श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बोध दिवाळीचा – – –☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकी विचार मनी धरा 

हाच दिवाळीचा बोध खरा–

विवेकी :  फटाके-मुक्त दिवाळी साजरी करा. फटाक्यामुळे प्रदूषण होते.

धर्मांध :  का? 😡 आम्ही फटाके फोडणारच. 💥 कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे होणारे प्रदूषण तुम्हाला दिसत नाही. आम्ही हिंदुनी ४ दिवस फटाके फोडले की तुम्ही बोंबा मारता. हिंदुद्वेषी कुठले!

विवेकी :  कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे प्रदूषण होते हे खरे आहे; पण ते चालू असल्यामुळे आपल्याला कित्येक सुख-सुविधा मिळतात, त्यामुळे ते अपरिहार्य असले तरी तेही प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि फटाके फक्त दिवाळीतच नाहीतर पूर्ण वर्षभर क्रिकेट, निवडणूक, लग्न, वाढदिवसाला फोडले जातात. फटाका फोडल्यामुळे काय फायदा होतो याचे एकतरी उदाहरण तू देवू शकतोस का?

धर्मांध : (थोड्या वेळ गप्प) उदाहरण द्यायची आम्हाला गरज नाही. आम्हाला फटाके फोडताना आनंद होतो. फटाके फोडणे ही जुनी हिंदू संस्कृती आहे… आमची परंपरा आहेे. हिंदूंचा आनंद हिरावला तर याद राखा 💪कानाखाली “शिवसूर्यजाळ” काढू. 😡

विवेकी :  हा अहंकारच माणसाला रसातळाला नेतोय. खरंच या प्रदूषणामुळे सूर्यच एक दिवस असा सूर्यजाळ काढेल की, तुम्ही-आम्ही “मेलो” म्हणायलाही शिल्लक राहणार नाही. फटाका फोडल्याने स्वतःचे तसेच आपल्या अवतीभोवतीच्या अनेक लोकांचे नुकसान होते. तरीही तुला आनंद होणार असेल तर तो आनंद विकृत आनंद आहे. आणि मला सांग, हिंदूंच्या कोणत्या धर्म ग्रंथात दिवाळीत फटाके फोडावेत असे लिहिले आहे? खरे तर फटाके फोडणे ही आपली हिंदू संस्कृती नाही. ही विकृती चीन देशातून आपल्याकडे आली. जुनी वैगरे काही नाही. 150 वर्षापूर्वी भारतीयांना आजचे रासायनिक फटाके माहीतच नव्हते, हे तुला माहित आहे काय? मग परकीय चुकीची परंपरा आपण का स्वीकारायची? महत्वाचे म्हणजे फटाक्याचा उगम चीन मधला आहे. चीन मध्ये अतृप्त आत्मा ड्रॅगनसारखे प्राणी, भूते यांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर करीत. या मागील अंधश्रध्देला आपण पुरस्कृत करायचे का? याचाही विचार केला पाहिजे.

धर्मांध :  खरंच की, मला हे माहितच नव्हतं! 😳 असा मी विचारच केला नव्हता!! 🙀

विवेकी : फटाके फोडल्यामुळे ध्वनी-वायू प्रदूषण होते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मालमजूर वापरले जातात त्या बेकायदेशीर बाल-मजुरीला आपण नकळत प्रोत्साहन देतो. त्यांचे अनेक अपघात होतात, दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपयांची चक्क राखरांगोळी होते. 🔥पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. हे आहेत फटाक्याचे १००% दुष्परीणाम! हवा, पाणी, जमीन ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ती संपत्ती फटाक्याने प्रदूषित होते. त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्यच नाही काय? म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारातील फडणवीस-शिंदेसुद्धा आता फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करत आहेत. आपणच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायला हवे की नको? तसेच फटाका जाळणे म्हणजे पैशाचा दुरुपयोग करणे… कचरा करणे होय. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या क्षणिक आनंदासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? परदेशात फटाके वाजविण्यावर बरेच निर्बंध आहेत. कारण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहित झाले आहेत. त्याएवजी ते लेसर लाईट वापरुन फटाक्यांची आतषबाजी करतात.

धर्मांध : 😯😷

विवेकी : सर्वात महत्त्वाचे दिवाळी हा दिवा+रांगोळी याचा सण आहे. अरे दिवाळी तर आपण जोमाने साजरी करायचीच आहे, विरोध आहे तो अशास्त्रीय, अवैज्ञानिक परंपरांना… विनाकारण काही विचार न करता उठसूट जाळ काढत बसू नका… जरा थंड डोक्याने विचार करायला आपण केव्हा शिकणार?

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments