सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
साक्षात शंकर महादेवाची पत्नी गणपती आणि कार्तिकेयाची माता असलेल्या पार्वतीला सुद्धा कधीतरी खूप एकाकी वाटे. भगवान शंकर ध्यानात मग्न आणि पुत्र आपापल्या उद्योगात. त्यामुळे तिला वाटले आपल्याला समजून घेणारी आपल्या भावनांची कदर करणारी अशी एक कन्या आपल्याला हवी. एकदा भगवान शंकर तिला इंद्राची राजधानी अमरावती येथे घेऊन गेले. तेथे सुंदर वृक्षवल्ली पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तेथे कल्पवृक्ष पाहून तिला खूप आनंद झाला . तिने आपल्याला एक मुलगी हवी अशी इच्छा बोलून दाखवली. कल्पवृक्षाने तिला एक सुंदर बालिका दिली. पार्वती खुश झाली. तिने तिचे नाव ठेवले अशोक सुंदरी. दुःख दूर करणारी एक सुंदर स्त्री म्हणजे अशोकसुंदरी. अशोकसुंदरी हळूहळू मोठी झाली. तारुण्याने मुसमुसली .तेव्हा पार्वतीने तिच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. चंद्रकुलात उत्पन्न झालेला राजपुत्र नहुुश हा आपला जावई व्हावा असे तिला वाटले. तिने अशोक सुंदरीला सांगताच तिला सुद्धा ते पटले .एक दिवस हुंड राक्षसाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिला लग्नाविषयी विचारले. तिने नकार देताच त्याने तिचे कपटाने अपहरण केले. अशोक सुंदरीने त्याला शाप दिला, मी साक्षात पार्वती देवीची कन्या आहे .तुझा मृत्यू नहुशाच्या हातून घडेल असा मी तुला शाप देते. मग ती तिथून निसटली. व कैलास पर्वतावर पार्वतीकडे गेली. इकडे घाबरलेल्या हुंडा राक्षसाने नहुशाचे पण अपहरण केले. तेथील एका दासीने त्याला गुपचूप पळवले आणि वशिष्ठ ऋषींच्याकडे सुपूर्द केले. वशिष्ठ- अरुंधती यांनी त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला खूप शिकवले . त्याने हुंड राक्षसाशी युद्ध करून त्याला ठार केले आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. अशी ही पार्वतीची पर्यायाने शंकर- पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈