श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “नीलवर्ण मृत्यू… कृष्णवर्ण देवदूत !! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आपले भगवान श्रीकृष्ण नीलवर्ण, आपले प्रभू श्री रामचंद्र नीलवर्ण…. आपले भगवान श्री शिवशंकर नीलकंठ ! निळा रंग विशाल, अथांग अवकाशाचे प्रतिक. पण सामान्य मानवाच्या देहावर, त्यातल्या त्यात तान्ह्या बाळांच्या नाजूक कांतीवर नखं, ओठ इत्यादी ठिकाणच्या नाजूक त्वचेवर निळ्या रंगाची छटा… म्हणजे साक्षात मृत्यूची पदचिन्हे ! वैद्यकीय भाषेत या अवस्थेला ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ असे नाव आहे.
सुमारे ८० वर्षांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेत एका वैद्यकीय महाविद्यालयात एक हृदयशस्त्रक्रिया सुरु होती. ती पहायला तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग हे दोन तज्ज्ञ शल्यविशारद. या दोघांनी या रुग्णाचे हृदय उघडले होते…. रुग्णाचे वय होते पंधरा महिने… मुलगी होती… तिचे नाव होते Eileen Saxon. पण या दोन्ही डॉक्टरांच्या मागे उभे राहून
… ही शस्त्रक्रिया नेमकी कशी करायची याचे मार्गदर्शन करत होती एक वैद्यकीय डॉक्टर नसलेली व्यक्ती… त्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून नेमणूक असलेला एक कृष्णवर्णीय माणूस !
शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असती तर त्या दोन्ही डॉक्टरांचे संपूर्ण वैद्यकीय आयुष्य उध्वस्त झाले असते. शस्त्रक्रिया करताना तसा प्रसंग उद्भवला सुद्धा होता…. पण वैद्यकीय पदवी नसलेल्या त्या कृष्णवर्णीय माणसाने वेळीच मार्ग दाखवला आणि ते मूल पुन्हा श्वास घेऊ लागले… बाळाच्या शरीरावरील निळे डाग गेले… आणि बाळाची कांती गुलाबी झाली… !
जगातली अशा स्वरूपाची ती पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती… जगभरात डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग यांचे नाव झाले…. लाखो बालके त्या विशिष्ट विकारातून मुक्त झाली. काय होता तो विकार?…..
… नायट्रेट नावाचा पदार्थ रक्तात गेला की त्याचे नायट्राईट मध्ये रूपांतर होते. आणि यामुळे रक्ताची प्राणवायू वहन करण्याची क्षमता अत्यंत कमी होते… त्यामुळे हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. यावर १९४४ पर्यंत काही उपाय सापडत नव्हता. विशेषत: अमेरिकेत या आजाराने खूप लोकांचा, विशेषत: बालकांचा बळी घेतला होता. नायट्रेट असलेले विहिरीचे पाणी पोटात जाणे, ते पाणी वापरून तयार केलेले द्रवपदार्थ, खाद्यपदार्थ पोटात जाणे अशी काही कारणे यामागे होती. शिवाय हा विकार अनुवांशिक सुद्धा आहेच.
सुतारकामाचे धडे आपल्या वडिलांच्या हाताखाली राबून गिरवणारा एक तरुण. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याने सात वर्षे अधिकचे काम करून काही रक्कम बँकेत जमा करून ठेवली होती. पण त्यावेळी आलेल्या जागतिक मंदीमुळे बँक बुडाली आणि याचे स्वप्नसुद्धा. पण पठ्ठा धैर्यवान होता. पुन्हा पैसे जमा करण्याच्या उद्योगाला लागला. जादाची कमाई करावी म्हणून एका वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून त्याने चाकरी स्वीकारली.. तुटपुंज्या वेतनावर. रंगाने काळ्या असणा-या कर्मचा-यांना तेथे प्रवेश करण्यासाठी मागील दाराने यावे-जावे लागे… त्या इमारतीत प्रवेश करणारे ते एकमेव कृष्णवर्णीय असत… इतर काळ्या लोकांना तिथे प्रवेश नव्हता…. इतका वर्णद्वेष त्या काळी अमेरिकेतही होता.
डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक हे जॉन्स हाफ्कीन्स वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर डॉक्टर हेलन ताऊसिग या लहान मुलांच्या डॉक्टर होत्या. या आजारावर उपाय शोधण्याचा आग्रह डॉक्टर हेलन यांनी धरला आणि डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी तसा प्रयत्नही सुरु केला. कुत्र्यांच्या हृदयात असा विकार निर्माण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून, रक्तवाहिन्यांची वेगळी जोडणी करून काही करता येते का, हे त्यांनी आजमावयाला सुरुवात केली. त्या सफाई कर्मचाऱ्याने त्या कामात मदत करणे स्वत:हून स्वीकारले. सुतार काम सफाईने करण्याची सवय असलेल्या या तरुणाने कित्येक कुत्र्यांची हृदये उघडून त्यात तो विकार निर्माण करण्याचा यत्न कित्येक दिवस सुरूच ठेवला. त्यात त्याचा इतका हातखंडा झाला की, इतर प्रशिक्षित सहाय्यकाना जे काम शिकायला सहा महिने लागत होते, ते काम हा माणूस चार दिवसांत शिकला… आणि एके दिवशी त्याने त्यात यशही मिळवले… त्याने रक्तवाहिन्या अशा काही जोडल्या होत्या की जणू त्या तशा जन्मत:च, नैसर्गिकरीत्या तशाच असाव्यात…. देवाने बनवलेल्या असतात तशा !
अक्षरश: डोळे बंद करून तो रक्तवाहिन्या ओळखू, जोडू, कापू शकायचा. हे पाहून डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती दिली… मात्र पगार स्वच्छता कर्मचाऱ्याएवढाच. फक्त एक झाले की… त्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील दाराने प्रवेश करणारा तो पहिला काळा माणूस ठरला !
तो विकार मुद्दामहून निर्माण केल्यानंतर तो विकार बराही करण्याचे तंत्र डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक आणि या काळ्या माणसाने विकसित केले. त्यासाठी लागणारी हत्यारे याच काळ्या माणसाने स्वत: तयार केली ! दरम्यानच्या काळात या काळ्या माणसाने अनेक वेळा अनेक प्रकारचे अपमान सहन केले. बायको, दोन मुली यांचा खर्च भागवण्यासाठी हा माणूस मोकळ्या वेळात सुतार कामही करू लागला. एवढेच नव्हे तर त्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकांनी दिलेल्या पार्टीत तो चक्क वेटरचे कामही करत होता.. पैशांसाठी. खरे तर आता तो वैद्यकीय प्रयोगशाळा सहाय्यक होता… पण त्याला तसा मान आणि वेतन देणे मात्र तेथील गोऱ्या कातडीच्या व्यवस्थेने नाकारले. यामुळे एकदा तर तो माणूस नोकरी सोडून निघालाही होता… पण जगभरातील लहानग्या लेकरांचे नशीब थोर… तो कामावर परतला. आणि मग तो पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेचा इतिहास घडला.
डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांच्या कामाची दखल साऱ्या वैद्यकीय विश्वाने घेतली.. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला… पण खुद्द डॉक्टर आल्फ्रेडसुद्धा या काळ्या माणसाच्या अतुलनीय योगदानाचा साधा उल्लेखही करण्यास धजावले नाहीत. आपण शोध लावलेल्या कृतीचे जग कौतुक करत असताना हा मात्र दूर उभा राहून हे सारे ऐकत होता ! साहजिकच त्याने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.. जाताना मात्र तो व्यवस्थेविरुद्ध बोलून गेला… पण अशक्त लोकांचे बोल सशक्त व्यवस्थेच्या कानांवर काहीही प्रभाव टाकत नाहीत !
पण त्याच्या पत्नीने त्याला त्या कामावर परत जाण्यास प्रोत्साहित केले… कारण त्याला त्याच्या आयुष्यात तेच करायचे होते… लेकरांचे जीव वाचवायचे होते… नव्या तरुण डॉक्टरांना प्रशिक्षित करायचे होते. तो प्रयोगशाळेत परतून आला… पुढे शेकडो प्रशिक्षणार्थी तरुण डॉक्टरांना शिकवले. डॉक्टर आल्फ्रेड दुस-या विद्यापीठात नोकरीस निघाले होते… त्यांनी यालाही सोबत चल म्हणून गळ घातली… पगार चांगला मिळेल असेही सांगितले.. पण हा गेला नाही ! सुमारे ४५ वर्षे शिकवत राहिला. मध्ये एकदा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो का ते पहायला गेला होता… पण अपुरे शिक्षण पाहून त्याला कुणी प्रवेश दिला नाही… अनुभव तर प्रचंड होता… एखाद्या निष्णात डॉक्टरएवढा. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे त्याला अशक्य होते…. मग तो शिकवण्यात रमला ! एका निष्णात डॉक्टरला हे जग मुकले !
डॉक्टर अल्फ्रेड कालवश झाले. त्यांचे तैलचित्र त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावले गेले…. हा माणूस आता वैद्यकीय प्रयोगशाळा प्रमुख म्हणून कार्यरत होता… पगारात फारसा फरक पडलेला नव्हता… पण त्याच्या प्रेरणेने जगात कित्येक बाळांचे जीव वाचू शकतील असे शिक्षण लोक घेत होते.
त्याच्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर मात्र व्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागली… त्याला “ मानद डॉक्टर “ ही उपाधी सन्मानपूर्वक देण्यात आली. त्याचे तैलचित्र डॉक्टर अल्फ्रेड यांच्याशेजारी लावण्यात आले. त्याने शोधण्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शस्त्रक्रिया-पद्धतीच्या नावात त्याच्याही नावाचा समावेश करण्यात आला ! “ Blalock-Thomas-Taussig shunt ! “ होय, त्यांचे नाव होते विवियन Thomas…. डॉक्टर विवीयन Thomas ! पण दुर्दैवाने त्यांना कधीही प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाऊ शकली नाही…. ! कारण ते औपचारिकरित्या प्रशिक्षित डॉक्टर नव्हते !
या विषयावर एक अत्यंत सुंदर चित्रपट, एक माहितीपट बनवला गेला. त्यामुळे Thomas यांचे कार्य जगाला माहित झाले. त्यांचे आत्मचरित्रही गाजले. मात्र चित्रपट अधिक प्रभावशाली आहे. ‘ Something the Lord made ! ‘ हे या चित्रपटाचे नाव. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट इंग्लिश भाषेत असून इंग्लिश सब-टायटल्स उपलब्ध असल्याने संवाद समजायला सोपे जाते. अभिनयाबाबत बोलायचे झाले तर शब्द नाहीत…. विवियन यांची भूमिका जगला आहे अभिनेता मॉस डेफ. डॉक्टर आल्फ्रेड उभे केले आहेत अभिनेते अलन रिकमन यांनी. चित्रपटातील एकही दृश्य अर्थहीन नाही !
…. निळ्या मरणाला गुलाबी श्वासांचे कोंदण देणारा हा कृष्णवर्णीय मनुष्य वर्णद्वेषाच्या गालावर एक चपराक लगावून गेला…. !
(अमेरिका, भारत आदी देशांत आजही हा विकार आढळतो. पण यावर आता उपाय आहेत. हा वैद्यकीय विषय मला समजला तसा मांडला आहे. तांत्रिक बाबी तपासून पहाव्यात. मात्र चित्रपट जरूर पहावा ज्यांना जमेल त्यांनी. एच. बी. ओ. वर आणि युट्यूब वर उपलब्ध आहे. पुस्तकेही आहेतच. पहिले छायाचित्र अभिनेत्यांचे आहे. दुस-या छायाचित्रात पांढरा कोट घातलेले आहेत ते मानद डॉक्टर विवियन थॉमस!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈