श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची ! 

 ”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा !”.. मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच ! आज मी मानसशास्त्रातील डीग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला.

मी म्हटलं, ”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे, मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात… एख्याद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून !” 

बाबा म्हणाले, ”आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरुण आहे.. तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ” 

.. हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका, पण एक अडचण आहे… त्याचं एक लग्न झालंय आधीच !” 

माझ्या चेहऱ्यावरचं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, ”अगं आर्मी ऑफिसर आहे तो… तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच ” 

माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो “.

त्यावर बाबा म्हणाले, ” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन. डी. ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहरादून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…’ स्वोर्ड ऑफ ऑनर ! ‘ हमने तुम्हारे लिए बात चलायी है…. ! “ 

… “ यानंतर बाबा माझ्याशी, आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझे कशातही लक्ष नव्हते…. मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं…. माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला.

मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रँक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या… बाबा म्हणालेच होते…’ बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे ! ‘ 

बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिनसाहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले.. वर्ष होते १९८५ ! साहेबांचे पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. ‘ वन्स अ‍ॅन आर्मीमॅन… ऑल्वेज अ‍ॅन आर्मीमॅन ‘च्या चालीवर मीही आर्मी वुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंबऱ्यापेक्षा त्यांचं मन ‘लाईन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोल’वरच्या उंबऱ्यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे “ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे संभालू? “ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे ‘ Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियनमध्ये पहिले पोस्टिंग झालेले ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C. D. S. अर्थात ‘चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर. त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर फुलांसारख्या दोन मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया, चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरुण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर? हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं लागतो… मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपिडीतांसाठी केलेल्या कामाचा अनुभव, या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते.. एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी… शोभली तर पाहिजेच ना? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते.. आणि ते स्वत: एक स्टार… मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार… दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलावारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिन साहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हँडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे… पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली… ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली… आणि मी ती आनंदाने साधतही होते…. शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association) ची प्रमुखही झाले होते… साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते… वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती… एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला मिळत असे… ८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते… आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे…. त्यांच्या हातात हात घालून !!! “ 

तो दुर्दैवी अपघात ८ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता.

… सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! जय हिंद ! जय हिंद की सेना ! 

(उपलब्ध माहितीवरून, संदर्भावरून, जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले हे स्वलेखन) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments