श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ अर्जुनाचे बाण आणि बीजगणित — माहिती संग्राहक : श्री चंद्रकांत बर्वे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
भास्कराचार्य (ई. सन १११४ ते ११८५) मध्ययुगीन भारतातील एक महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला. गणितातील वेगवेगळ्या गणना (Differential Calculus) शोधून काढणाऱ्या गणितीय शास्त्रज्ञांचे ते पूर्वाधिकारी होते, अगदी न्यूटन आणि लीबनीझ यांच्याही पूर्वी ५०० वर्षे.
भास्कराचार्य यांनी गणितावर आधारित संस्कृत भाषेत ४ ग्रंथ लिहिले. त्यातील एकाचे नाव आहे लीलावती, ज्याच्यात गणितासंबंधित काही कोडी आहेत, गहन प्रश्न आहेत, ज्यावर अनेक विद्वानानी संशोधन करून उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. हे कोड्यांसारखे प्रश्न श्लोकांच्या रूपात आहेत व त्यामुळे ते समजून घेणे सुद्धा कठीण वाटते. ह्या कोडीस्वरूप प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ह्या श्लोकांचा व्यवस्थित अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे.
हा खाली दिलेला श्लोक वाचा
पार्थ: कर्णवधाय मार्गणगणं क्रुद्धो रणे संदधे
तस्यार्धेन निवार्य तच्छरगणं मूलैश्चतुभिर्हयान् |
शल्यं षड्भिरथेषुभिस्त्रिभिरपि च्छत्रं ध्वजं कार्मुकम्
चिच्छेदास्य शिरः शरेण कति ते यानर्जुनः संदधे || ७६ ||
ह्या श्लोकाचा सरळ अर्थ म्हणजे जणू काही खाली दिलेला प्रश्नच आहे,
अर्जुन आणि कर्ण यांच्यातील महाभारत युद्धामध्येअर्जुनाने काही बाण सोडले, सोडलेल्या काही बाणांपैकी
- अर्धे बाण कर्णाने मारलेले बाण थांबविण्यासाठी खर्ची पडले.
- एकूण बाणांच्या वर्गमूळाच्या ४ पट बाण, कर्णाच्या रथाच्या घोड्यांना नियंत्रणात आणण्यासाठी वापरले गेले.
- ६ बाण कर्णाचा सारथी शल्य याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले गेले. (शल्य हा नकुल आणि सहदेव यांचा मामा होता)
- कर्णाच्या रथावरील छत्र व झेंडा, तसेच कर्णाचे धनुष्य, यावर ३ बाण मारले गेले.
- शेवटी एका बाणाने कर्णाचा वध करण्यात आला.
तर मग ह्या युद्धात अर्जुनाने किती बाण सोडले?
योग्य समीकरणाने ह्या प्रश्नातील गणिताचे उत्तर नक्कीच मिळू शकेल.
एकूण बाणांची संख्या X आहे असे धरून चालूया
बाणांसंबंधी जी काही विधाने वर केलेली आहेत त्यांना गणितरूपात असे मांडता येईल
X = X/2 + 4√X + 6 + 3 + 1
वरील गणित सोडवले तर अर्जुनाने सोडलेल्या एकूण बाणांची संख्या X = १०० अशी येते.
परंतु असे उत्तर काढल्यावर प्रश्न इथेच थांबत नाही. ह्या श्लोकात बरीच काही गुप्त माहिती आहे. आपण जर खोलात जाऊन विचार केला तर बरीच काही गुप्त माहिती आपण शोधू शकतो.
- कर्णावर मात करण्यासाठी अर्जुनासारख्या अतिरथी योद्ध्याला ५० बाण वापरावे लागले. यावरून आपल्याला कर्णाच्या युद्ध कौशल्याची महती कळते.
- रथ चालविणाऱ्या घोड्यांना थांबविण्यासाठी ४० बाण वापरावे लागले, यावरून त्या घोड्यांना रणभूमीवर लढण्यासाठी किती प्रशिक्षण दिले असेल हे आपल्या लक्षात येते.
- घोड्यांसाठी ४० बाण खर्च झाले, पण शल्य (रथाचा सारथी) फक्त ६ बाणांनी शरण आला, यावरून आपल्याला कळते की शल्य हा अर्जुनाच्या बाजूनेच होता.
- कर्णाचा रथ आणि धनुष्य नियंत्रणात आणण्यासाठी फक्त ३ बाण लागले, यावरून कर्ण किती हतबल असहाय्य होता हे कळते.
- आणि एकदा सर्व काही नियंत्रणात आले की शत्रूला नेस्तनाबूत करायला एकच बाण पुरेसा होता हे लक्षात येते.
तर अशी लढाई जिंकण्यासाठी आवश्यक असलेले नियम व कौशल्ये यांची कार्यप्रणाली असे सांगते की सर्वप्रथम शत्रूची लढाऊशक्ती संपवा, दुसरे म्हणजे शत्रूची वाहन साधने, उदाहरणार्थ रथ घोडे वगैरेंची हालचाल थांबवा आणि तिसरे म्हणजे त्याचा रथ, त्याची वाहतुकीची साधने नष्ट करून, नादुरुस्त करून, त्याला असहाय्य करा व अशातऱ्हेने सरते शेवटी शत्रूचा निःपात करा
आपण हाच श्लोक जर अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला तर
- संपूर्ण मुक्ती मिळविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यातील कामना आसक्ती यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे जरा कठीण आहे व म्हणून याला ५० बाण वापरावे लागतील.
- त्यानंतर पंचज्ञानेंद्रिये, तसेच पाच घोड्यांनी सूचित केलेले पंचविषय किंवा पंचतन्मात्रा नियंत्रणात आणा, याला लागणारे ४० बाण सुचवतात की हे सुद्धा कठीण आहे.
- पंचज्ञानेंद्रियांवर नियंत्रण आणल्यावर आत्मतत्त्वाने सूचित केलेल्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार यावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.
- कामना आसक्ती वगैरेचा त्याग केलात, जुने सगळे विसरलात, तर मोक्षप्राप्ती सहजसुलभ होऊ शकेल.
ही आपल्याला पूर्वजांनी दिलेली सनातन धर्मातील देणगी आहे. मूल्यांसहित विद्या – एका श्लोकात किती गहन अर्थ भरला आहे.
माहिती संग्राहक : चंद्रकांत बर्वे
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈