श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा,
शिरसाष्टांग प्रणिपात !!!
दादा, आज अनेक वर्षांनी तुला पत्र लिहीत आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर पत्रात नक्की काय लिहावे हे ठरवता येत नाही. तरीही तुला माझ्या मनातील भाव कळलेच असतील, कारण तू माझा निव्वळ दादा नाहीस तर माझा सद्गुरूही आहेस. आईबाबांच्या पाठीमागे तूच आमचा पालक झालास. त्यामुळे जसं आईला आपल्या लेकराच्या मनातील कळत, तसं तुला कळणे स्वाभाविकच आहे…..
आज अनेकजण अनेक ठिकाणी त्यांच्या मतीगतीनुसार ‘संजीवनीसमाधी’ दिन सोहळा साजरा करीत आहेत. विठूमाऊलींचा जयघोष होत आहे, हरिनामाचा जयजयकार होत आहे, नामसंकीर्तन चालू आहे, काही ठिकाणी ज्ञानेश्वरी सप्ताह सुरू आहे. हे सर्व पाहून मी आज खूप कृतार्थ आहे. तू नेमून दिलेलं कार्य काही अंशी तरी पार पाडता आले, याचे मला अतीव समाधान आहे. गुरुआज्ञेचे पालन करणे किती कठीण आहे याची जाणीव मला खचितच आहे, तरीही गुरूआज्ञा पालन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या कृपेने यामध्ये मला प्रचंड यश लाभलं… ! ‘हरिनामाचा प्रसार’ आणि गीतेची ओळख जगाला करून देण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आणि आपल्या कृपेने हे कार्य आजही अनेकजण करीत आहेत. अरे दादा, भावार्थदीपिका ही ज्ञानेश्वरी आहेच, परंतु त्याहून जास्त ती विज्ञानेश्वरी आहे. आपणच हे आपल्या तरुण बंधू भगिनींना आज पुन्हा सांगायला हवे, म्हणून हा पत्र प्रपंच केला आहे. अर्थात, हे सर्व आपल्या कृपेचे फळ आहे.
भागवत धर्माची पताका आपण माझ्या खांद्यावर दिलीत… ! आजपर्यंत सुमारे सातशे वर्षे ही परंपरा आपल्या भगवद्भक्त भारतीयांनी, हरिदासांनी चालू ठेवली आहे. यामागे विठूमाऊलीचे आशीर्वाद आहेत. हे कार्य निरंतर चालू राहावे असा आशीर्वाद आपण मला द्यावा. मागे मागितलेले ‘पसायदान’ आपण द्यायला तत्पर असालच, परंतु ते घेण्याची पात्रता प्रत्येक *हरिदासात यावी अशी कृपा आपण करावी. ‘आई’कडे हट्ट केलेला चालतो, हट्ट करावा म्हणून हे सर्व हट्टाने मागत आहे. चि. सोपान आणि माझी मुक्ताई यांना अनेक आशीर्वाद… !
आपले विहित कर्तव्य पूर्ण झाले की स्वतःहून निजधामास जायचे असते हे सामान्य जनांना कळावे म्हणून मी आपल्या परवानगीने ‘संजीवन समाधी’ घेतली…. ! आपले शरीर पंचमहाभूतात विलीन करणे इतकाच याचा हेतू… !
दादा, आज आई बाबांची पुन्हा आठवण झाली आणि माझ्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या….. ;
आता निरोप घेतो…. !
आपल्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत.
आपला चरणदास,
‘ज्ञाना’
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈