सौ. उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
स्व विंदा करंदीकर
श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’
(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)
मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.
श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.
एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “
मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.
कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.
भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले, ” चला, व्यवहाराचे उरकून टाका. “
संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “
आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”
पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”
संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “
आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.
दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “
भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “
एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.
त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.
मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”
अधिकार्याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.
आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”
भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “
भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..
विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.
स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.
पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.
परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….
एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.
राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “
…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “
चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”
….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.
चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “
५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !”
लेखक : प्रा. हरी नरके
प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈