून जायचे होते. त्यांच्या पाठीवरच्या पिशवीचा बंद तुटला. हे प्रशिक्षण नंतर पूर्ण करण्याची सवलत प्रशिक्षकांनी त्यांना देऊ केली होती. पण सवलत घेण्यास स्पष्ट आणि नम्रपणे नकार देऊन अरुण साहेबांनी एका हातात रायफल आणि एका हातात ती वजनदार पिशवी घेऊन निर्धारित वेळेत साठ किलोमीटर्स अंतर पार केले होते!
आज त्यांच्या नेतृत्वात निवडक सैनिकांची तुकडी अतिरेकी लपले होते त्या गुहेच्या अगदी समीप पोहोचण्यात यशस्वी झाली होती. पण अतिरेक्यांना चाहूल लागली आणि त्यांनी वरून बेफाम गोळीबार सुरु केला, हातगोळे फेकायला सुरुवात केली. आता सर्वांनाच धोका होता… आता काही नाही केले तर सर्वांनाच मरणाला सामोरे जावे लागणार….
अरुण सिंग त्वरेने गुहेकडे झेपावले… समोर आलेल्या एका अतिरेक्याच्या दिशेला ग्रेनेड फेकून त्याला उडवले…. तेवढ्यात दुसरा अतिरेकी अंगावर धाऊन आला… अरुण सिंग यांनी हातातल्या धारदार सुऱ्याने भोसकून त्याला यमसदनी धाडले.
तोवर इतर अतिरेक्यांच्या रायफलीतून सुटलेल्या काही गोळ्या अरुण सिंग यांच्या पायांत घुसल्या होत्या.. पण सहकाऱ्यांचा जीव धोक्यात होता म्हणून स्वत: पुढे होऊन स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता अरुण सिंग यांनी प्रखर हल्ला चढवल्याने मागील सैनिकांना आडोसा घेऊन गोळीबार करण्यास सज्ज होण्याची संधी मिळू शकली.
अरुण सिंग जखमी अवस्थेतच गुहेत शिरले…. आत लपलेले अतिरेकी अंदाधुंद गोळीबार करीत होतेच… अरुण सिंग यांच्या छातीत गोळ्या घुसल्या… पण तरीही न थांबता पुढे सरसावत आपल्या जवळ होते ते सर्व हातबॉम्ब त्यांनी गुहेत भिरकावून द्यायला सुरुवात केली… अजून तीन अतिरेक्यांच्या चिंधड्या उडाल्या! तोवर आपले बाकीचे सैनिक गुहेत शिरले आणि त्यांनी उर्वरीत अतिरेक्यांना थेट वरचा रस्ता दाखवला.
त्या दिवशी त्या गुहेत वीस मृतदेह पडले होते…. वीस जिवंत बॉम्बच जणू आपल्या बहादूर सैनिकांनी डीफ्यूज केले होते! पण या धुमश्चक्रीत कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया गंभीर जखमी झाले होते. तब्बल नऊ दिवस हा सिंह सैनिकी रुग्णालयात मृत्यूशी झुंजत राहिला… प्रचंड वेदना होत असतांनाही या अवघ्या सत्तावीस वर्षे वयाच्या शूर सैन्याधिकाऱ्याच्या मुखावर हास्य विलसत होते….. स्वतः ला होत असलेल्या त्रासापेक्षा आपल्या हातून घडलेल्या पराक्रमाचा आनंद त्यांना जास्त होता… यासाठीच तर अट्टाहास केला होता सैन्यात येण्याचा.
त्यांना आपल्या तिसऱ्या पिढीत शौर्याची परंपरा कायम राखायची होती. पण यावेळी मृत्यू वरचढ ठरला… आणि कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांच्या नावाआधी ‘हुतात्मा’ शब्द लागला!
दिवस होता २६ सप्टेंबर, १९९५. आपले वडील ले. कर्नल प्रभात सिंग आणि मातु:श्री सत्यदेवी यांना मागे ठेवून ‘अरुण’ नावाचा शौर्य-सूर्य मृत्यूच्या क्षिताजापल्याड मावळून गेला!
सैन्यात अधिकारी झाल्यानंतर अरुण सिंग पहिल्यांदा लष्करी गणवेशात घरी आईसमोर आले होते, तेंव्हा त्यांनी आईला छान साडी भेट म्हणून आणली होती आणि आग्रह करून लगेचच ती साडी तिला परिधान करून यायला सांगितले आणि दोघा मायालेकांनी छान फोटो काढून घेतला…. हा फोटो आता एक स्मरणचिन्ह बनून राहिला आहे आई-वडीलांसाठी.
‘अशोक चक्र’ हा आपल्या देशाचा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांना मरणोत्तर देण्यात आला. ले. कर्नल प्रभात सिंग (सेवानिवृत्त) आणि मातु:श्री सत्यदेवी यांनी कै. अरुण सिंग यांच्या वतीने हे ‘अशोक चक्र’ मोठ्या अभिमानाने स्वीकारले.
पंजाबातील पठाणकोट जिल्ह्यात सुजनपूर येथे जन्मलेला हा ‘सिंह’ जम्मू-कश्मीर मधल्या लोलाब खोऱ्यातील जंगलाचा ‘वाघ’ (Lion of Lolab Valley, Jammu-Kashmir) म्हणून सैन्य इतिहासात अमर आहे!
२२ सप्टेंबर…. कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया साहेबांच्या पराक्रमाचे स्मरण करण्याचा दिवस !
जय हिंद! 🇮🇳
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈