श्री हेरंब देऊळकर
इंद्रधनुष्य
☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆
यो मां पश्यति सर्वत्र l
सर्वं च मयि पश्यति ll
…. श्रीमद्भगवद्गीतेमधल्या श्लोकाचा अर्धा चरण.
सिद्धावस्था प्राप्त झालेल्याची स्थिति या चरणात भगवंतांनी सांगितली. अखिल चराचराशी एकरुपता, अभिन्नत्व, ऐक्याचे म्हणा, वर्णन यात आले.
देवाचे नि प्रसन्नपणे l
जे जे घडेल बोलणे l
ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे l
या नांव प्रासादिक ll
….. अशा ज्या संतांनी प्रत्यक्ष परमेश्वराशी संवाद साधला व ज्यांनी प्रासादिक वाणीने आपल्यासारख्यांच्या आत्यंतिक हितासाठी (श्रेयस् ) कमीत कमी व सोप्या शब्दात जो उपदेश केला तो आपल्यापुढे ठेवावा म्हणून हा लेखनप्रपंच.
अवघी भूते साम्या आली l
देखिली म्यां कै होती l
विश्वास तो खरा मग l
पांडुरंग-कृपेचा ll
*
माझी कोणी न धरू शंका l
ऐसे हो कां निर्द्वंद्व l
तुका म्हणे जे जे भेटे l
ते ते वाटे मी ऐसे ll
…… सर्व भूते एकरूप आहेत असे माझ्या डोळ्यांना जेंव्हा दिसेल, तेंव्हाच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन. माझ्याविषयी कोणालाही जरासुद्धा शंका, भय वाटू नये अशी द्वंद्वरहित स्थिती झाली पाहिजे. आपल्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जी जी वस्तू दिसेल ती ती माझेच रूप आहे असे वाटले पाहिजे. समर्थ हेच सांगतात…..
कदा ओळखीमाजी दुजे दिसेना l
मनी मानसी द्वैत कांही वसेना l
बहुता दिसा आपुली भेटी झाली l
विदेहीपणे सर्व काया निमाली ll
एकदा तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत शेतात झाडाखाली पक्षी दाणे टिपत होते. महाराजांना पाहून सर्व पक्षी उडाले. तुकारामांना वाईट वाटले, त्यावेळी त्यांच्या मुखातून हा अभंग निघाला. जो पर्यंत पक्षी पुन्हा अंगावर येऊन बसत नाहीत तोपर्यंत महाराज प्राणायाम करून निश्चल उभे राहिले. शेवटी महाराजांचा प्रेमभाव, विश्वात्मक भाव प्रकट झाला.. म्हणजेच किंबहुना चराचर आपणचि झाला असे झाले हे ओळखून सर्व पक्षी पुन्हा खांद्यावर बसले व झाडावर नि:शंक होऊन जसे खेळतात तसे खेळू लागले, तेंव्हा महाराजांचे समाधान झाले.
संत एकनाथ यांचे गाढवाला पाणी पाजणे, संत नामदेवांचे कुत्र्याने चपातीची चवड नेली असता त्यांच्या मागोमाग तुपाची तामली घेऊन धावत जाणे हा समदर्शी भाव झाला. गाढव, कुत्रा आपण म्हणतो, त्यांना त्यांतील चैतन्य दिसले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवणे, ध्रुवाने प्राणायाम केल्यावर विश्वाचा श्वास थांबणे, कृष्ण गाई- वासरांना रानात नेत असताना वाटेत काटे-कुटे दगड धोंडे टोचत असता त्याचे दु:ख गोपीना होणे … हे सर्व चराचरात्मक भाव जागृत झाल्याचे द्योतक आहे. भगवद्गीता हेच प्रतिपादन करते…
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी l
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ll
सिद्धावस्था अजूनही प्राप्त न झालेल्या साधकाचे मनोरथ सांगून थांबतो……
गंगातीरे हिमगिरीशिला बद्धपद्मासनस्य
ब्रह्मज्ञानाभ्यसनविधिना योगनिद्रां गतस्य l
किं तैर्भाग्यं मम सुदिवसै: यत्र ते निर्विशंका:
कण्डूयन्ते जरठ हरिणा श्रुंगमंके मदीये ll
….. गंगेच्या तीरी हिमालयाच्या सान्निध्यात बसून पद्मासन इ. आसने सिद्ध करून घेतली, ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करता करता योगनिद्रा प्राप्त झाली. पण माझ्या जीवनात तो सुदिन केंव्हा येईल जेव्हा हिमालयातील हरिणे निर्भय होउन आलेली खाज कमी करण्यासाठी आपली शिंगे माझ्या मांडीवर घासतील …. तो मंगलदिन.
© श्री हेरंब देऊळकर
बेळगाव
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈