श्री जमशेटजी टाटा

? इंद्रधनुष्य ?

 टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्रांनो, आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!

नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.

१९०२ च्या नोव्हेंबरमधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबईची विजेची वाढती मागणी, गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.

१९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके, गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.

टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.

देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आताही असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे. देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!

हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या या पितामहांना…

कोटी कोटी प्रणाम

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments