प्रा. सौ. सुमती पवार
इंद्रधनुष्य
☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
माझे गाव कापडणे…
मंडळी, आपले स्वातंत्र्यवीर कसे जीवावर उदार होऊन फिरत होते ते आपण वाचले. किती किती अभिमान दाटून येतो हो या वीरांविषयी मनात नि मला तर खूप धन्य वाटते की देशासाठी झगडणाऱ्या एका क्रांतिवीराच्या पोटी मी जन्म घेतला व ध्यानी मनी नसतांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर “ चला कापडण्याला” नावाचे पुस्तक २०२१ साली लिहून मी त्यांच्या ऋणातून थोडेफार उतराई होण्याचा प्रयत्न केला.
तसे तर आई वडीलांचे ऋण कधीही न फिटणारेच असतात. आणि शिवाय आता “ आपला महाराष्ट्र”धुळे, कपोले साहेबांच्या आग्रहास्तव “ माझे गाव कापडणे”ही मालिका मी दर रविवारी लिहिते आहे.आणि
महत्वाचे म्हणजे तुमचा तिला भरभरून प्रतिसाद आहे. खरे सांगते तुम्हाला, मोबाईल हातात घेईपर्यंत मी आज काय लिहिणार आहे हे मला मुळीच माहित नसते. पण एकदा का बोट ठेवले की तुम्ही जणू माझ्याकडून लिहवून घेता असेच मला वाटते. कारण त्या आधी मी एकदम ब्लॅंक असते. पण अचानक कोणी तरी सांगितल्या प्रमाणे लिहू लागते.तुम्ही सारे ते गोड मानून घेताच. बायाबापड्या, भाऊ वहिनी साऱ्यांचेच मला फोन येत असतात. भरभरून बोलतात मंडळी. मला ही छान वाटते. आपल्या लिखाणाचे चीज झालेले पाहून. असो..
आता, चला.. चले जाव कडे …
मंडळी ..
ह्या चिमठाणा प्रकरणाच्या आधी पासूनच म्हणजे १९४२ पासूनच ह्या क्रांतीकारकांनी गावोगावी ब्रिटिशांना सतावणारे नाना उद्योग सुरू ठेवले होते. ब्रिटिशांना भारतात काम करणेच मुश्किल करून टाकायचे.. सहकार्य तर नाहीच पण अडचणीच निर्माण करायच्या या उद्देशाने पूर्ण खानदेश पेटून उठला होता. त्यामुळे सरकारी कचेऱ्या जाळणे .. तारा यंत्राच्या तारा तोडणे.. जेणेकरुन संदेशवाहन यंत्रणाच बंद पडून पोलिस खाते अडचणीत यावे अशा प्रकारची धाडसी व जोखीम पत्करणारी कामे जीवावर उदार होऊन ही देशभक्त मंडळी करत होती. ते स्वत: क्रांतीकार्यात असल्यामुळे पैशांची वानवा होती. बंदी असतांनाही ही मंडळी सरकारी कचेऱ्यांवर झेंडा फडकवत होती.
नामदेव संपत पाटील यांनी साक्री कचेरीवर जाऊन झेंडा फडकवला. सवाई मुक्टी, पाष्टे येथील तरूणांनी शिंदखेडा मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न केला.अटक व्हायला हे देशभक्त जरा ही डगमगत नसत .जाळपोळीचे सत्र चालूच होते.
याच वेळी खानदेश मधील काही देशभक्तांनी एकत्र येऊन प.खानदेशमधील सरकारी विश्रांती गृहे जाळण्याचा कार्यक्रम ठरविला. श्री.विष्णू सीताराम पाटील यांनी चिमठाण्याचा(शिंदखेडा),श्री.व्यंकटराव धोबी यांनी बोराडीचा(शिरपूर), श्री.रामचंद्र पाटील यांनी धुळ्याचा,देऊरच्या नेत्यांनी साक्रीचा बंगला जाळायचे ठरवले.या कामी अप्रत्यक्षपणे मदत करणारे अनेक देशभक्त होते.यांचे काम रॅाकेलचे डबे पुरवणे , काळे पोषाख पुरवणे,पोलिसांवर नजर ठेवणे,पोलिस कारवाईची माहिती देशभक्तांना देणे अशी जोखमीची कामे इतर मंडळी करत असत..
समाजातील दानशूर लोक अशा क्रांतिकार्याला पैसे पुरवत असत. या कार्यक्रमासाठी श्री.रामेश्वर शेठ पोतदार धुळे, यांनी प्रथम ७००/- रूपये श्री. विष्णू सीताराम पाटील,कापडणे यांना दिले.” मुंबईहून अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी २००० रूपये पाठवले. “ या शिवाय अनेक सामान्य लोक देशभक्तांना विविध मार्गांनी मदत करत होते….
पुढे … विष्णूभाऊंनी चिमठाण्याचा बंगला जाळला …कसा ….? ते पाहू या पुढे.
२६ सप्टेंबर १९४२ रोजी तळोदा येथील रेस्टहाऊस पेटविण्यात आले.तेथल्या वॅाचमनला लोकांनी बांधून ठेवले. रेस्टहाऊसच्या मुख्य हॅालमध्ये रॅाकेल शिंपडून ते पेटविण्यात आले. त्या मुळे रेस्टहाऊसचा मुख्य हॅाल पूर्ण जळून गेला. ८००/- रुपयांचे नुकसान झाले.वॅाचमनने लोकांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली.त्यानंतर त्याने रेस्ट हाऊसची आग विझवली.
श्री.विष्णू सीताराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १३ ॲाक्टोबरला चिमठाण्याचा सरकारी बंगला जाळला.एका खोलीत बंगल्यातील सारे फर्निचर एकावर एक रचून ठेवले.त्यावर रॅाकेल शिंपडले आणि नंतर बंगला पेटवून दिला. त्यामुळे विश्रांतीगृहाचे छप्पर पूर्णपणे खाली कोसळले.२५०० /- रूपयांचे नुकसान झाले.(१९४४ सालातील) हा बंगला जाळतांना रॅाकेल शिंपडण्यासाठी डांगुर्णे येथील …..श्री.कैलासगीर गोकुळगीर महाराज यांच्याकडील धान्य मोजण्याचे माप अधेली (आदलं) देशभक्तांनी नेले होते. बंगला पेटवून देशभक्त परत येतांना त्यांना एकदम या भांड्याची आठवण झाली.कारण त्या भांड्यावर श्री.कैलासगीर महाराजांचे नाव होते. हे भांडे जर तसेच तेथे राहिले तर पोलिसांना आपला सुगावा लवकर लागेल,आणि आपण पकडले जाऊ हा विचार करून……
मग…
अर्ध्या रस्त्यातून … श्री.विष्णूभाऊ पाटील आणि श्री.गंगाधर पाटील हे मागे फिरले. भडकलेल्या आणि अग्नीज्वाळांनी लपेटलेल्या हॅालमध्ये त्यांनी प्रवेश केलाआणि मोठ्या मुष्किलीने ते भांडे त्यांनी परत आणले.
केवढे हे अग्नीदिव्य… डोळ्यांसमोर प्रसंग आणून पहा .. आणि हे सारे “ गुलामगिरीत सापडलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी …. ही मंडळी प्रसंगी आगीशीही खेळत होती.”
चिमठाणा बंगला जाळण्यात ….श्री रामचंद्र गोविंद पाटील,श्री.नरोत्तमभाई पटेल, श्री.यशवंत पाटील, जुनवणे, श्री.बाबुराव गुरव शिंदखेडा, श्री. माणिकलाल छाजेड(धुळे),श्री.नामदेवराव पाटील,पोलिस पाटील डांगुर्णे, गंगाराम पाटील डांगुर्णे,श्री.राजाराम पाटील डांगुर्णे,श्री.रामदास भील,डांगुर्णे,व विष्णूभाऊ पाटील कापडणे अशा १० व्यक्तिंनी भाग घेतला. मुख्य सहभाग कापडण्याचे विष्णुभाऊ पाटील यांचा होता. नेतृत्वही त्यांचेच होते.
चिमठाणा बंगला जाळल्यामुळे पोलिसखाते हैराण झाले.शेजारच्या गावावर त्यांचा मोठा रोष झाला.त्यांनी दडपशाही सुरू केली.सामान्य जनतेला धमक्या देणे सुरू झाले. तरीही पोलिसांना कोणी माहिती देण्यास तयार झाले नाही.एवढी निष्ठा खानदेशच्या जनतेच्या हृदयात निर्माण झाली होती. डिसेंबरच्या २८
तारखेला नंदुरबारच्या क्रांतिवीरांनी तेथील हिल बंगल्यास पेटविले.त्यामुळे रेव्हेन्यू खात्याच्या या इमारतीचे बाथरूम आणि छप्पर पूर्ण जळाले.सुमारे ६००/-रुपयांचे नुकसान झाले. बोराडीचे रेस्टहाऊस श्री.व्यंकटराव धोबी यांनी २९ मे १९४३ रोजी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात बोराडीच्या बंगल्याचे सुमारे १५००/- रूपयांचे नुकसान झाले.
मंडळी..
आज ह्या रकमा आज आपल्याला किरकोळ वाटत असल्यातरी तो १९४२ चा काळ आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याचे मूल्य लक्षात येईल. खानदेश पूर्ण पेटून उठला होता.जिकडे तिकडे जाळपोळ करून ब्रिटिश सरकारला या ना त्या प्रकारे कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालू होते.. व जीवावर उदार होऊन तरूण पिढीने
या धगधगत्या स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिले होते . देशभर “चले जाव” आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता व ब्रिटिश सरकार चवताळून उठले होते, व आपले वीर बिलकूल घाबरत नव्हते.
बरंय मंडळी, राम राम . जयहिंद.. जय महाराष्ट्र..
आपलीच,
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈