सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ते १९८०चे दशक होते. तेंव्हाही तरुण पिढीवर पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव होताच. उलट तो नव्यानेच पडू लागलेला असल्याने संख्येने थोड्या लोकांवर असला तरी फार खोलवर उमटत होता. त्यातच निग्रो लोकांचा (हो, तेंव्हा ‘निग्रो’ हा शब्द निषिद्ध नव्हता!) एक संगीत ग्रुप होता- बोनी ‘एम’ ! त्या चार जणाच्या ग्रुपने एके काळी जगभर धूम करून टाकली होती. अगदी ताजेतवाने संगीत, मनाला भुरळ घालणारे सूर आणि त्यावेळच्या संथ नाचांना सोयीचा ठरणारा ठेका असलेली ही गाणी फार लोकप्रिय झाली होती. शिवाय गाण्याच्या संथ गतीमुळे त्यातील कविता समजणेही सोपे जाई. आणि खरे सांगायचे तर फॅशनला कसले आलेय लॉजिक? तेंव्हा ही गाणी अचानक फॅशनमध्ये आली होती, बस्स ! ‘आमचे’ आहे, ‘आमच्या पिढीचे’ आहे म्हणूनच ते मस्त आहे, अशी हट्टी श्रद्धा कशाबद्दलही बाळगू शकणारे ते निरागस वय ! त्यात या ग्रुपच्या गाण्यांनी आम्हाला चांगलेच पकडले होते. बोनी’एम’ची सगळीच गाणी खूप लोकप्रिय होत गेली. चटकन लक्षात येण्यासाठी ‘डॅडी, डॅडी कुल’ हे गाणे आठवले तरी पुरे ! तोच बोनी ’एम’ ग्रुप ! जगभर त्यांच्या लॉंगप्ले तबकड्या मिळू लागल्या.

घरात लॉंग प्ले रेकॉर्ड प्लेयर असणे हे खानदानी श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. ज्यांच्याकडे तो नव्हता त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये अशा तबकड्या लावल्या जात आणि फक्त कपावर कप चहा पीत बसलो तरी मुंबई पुण्यातील इराणी हॉटेल्स आणि इतरत्र गावाबाहेरची धाबेवजा हॉटेल्स मुलांना कितीही वेळ अशी गाणी, गझला, अगदी ‘शोले’ आणि ‘दिवार’चे डायलॉग्ज ऐकत बसू देत. तिथेच तरुणाईच्या सगळ्या ‘कहाण्या’ घडत. त्या हळव्या कहाण्यांच्या पुढच्या एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ कधीकधी अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणीत सामुहिकपणे सुद्धा लिहिली जाई. नंतर अगदी आतून हुरहूर लावणारे क्षण कधीकधी डोळ्यासमोर घडत तर कधी घडून गेलेल्या हुरहूर लावणा-या क्षणाची श्राद्धेही साजरी होत असत. असो, अजून काही काही घडत राही…!

बोनी ’एम’ ग्रुपच्या एका गाण्याने मला खूप खोल आणि खूप हळवी जखम करून ठेवली होती. अजूनही अनेकदा ‘युट्युब’वर हे गाणे ऐकून मी जुन्या ‘दाग’ चित्रपटातील तलत महेमूदने गायलेल्या गाण्याप्रमाणे ‘जख्म फिर से हरा’ करून घेतो. लीझ मिशेलने गायलेल्या या गाण्यात फक्त चार-पाच ओळीच होत्या. पण त्यांचा आशय मात्र अमेरिकेतील निग्रो लोकांचे काही शतकांचे दु:ख पोटात सामावण्याइतका सखोल होता.

“समटाईम्स आय फील,

लाईक अ मदरलेस चाईल्ड”

हे धृवपद गाण्यात वारंवार येई आणि लीझ मिशेलच्या को-या, धारदार पण मुग्धमधुर आवाजात ‘ऑन्ट दिनाज सॉंग’चे ते करूण शब्द काळीज चिरत जात. ‘कधीकधी मला आपण आई नसलेले मुल आहोत असे वाटते’ हे भाषांतर त्या कवितेतली आर्तता मराठीत आणूच शकत नव्हते. या गाण्यातली वेदना ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ मधली होती. तिचे भाषांतर शक्यच नव्हते. अलीकडे सहज या गाण्याबद्दल पुन्हा वाचले आणि मन अनेकदा भरून आले. अमेरिकेत हे गाणे पहिल्यांदा १४७ वर्षांपूर्वी म्हणजे १८७० साली गायले गेले. ते गाणा-या ग्रुपचे नाव होते ‘फिस्क जुबिली सिंगर्स. ’ पुढे या ‘ऑन्ट दिनाज सॉंग’च्या अनेक आवृत्या निघाल्या. मूळ कवितेतही बरेच बदल झाले, पण कृष्णवर्णीयांच्या गुलामीच्या वेदनातील तीव्रता त्यातून नेहमीच व्यक्त होत राहिली.

तब्बल २४५ वर्षे अमेरिकेसारख्या देशात माणसांची खरेदीविक्री जनावरांप्रमाणे केली जाई हे आज कुणाला खरेही वाटणार नाही. त्यावेळी निग्रोंची विक्री करताना जर एखादी निग्रो बाई लेकुरवाळी असेल तर गुलाम विकत घेणारा गोरा माणूस कधी फक्त काळे मुलच खरेदी करी. मग त्या मुलाला आईच्या कडेवरून खेचून काढले जाई आणि नव्या मालकाच्या स्वाधीन केले जाई. कोवळे लुसलुशीत मास खायला चटावलेल्या खाटीकाने गाईपासून तिचे पाडस ओढून काढावे तसे ! मग आफ्रिकेतील जंगलातून आणलेले ते काळे घाबरलेले रडणारे मूल गुलामांनी गच्च भरलेल्या जहाजातून श्रीमंत अमेरिकन जमीनदाराच्या शेतात आणले जाई. तिथे त्याच्यातून दिवसरात्र काम करणारा गुलाम घडविला जाई. खरे तर एक मूक पशूच. कारण त्याला मालकाची भाषा येत नसे. त्याची भाषा बोलणारे कुणी आसपास नसे. थोडी चूक झाली तर चामड्याच्या चाबकाचा कळवळून टाकणारा फटका ! संपले त्याचे माणूस म्हणून असलेले जीवन ! त्याच्या आफ्रिकेतील कुटुंबाची आणि त्याची परत कधीही भेट होऊ शकत नसे. मरेपर्यंत आपल्या गरीब काळ्या आईचे रडवेले डोळे आठवत, तिच्या वत्सल स्पर्शासाठी तडफडणारे ते मूल आयुष्यभर झुरत राही आणि जनावरांसारखे काबाडकष्ट करताना एक्कलकोंडे आयुष्य कंठून एक दिवस मरून जाई.

निग्रोंच्या या सार्वत्रिक सत्यकथेवर हे गाणे बेतलेले होते. त्यातील शब्द होते,

‘समटाईम्स आय फील

लाईक अ मदरलेस चाईल्ड,

अ लॉंग, लॉंग वे,

वे फ्रॉम माय होम.’

ध्रुवपदापाठोपाठ हे शब्द वारंवार येत तेंव्हा आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर त्या काळ्या निग्रो आईच्या हातातून तिचे मूल ओढून काढणारे क्रूर गोरे शिपाई दिसत राहत, तिचा मूक आक्रोश जणू आम्हाला ऐकू येत असे. आमचे भाबडे डोळे ओलावत. नंतर मग उगाच आमचे गाव, गावाकडचे कायमचे सुटलेले घर, मागे राहून गेलेले बालपण, देवाघरी गेलेले आईवडील, नोकरीसाठी सुटलेला देश, असे काही काही आठवत राही. त्यात लीझ मिशेलचे काळजात धारदार पाते घुसविणारे शब्द पुन्हा कानावर येत…

‘नो वे, नो, नो, नो वे, टू गेट होम.’… आता घर पुन्हा कधीच दिसणार नाही ही जीवघेणी जाणीव लीझ हृदयाला छिद्र पाडून आत खुपसते आहे असेच वाटे. अस्वस्थ करणारा अनुभव होता तो ! आशाताईनी गायलेले –

‘जिवलगा, राहिले दूर घर माझे,

पाउल थकले, माथ्यावरचे

जड झाले ओझे’

… हे जसे अगदी खोल आत शिरून अस्वस्थ करत राहते तसे या गाण्याने होई.

वय वाढते तसे हळूहळू माणूस आतूनही राठ होत जातो. आपण हळवे नाही असे मानणे आणि विशेषत: तसे दाखविणे मर्दपणाचे किंवा परिपक्वपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. आपण दुस-याच्या दु:खाने अस्वस्थ होणे, त्याच्या वेदनेने आपल्याला रडू येणे, दुर्बलपणाचे मानू लागतो. निबरपणाच्या प्रवासात नंतर त्याहीपुढे जावून स्वत:च्या दु:खानेही डोळ्यात पाण्याचा थेंब न येऊ देणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. हे असे आतले माणूसपण सुकविणे, डोळ्यातून थेंबच सांडू नयेत म्हणून मनातली 

‘ रिलेटिव्ह ह्युमिडीटी ’ संपविणे म्हणजे समर्थ होणे ठरू लागले आहे.

खरे तर साता समुद्रापलीकडे – अमेरिकेत ज्यांचे आई -वडील शतकांपूर्वी गुलामीचे जिणे जगले त्यांचे अडीचशे-तीनशे वर्षापूर्वीचे दु:ख आठवून स्वत: अस्वस्थ होणे हा आपल्या माणूसपणाचा पुरावा असतो. संत पौलाने म्हटलेले माणसाच्या आत असणारे ‘देवाचे घर’ शाबूत असल्याची ती खूण असते. जर काहीतरी सिद्ध करण्याच्या भरात ती वेदना जाणवत नसेल तर आपण देवाच्या घरापासून किती दूर आलोय, नाही? कदाचित आता घरी परत जाणे कधीच शक्य नाही !

“अ लॉंग वे….

नो, नो, नो वे 

टू गेट होम !’…

*******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 72086 33003

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments