श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “काळीज-दगडावरची रेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
त्याचे घर तसे आणखी बरेच दूर होते. दोन डोंगर चढून उतरुन झालेले होते.. पण तेव्हढेच आणखी शिल्लक होते. भारतीय सैन्यातील एक तरुण कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान त्याच्या पलटणीमधल्या एका सैनिकाच्या घरी निघाले होते. त्यांच्यापाशी असलेल्या पिशवीतला ऐवज तसा हलका होता पण त्यांच्या मनावरचं ओझं प्रचंड मोठं होतं. युद्धात कामी आलेल्या योद्ध्याच्या घरी जाऊन त्याच्या माता-पित्यांना ती अतीव दु:खद वार्ता सांगायला मोठी हिंमत गोळा करावी लागते. तो अधिकारी तसा जड पावलांनीच चढण चढत होता. त्याच्यासोबत असलेल्या जवानाची अवस्थाही काही निराळी नव्हती. लढाईत त्याचाच जवळचा सहकारी गमावला गेला होता. आणि त्याचं घर दाखवायची जबाबदारी अधिका-यांनी त्याच्याच खांद्यावर दिली होती. एरव्ही मृत्यूला वाकुल्या दाखवणारे हे सैनिक अशा प्रसंगी भावुक होणं साहजिकच… किती केलं तरी माणसंच शेवटी. उद्या आपल्याही घरी कुणी असाच निरोप घेऊन जाऊ शकतं… हा विचारही येत असावा त्यांच्या मनात!
त्या पहाडावरून चार दोन माणसं खाली येत होती. सैनिकी गणवेशातील या दोघांना पाहून त्यातील एकाने विचारलेच… ” साब, किसके घर जा रहे हैं?” या साहेबांनी एक नाव सांगितले. प्रश्न विचारणा-या त्या माणसाने एकदा साहेबांकडे नीट पाहिले आणि तो काहीसा विचारात पडला. दिवंगत सेवानिवृत्त सैनिकांच्या घरी कशाला कोण येईल सांत्वन करायला? आणि तेही इतक्या दुरून? यांच्या पलटणीतला हा असा तसा सामान्य आणि सेवानिवृत्त सैनिक वारला, ही बातमी पलटणीपर्यंत कशी पोहोचली?
त्या ग्रामस्थाने शेवटी हिंमत करून विचारलेच… ” साब, आपको कैसे पता चला की यह फौजी बहादूर गुजर गये? ”
… त्यावेळच्या संदेशवहनाच्या व्यवस्थेनुसार ती बातमी तिथपर्यंत पोहोचणे तसे अशक्यच होते. आता विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही बुचकाळ्यात पडले.
“ हम तो उनके बेटे की शहादत की खबर लेके उसके घर जा रहे हैं !” साहेबांनी कसेबसे सांगितले. ते ऐकून त्या चौघांच्या चेहऱ्यावरची रया गेली. अर्थात त्या भागात अशा बातम्या येण्याची ही काही हजारावी वेळ असावी… पण तरीही धक्का बसतोच.
“वैसे कब गुजरे उनके पिताजी?” सेना अधिका-यांनी विचारले.
“ आज ग्यारह दिन हो गये, साब ! हम उनके घर से उनकी पत्नी को मिलकर वापस जा रहे थे!.. चलिये, साब… हम आपको लिये चलते हैं… ” असे म्हणत ते चारही जण पुन्हा पहाड चढू लागले.
“ म्हणजे ज्या दिवशी बाप गेला त्याच दिवशी लेकाने हे जग सोडले तर ! किती विचित्र योगायोग म्हणावा
हा !” साहेबांच्या मनात हा एकच प्रश्न घुटमळू लागला होता. लेकाच्या मृत्यूची खबर देताना आई-बापाशी सांत्वनार्थ काय बोलायचे याची त्याने इथपर्यंत येतांना हजारदा उजळणी केलेली होती… आणि आता तर एक नव्हे.. दोन मरणांची गोष्ट होती… त्याच्या डोक्यावर आता दोन दोन पहाड होते ! मनात योजलेली कोणतीही वाक्ये आठवेनात त्यांना. खूप कठीण असतं अशा आई-बापांना सामोरे जाताना.
आधीच जडावलेली पावले… ते घर जवळ आल्यावर आणखीनच मंद झाली.
ती तिच्या घराच्या अंगणात उन्हात उभी होती… तिथे थंडी असतेच नेहमी.. सूर्य दिवसाही त्यांच्या गावावरून जायचा कंटाळा करतो. हे दोघे पुढे झाले. दोघांनीही तिला सल्यूट केला.. वीरमाता होती ती !
“ साब, आपको कैसे पता चला की… मेरे साहब गुजर गये?”.. तिला वाटले… तिच्या नव-याच्या मृत्यूबद्दल सांत्वन करायला ते अधिकारी आले आहेत इतक्या दूर. तिचा नवरा होताच तसा लढवय्या. तीन तीन लढाया गाजवून आला होता परत.. जखमी होऊन… पण अभिमानाने. थोरल्या पोरालाही त्याने त्याच्याच पलटणीत धाडले होते.
क्षणभर एकदम स्मशान शांतता पसरली. स्वत:ला सावरून साहेब म्हणाले, ” माताजी, क्षमा चाहता हूं ! आपके बेटेने देश के लिये अपना बलिदान दिया है ! उनकी युनिफॉर्म ले के आया हूं ! ”
केवळ अकरा दिवसांपूर्वी दु:खाचं वादळ सोसलेलं ते म्हातारं होत चाललेलं काळीज हा तडाखा कसं सहन करेल?
… ती क्षणभर गप्प उभी राहिली आणि मटकन खाली बसली. मोठ-मोठ्याने शोक करण्याची त्यांच्यात पद्धत नव्हती. त्या पहाडांना अशा बातम्या ऐकण्याची सवय होऊन गेली असावी… ते पहाड काही उगाच शांत भासत नाहीत. आजची काही पहिली वेळ नव्हे. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात परकीय भूमीवर लढायला गेलेले कित्येक तरुण जीव परतलेच नव्हते.. आणि त्यांच्या बातम्याही अशाच उडत उडत समजल्या होत्या. काहींच्या तर बातम्याही आल्या नाहीत. सैन्य, सैन्याला आदेश देणारे अधिकारी बदलले… पण आदेश प्राणापेक्षाही जास्त मोलाचे मानणारे बदलले नव्हते. जगण्यासाठी लढत होते की लढण्यासाठी जगत होते कुणास ठाऊक? आणि ही परंपरा राखण्यात खंड नाही पडला कधी.
“कसं मरण आलं माझ्या लेकराला? वीरमरण आलं ना… माझी खात्रीच आहे ! ” गालावरचे अश्रू तसेच खाली ओघळू देत तिने विचारले !
“जी, माताजी. बहादूर था आपका बेटा. आखिरी सांस तक हार नहीं मानी ! ” असं म्हणत साहेबांनी गणवेश आणि त्याच्या काही वस्तू तिच्या हातात सन्मानाने ठेवल्या. काही चलनी नोटा असलेलं एक कागदी पाकीट ठेवलं. वरिष्ठ अधिकारी ते सर्वांत कनिष्ठ शिपाई अशा सर्वांचे एक दिवसाचे वेतन जमा करून ते पैसे कामी आलेल्या सैनिकाच्या घरी देण्याची त्यावेळी पद्धत होती… पेन्शन आणि इतर भरपाई हातात मिळेपर्यंत या पैशांचा चांगला उपयोग होत असे. त्या अधिका-याने आणि सोबत आलेल्या जवानाने तिला पुन्हा सल्यूट बजावला. तिने तिच्या नव-याच्या फोटोकडे एकदा नजर टाकली…. आसवं टपकत होतीच.
तेवढ्यात तिचा धाकटा लेक डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन अंगणात पोहोचला. “ साब, हमारे लिये क्या खबर लायें हैं आप?” त्याने विचारले. आणि त्याची नजर त्याच्या आईच्या आसवांकडे गेली.
“ जा.. इनके लिये तू चाय बना के ला दो कप. दूर से चलते हुये आहे हैं… हमारे लिये. ” तो मुलगा बिचारा निमुटपणे आत गेला आणि चार मिनिटांत बाहेर आला… हातात चहाचे कप होते. अधिकारी आणि जवान यांना त्या चहाकडे पाहण्याची हिंमत होईना.
“ बेटा, तेरा भाई भी गया तेरे पिता के साथ. अब उनकी जगह तुझे लेनी है. सेनाही हमारा परिवार है.. उससे रिश्ता बरकरार रहना चाहिये ! ”
त्यावर पोरगा खूप वेळ शांत राहिला… आणि म्हणाला… ” मग आई, तुझं एकटीचं कसं निभावेल, या घरात. कुणीच नाही तुझ्यासोबत !”
त्यावर ती म्हणाली, ” तुझ्या वडिलांविना कित्येक वर्षे काढलीच की मी एकटीनं. तुम्ही तर लहान लहान होतात. जखमी होऊन तुझे वडील घरी आले तेंव्हा कुठे आमचा खरा संसार सुरु झाला… जा. तू… बिनघोर !”
असं म्हणत त्या विधवा आणि आता पुत्रवियोगाने क्षत-विक्षत झालेल्या आईने लेकाचा गणवेश मोठ्या प्रेमाने तिच्या फडताळात ठेवला…. साहेब आणि जवान कितीतरी वेळ दगड झाल्यासारखे तिथेच उभे होते…..
पहाड उतरून जाता जाता त्यांना किती तरी वेळा मागे वळून पाहण्याची इच्छा झाली.. पण हिंमत नाही झाली ! अगदी पायथ्याशी आल्यावर त्या दोघांनीही त्या पहाडाकडे पाहून कडक सल्यूट केला आणि ते पलटणीकडे निघाले.. पलटणमधून एक कमी झाला होता… त्याची जागा लवकरच भरून निघणार होती !… पहाड शांतच होते… नेहमीसारखे !
(जगाचा इतिहास युद्धांचा आहे. या युद्धांत पडणा-या सा-याच आहुती मोजल्या जात नाहीत. पूर्वी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची पद्धतही नव्हती ! वरील कहाणी अगदी खरी… अशा माता आणि अशी लेकरं….. रणभूमीला रक्ताची ददात कधी पडू देत नाहीत. आपण त्यांच्याच कृपेने अस्तित्वात आहोत. जय हिंद !)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈