श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ कैदी नं आठसो बयालीस… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
माझ्या पुस्तकांच्या संग्रहात एक अनमोल कादंबरी आहे.. तिचं नाव..
‘थॅंक्यु मि. ग्लाड’. अनिल बर्वे यांची ही कादंबरी माझ्या आवडत्या पुस्तकांमध्ये अग्रभागी आहे.. अनेक वेळा ती वाचली आहे.. तिचं कथानक.. वीरभूषण पटनायक, ग्लाड, जेनी ह्या व्यक्तिरेखा.. त्यातील प्रसंग.. संवाद.. सगळं सगळं पाठ झालंय.
तर नुकताच एक लेख वाचण्यात आला.. ही कादंबरी जेव्हा लिहिली गेली.. त्यावेळी काय काय घडलं.. ही सगळीच माहिती या लेखात आहे.. आणि हा लेख लिहीला आहे दिलीप माजगावकर यांनी.
अनिल बर्वे हे नक्षलवादी विचारांचे समर्थक होते.. १९७५-७६ चा तो काळ. बर्वे एक साप्ताहिक चालवत होते.. रणांगण हे त्याचं नाव.. त्यातील काही लेखांमुळे त्यांच्यावर खटले दाखल झाले होते. अटक होऊन तीन चार महिने जेलमध्ये जाणार हे निश्चित होतं. त्यांना अटकेची भीती नव्हती.. काळजी होती पैशाची.. महिना दीड महिन्यात प्रेरणाचं.. म्हणजे बायकोचं बाळंतपण होतं..
तर अशातच ते एकदा श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांना भेटले. डोक्यात एका कादंबरीचं कथानक घोळत होतं.. ती कादंबरी म्हणजे हीच.. थॅंक्यु मि. ग्लाड..
त्यांची अपेक्षा होती की.. कोणी प्रकाशकाने दोन हजार रुपये द्यावे.. तुरुंगात ही कारणे पुर्ण करणार होते.
मग माजगावकरांनी मध्यस्थी केली.. आणि रामदास भटकळ यांनी पॉप्युलर प्रकाशनासाठी या कादंबरीचे हक्क घेतले.. अनिल बर्वे यांचा पैशाचा प्रश्न सुटला.
ते जेलमध्ये गेले.. पण चार महिन्यांत कादंबरीची एक ओळही ते लिहू शकले नाही.. कारण?
कारण बर्वेंना जेलमधल्या त्या शांततेत लिहायची सवयच नव्हती.
ते सांगतात..
घरी कसं, लोकांची ये जा.. देणेकऱ्यांचे तगादे.. प्रेरणाची भुणभुण.. या अशा सवयीच्या वातावरणात मला लिहायला जमतं.
जेलमधून बाहेर आल्यावर आठ दिवसांत बर्वेंनी कादंबरी लिहुन काढली. भटकळांकडे गेली.. एव्हाना आणीबाणी सुरू झाली होती.. सेन्सॉरची बरीच बंधनं होती.. त्यात कादंबरीच्या विषय हा असा.
मग ठरलं असं की.. माजगावकर यांच्या ‘माणुस’ मधुन दोन भागात कादंबरी प्रकाशित करायची.. काही अडचणी आल्या नाहीत तर पॉप्युलरनं पुस्तक प्रकाशित करायचं.
‘माणुस’ मध्ये कादंबरी प्रकाशित झाली.. भरभरून प्रतिसाद मिळाला.. अनिल बर्वे हे नाव लेखकांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसलं.
काही काळाने कादंबरीचं नाट्य रुपांतर झालं.
‘नाट्यसंपदा’ ने ‘थॅंक्यु मि. ग्लाड’ रंगमंचावर आणलं.. प्रभाकर पणशीकर यांचा ग्लाड.. आणि बाळ धुरीचा वीरभूषण पटनायक लोकांना आवडला..
काही काळाने मोहन जोशींचा ग्लाड आणि यशवंत दत्त यांचा वीरभुषण पण लोकांना आवडला. अनिल बर्वेंचं नाव झालं.. हिंदी मराठी चित्रपटांच्या पटकथांकडे ते वळले..
‘थॅंक्यु मि. ग्लाड’ या कादंबरीने आणि नंतर नाटकाने अनिल बर्वे यांना पैसा, प्रसिध्दी सगळं काही मिळालं. आणि या काळातच डॉ श्रीराम लागू यांच्या डोक्यात एक कल्पना आली होती. या कादंबरीवर एक उत्कृष्ट हिंदी चित्रपट होऊ शकतो असं त्यांना वाटतं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुलजार यांनी करावं असंही त्यांच्या डोक्यात होतं.. या संदर्भात डॉ लागु गुलजार यांना भेटलेही होते.. गुलजार यांनी यात रसही दाखवला होता. एकदा बसुन कादंबरीचे कथानक ऐकायचं हेही ठरलं.
गुलजार यांना कादंबरीचं कथानक ऐकवायचं होतं.. पण वेळ जमून येत नव्हती.. इकडे अनिल बर्वे यांना खुप घाई झाली होती. ते डॉ लागुंना म्हणत होते..
“ इतर निर्माते.. म्हणजे राज खोसला, हृषिकेश मुखर्जी माझ्या मागे लागले आहे.. मी त्यांना थांबवुन ठेवलं आहे.. लवकर काय ते ठरवा.. तुमच्यामुळे माझं नुकसान होतंय.. मला पैशाची गरज आहे.. सध्या हजार रुपये तर द्या. ”
असं दोन तीन वेळा घडलं.. डॉ लागूंनी बर्वेंना वेळोवळी हजार रुपये दिले..
पण नंतर या चित्रपटाची गाडी पुढे गेलीच नाही.. गुलजार आणि डॉ लागुंचं बोलणं काही ना काही कारणाने लांबत गेलं.
डॉ लागु यांनी सगळं ठरवलही होतं..
गुलजार यांचं दिग्दर्शन..
ते स्वतः मि. ग्लाडच्या भुमिकेत..
आणि कैदी नं आठसो बयालीस वीरभूषण पटनायकच्या भुमिकेत..
अमिताभ बच्चन..
पण तो योग आलाच नाही
.. एका सुंदर चित्रपटाला रसिक मुकले.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈