सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “जबरा पहाडिया – ऊर्फ तिलका मांझी” ☆ सुश्री शोभा जोशी ☆
‘स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय ‘असं अमेरिकन फिलाॅसाॅफर खलिल जिब्राननी म्हटलं आहे. इंग्रजांनी आपल्या देशाच्या आत्म्यावरच घाला घातला होता. त्याला इंग्रजांच्याआधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.
ईस्ट इंडिया कंपनीने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणीची सनद मिळविली. तो १८व्या शतकाचा उत्तरार्ध होता. त्या काळापर्यंत भारतीय राजे जनजातींकडून महसूल वसूल करित नसत. पण जनतेचे अधिकाधिक शोषण करण्यासाठीच इंग्रजांनी भारतीय जनतेवर जबरदस्त महसूल लादला. त्यामुळे त्या भागातील सर्व जमातीच्या लोकांनी इंग्रज सत्तेविरूध्द लढे दिले. इंग्रजांनी, भारताच्या पूर्व व दक्षिण भागातील प्रदेश सर्वप्रथम गिळंकृत केल्याने याच भागातील भारतियांनी सर्वप्रथम त्यांना विरोध केला. म्हणून या भागातील क्रांतीवीर आद्यक्रांतीकारक ठरतात. त्यातील तिलका मांझी हा इंग्रजांविरूध्द लढणारा पहिला क्रांतिकारक ठरला.
बिहारच्या, बंगालला लागून असलेल्या राजमहल व भागलपूरमधल्या पहाडातील संथाल जमातीचा तिलका मांझी हा एक बहाद्दूर, शूरवीर व कुशल संघटक होता. त्याने या प्रदेशातील हिंदू-मुस्लीमांसह अन्य जातींमधीलही लढवय्यांचे उत्तम संघटन करून इंग्रजी सत्तेशी प्राणपणाने टक्कर देऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
तिलकाचा जन्म ११ फेब्रुवारी १७५० रोजी सुलतानगंज ठाण्याअंतर्गत तिलकपूर या गावी, संथाल जमातीतील मुर्मू समाजात झाला.
डोंगर दर्यातील निवासामुळे त्याचे शरीर दणकट बनले होते. त्याच्या अंगी असलेल्या ताकदीमुळे त्याला जबरा पहाडिया म्हणत. परंपरागत शिकारीचा व्यवसाय असल्याने तो नेमबाजीत तरबेज तसेच धाडसी होता. त्याच्या अंगी एक अध्यात्मिक शक्ती होती. ती त्याला कशी प्राप्त झाली माहित नाही. पण तो जे म्हणेल तसेच घडून येई असं म्हणतात. त्याच्या सात्विक जीवनपध्दतीमुळे तरूणांचा त्याच्याकडे सतत ओढा असायचा. त्याच्या अंगी असलेल्या अध्यात्मिक शक्तीमुळे लोकांची त्याच्यावरची श्रध्दा वाढू लागली. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांविषयी त्याच्या मनात भेदभाव नव्हता. लोकांचा छळ करणार्या इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकलून द्यायचा त्याने दृढसंकल्प केला.
भागलपूर मध्ये, आपल्या संकल्पपूर्तीसाठी तो तरूणांच्या गुप्त सभा घ्यायचा. ‘ एकी हेच बळ ‘हे त्याला माहित होतं म्हणून आदिवासी हिंदू व मुसलमानांचे त्याने एक उत्तम संघटन केले. ते सर्व लोक लहानपणापासूनच निशाणबाजीत तरबेज होते. वनवासींची जमीन, शेती, जंगलं, झाडं यावर इंग्रजांनी अधिकार गाजवायला सुरूवात केली होती.
इंग्रज, त्यांचे दलाल, जमीनदार, सावकार हे सर्व मिळून करीत असलेल्या शोषणाविषयी तिलकाने लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणिाइंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचे याविषयी त्यांची मने तयार केली.
गंगेच्या काठच्या प्रदेशातून मार्गो व तेलियागदी या दर्यांमधून येणारा जाणारा इंग्रजांचा खजिना लुटून गोरगरीबांच्यात वाटून टाकण्यास त्याने सुरूवात केली. तो अत्यंत निःस्वार्थी होता. सन १७७६ मध्ये आॅगस्टस क्वीवलॅंड राजमहलचा मॅजिस्ट्रेट म्हणून आला. त्यानंतर तो भागलपूरचा मॅजिस्ट्रेट झाला.
गंगा व ब्राह्मी नद्यांच्या दुआबातील जंगल तराईच्या प्रदेशात तसेच मुंगेर, भागलपूर व संथाल परगाण्यात तिलकाच्या इंग्रजांशी अनेक लढाया झाल्या. तिलका मांझी त्यांना पुरून उरला. त्याच्या नेतृत्वाखालील वनवासी इंग्रजांना भारी पडत होते. इंग्रजांनी रामगढ कॅम्पवर ताबा मिळवला होता. तिलकाने पहाडिया सरदारांना बरोबर घेऊन १८७८मध्ये इंग्रजांचा पराभव करून रामगढ कॅम्प मुक्त केला.
जानेवारी १७८४ रोजी तिलका मांझीने भागलपूरवर चढाई केली. एका ताडाच्या झाडावर चढून त्याने, घोड्यावरून जात असलेल्या क्लीवलॅंडच्या छातीवर बाण मारला. क्लीवलॅंड तात्काळ घोड्यावरून खाली पडला आणि लगेच मरण पावला. त्याच्या निधनाने इंग्रज सैन्य हबकून गेले आणि मार्ग सापडेल तिकडे पळून गेले.
तिलका मांझीचा विजय झाला. त्याचे सैन्य विजयाचा आनंद साजरा करत असताना रात्रीच्या अंधारात सर आयर कूट व पहाडिया सरदार यांनी मिळून तिलका मांझीच्या बेसावध सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईत तिलका मांझीचे बरेच सैनिक मारले गेले आणि पुष्कळसे गिरफ्तार करण्यात आले. तिलका मांझी आपल्या उरलेल्या सैनिकांसह सुलतानगंजच्या डोंगरात आश्रयाला निघून गेला आणि पुढची योजना ठरवू लागला. नंतर काही महिने त्याचे सैन्य इंग्रज सैन्याला आणि पहाडिया सैनिकांना गनिमीकाव्याने लढून बेजार करत होते.
तिलका मांझीचा पाडाव कसा करावा या विचाराने सर आयर कूट संत्रस्त झाला होता. त्याने तिलकाचे आश्रयस्थान असलेल्या डोंगरांना वेढे दिले. त्यांना बाहेरची रसद मिळू दिली नाही. अन्नपाण्यावाचून तिलकाच्या सैनिकांचे हाल होऊ लागले. तेव्हा गनिमीकाव्याने लढणे सोडून त्याने इंग्रजांशी आमने – सामने लढायचे ठरविले. आपल्या सैन्यासह तो डोंगर उतरून खाली आला व निकराने लढू लागला. त्या लढाईत धोक्याने तिलका इंग्रजांच्या हाती सापडला. त्याला जेरबंद करण्यात आले. सर आयर कूट त्यामुळे आनंदाने बेहोश झाला. त्याने तिलका मांझीला दोरखंडाने बांधून चार घोड्यांकरवी भागलपूरपर्यंत रस्त्यावरून फरपटत नेले. त्याचे अंग अंग सोलून निघाले तरी तो जिवंत राहिला. सर आयर कूटने त्याला भागलपूरच्या एका झाडावर फाशी दिली. नंतर त्याचे प्रेत त्या वडाच्या बुंध्याशी बांधून त्याच्या छातीत मोठे मोठे खिळे ठोकले. अशाप्रकारे या महान आदिवासी नेत्याने स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भागलपूरमधील त्या चौकाला ‘ तिलका मांझी चौक ‘ असे नाव देण्यात आले आणि त्या चौकात एक चबुतरा उभारून त्यावर तिलका मांझीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले.
© सुश्री शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈