श्री अरविंद लिमये

? इंद्रधनुष्य ?

☆ नवी ओळख…. ☆ श्री अरविंद लिमये 

कार्य’ आणि कर्तृत्त्व या दोन्ही शब्दांचा अतिशय सार्थ मिलाफ असलेलं एक उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व’ ही आमच्या पहिल्या भेटीतच माझ्या मनात निर्माण झालेली ज्यांची प्रतिमा पुढे त्यांच्याच या कार्यकर्तृत्त्वाची प्रत्येकवेळी नव्याने ओळख होत गेली तसतशी अधिकच ठळक होत गेली त्या डाॅ. तारा भवाळकर म्हणजे माझ्यासारख्या साहित्यप्रेमींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत!

आज त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि मानसन्मानांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटला तरीही त्यांना मिळालेले हे यश, ही प्रतिष्ठा, हा अधिकार हे कोणत्याही फलाची अपेक्षा न करता एका आंतरिक ओढीने त्यांनी केलेल्या शोध वाटेवरील अथक प्रवासाची परिणती आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. मला उत्सुकता असायची ती त्यांना हे कां करावेसे वाटले असेल, त्यांनी ते कसे केले असेल याची. माझ्या मनातली ही उत्सुकता कांही प्रमाणात शमलीय ती त्यांच्याच मुलाखती आणि विविध व्यासपीठावरील त्यांची भाषणे व प्रासंगिक लेखन यातून ऐकायवाचायल्या मिळालेल्या त्या संदर्भातल्या अनेक घटना प्रसंगांच्या उल्लेखांमुळे! हे सगळे उल्लेख त्यांनी सहज बोलण्याच्या ओघात केलेले असले तरी तेच माझ्या मनातल्या प्रश्नांना परस्पर उत्तरे देऊन जायचे आणि तीच प्रत्येकवेळी मला होत गेलेली त्यांची ‘नवी ओळख’ असायची!

दिल्ली येथे फेब्रुवारी-२०२५ मधे संपन्न होणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड आणि अलिकडेच त्यांना मिळालेला ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ या दोन घटनांमुळे त्यांचे कार्य आणि कर्तृत्त्व नव्याने प्रकाशझोतात आलेले आहे. हा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचाच सन्मान आहे! याबद्दलची त्यांच्या मनातली भावना समजून घेतली कीं त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दृढ होतो !

‘माझे अध्यापन क्षेत्र, मी केलेले संशोधन यात माझ्या आधी आणि नंतरही अनेकजणांनी भरीव कार्य केलेले आहे. कांही अजूनही करीत आहेत. मला मिळालेला आजचा हा सन्मान माझ्या एकटीचा, वैयक्तिक सन्मान नसून तो या सर्वांचाच सन्मान आहे असेच मला वाटते ‘ त्यांनी व्यक्त केलेली ही भावना त्यांच्या नम्रतेइतकीच या कामाबद्दल त्यांच्या मनात असणारी आदराची भावना व्यक्त करते तसेच या संशोधनाच्या कामांमधील व्याप्तीची त्यांना असणारी जाणिवही!

डॉ. तारा भवाळकर

डाॅ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ चा. जन्म आणि बालपण पुणे येथे. त्यानंतर वडिलांच्या नोकरीमुळे नाशिक येथे पुढील वास्तव्य. इ. स. १९५८ मधे त्या मात्र नोकरीनिमित्ताने सांगलीस आल्या. तेव्हापासून सांगलीकर झाल्या.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्वतः सांगितलं होतं की.. ‘लेखन आणि संशोधन’ क्षेत्रातील कामाबद्दल हा सन्मान मला दिला जात असला तरी माझ्या कामाची सुरुवात नाटकापासून झालेली आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. ‘

‘नाटकापासून झालेली सुरुवात’ नेमकी कशी हे आजच्या तरुण नाट्यकर्मींनी आवर्जून समजून घ्यावे असेच आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा नाशिकमधील वातावरणामुळे कलेची आवड त्यांच्या संस्कारक्षम मनात लहानपणापासूनच रुजलेली होती. माध्यमिक शाळेतील अध्यापनाच्या निमित्ताने सांगलीत आल्यानंतर नृत्य नाट्य गीत विषयक अविष्कार शालेय विद्यार्थिनींकडून करून घेणे, त्यांच्यासाठी छोट्या नाटिका स्वतः लिहून, त्या बसवून, त्यांचे प्रयोग सादर करणे यात त्यांचा पुढाकार असे. त्याच दरम्यान शिक्षणविषयक अभ्यासक्रमासाठी ‘मराठी रंगभूमीची/नाटकाची वाटचाल’ या विषयावर त्यांनी केलेले लघुप्रबंधात्मक लेखन हे त्यांच्या नंतरच्या नाट्यविषयक लेखन व संशोधनाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल ठरणार आहे याची तेव्हा मात्र त्यांना कल्पनाही नव्हती!

इतर हौशी रंगकर्मींना एकत्र करुन या नाट्यपंढरीत त्यांनी उभे केलेले हौशी मराठी रंगभूमीसाठीचे काम आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतरही आदर्शवत ठरेल असेच आहे. सर्वांना सोबत घेऊन केलेली ‘अमॅच्युअर ड्रॅमॅटीक असोसिएशन’ची स्थापना, त्या

संस्थेतर्फे सांगली व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धांचे सलग १५ वर्षे यशस्वी आयोजन, नाटक व एकांकिका लेखनास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याची योजना, विद्यार्थी व हौशी रंगकर्मींसाठी नाट्य विषयक शिबिरांचे आयोजन, नाटक व एकांकिकांच्या स्पर्धापरीक्षकांसाठी खास चर्चासत्रांचे आयोजन यांसारख्या उपक्रमांमधील कल्पकता, वैविध्य आणि सातत्य विशेष कौतुकास्पद आहे असे मला वाटते. हे करीत असतानाच संस्थेतील कलाकारांसाठीचा राज्य नाट्य स्पर्धेतील सातत्यपूर्ण सहभाग व यश हेही संस्थेचा नावलौकिक वाढवणारे ठरले होते.

या सर्व उपक्रमांमधे डाॅ. तारा भवाळकरांचा लेखन, दिग्दर्शन व अभिनय याद्वारे असणारा सक्रिय सहभागही महत्त्वाचा ठरला. त्यांच्या ‘माझे घरटे माझी पिले’, ‘एक होती राणी’, ‘रातराणी’ या नाटकांतील प्रमुख भूमिका अतिशय गाजल्या. आणि या भूमिकांसाठी त्यांना अभिनयाची बक्षिसेही मिळाली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील ‘लिला बेणारे’च्या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले होते. १९६७ ते १९८० या दरम्यान राज्य नाट्य स्पर्धा व कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्या लोककला व नाटक या क्षेत्रातील संशोधनात्मक कामाची सुरुवात झाली ती यानंतर! त्यांचे हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठीचे हे योगदान ही आजच्या पिढीतील रंगकर्मींसाठी त्यांची एक वेगळी, नवी ओळखच असेल!

लोककला, संतसाहित्य, लोकसंस्कृती यांचा अतिशय सखोल, व्यापक अभ्यास आणि संशोधन आणि त्यातून आकाराला आलेले विपुल लेखन यामुळे त्यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. या संशोधनातील निष्कर्षांची अतिशय समर्पक शब्दांत स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलेली मांडणी हे त्यांच्या संशोधनात्मक लेखनाचे वैशिष्ट्य ठरले. अलीकडेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘सीतायन-वेदना आणि विद्रोहाचे रसायन’ ही साहित्यकृती या दृष्टीने आवर्जून वाचावी अशी आहे. ‘प्रियतमा’, ‘महामाया’, ‘लोकसाहित्यातील स्त्री’, ‘ स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘लोकसंचिताचे देणे’, ‘मातीची रूपे’, ‘महाक्रांतीकारक विष्णुदास भावे’, ‘संस्कृतीची शोधयात्रा’, ‘स्नेहरंग’, माझिया जातीच्या’, ‘मनातले जनात’ ही त्यांच्या साहित्यकृतींची शीर्षकेच त्यांच्या संशोधनाचे आणि लेखनाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करणारी आहेत.

स्वतःची अध्यापन क्षेत्रातील नोकरी सांभाळून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय असतानाच त्यांनी रंगभूमीविषयक अधिक अभ्यासाची पूर्वतयारीही सुरू केलेली होती. त्यासाठी विविध ठिकाणी स्वतः जाऊन कोकण, (दशावतार, नमन खेळ), गोवा (दशावतार व अन्य लोकाविष्कार), कर्नाटक(यक्ष गान), केरळ(कथकली) अशा त्या त्या प्रांतातील लोककलांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तंजावरच्या सरकोजी राजे यांच्या सरस्वती महाल ग्रंथालयात तंजावरी नाटकांच्या मूळ हस्तलिखितांचा तिथे महिनाभर मुक्काम करून बारकाईने अभ्यास केला आणि त्या सर्व नाटकांची अधिकृत सूची प्रथमच सिद्ध केली. विशेष म्हणजे ती सूची पुढे डाॅ. म. वा. धोंड संपादित मराठी ग्रंथकोशामधे प्रथम प्रसिद्ध झाली आणि नंतर त्यांनी तंजावरी नाटकांवर एक विस्तृत लेखही लिहून प्रसिद्ध केला.

हे नाट्य संशोधन व लेखन सुरू असतानाच मराठी रंगभूमीच्या आद्य स्त्रोतांचा संशोधनात्मक अभ्यास करीत त्या पीएचडीच्या प्रबंधाची तयारीही करीत होत्याच. त्यातून आकाराला आलेल्या ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण (प्रारंभ ते इ. स. १९२०) या त्यांच्या शोधनिबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुरस्कारही मिळाला.

यानंतरही त्यांनी नाट्यविषयक संशोधन व समीक्षापर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले. त्या सगळ्याचा विस्तृत आढावा एका वेगळ्या स्वतंत्र प्रदीर्घ लेखाचाच विषय आहे!

त्यांनी केलेले हे सर्व संशोधनात्मक कार्य कोणत्याही सरकारी अनुदानासाठी स्वत:चा मौल्यवान वेळ व शक्ती वाया न घालवता स्वत:ची पदरमोड करुन केलेले आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. आजच्या काळात तरी नि:स्पृहतेचे असे उदाहरण दुर्मिळच म्हणायला हवे. डाॅ. तारा भवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अनोखा पैलू ही त्यांची एक वेगळी ओळख ठरावी!

अगदी बालवयातही साध्या साध्या गोष्टीसुध्दा सहजपणे न स्वीकारता मनात आलेले ‘का?, कशासाठी?’ असे प्रश्न सातत्याने विचारीत त्या घरातील मोठ्या माणसांना भंडावून सोडत असत. त्यांच्या पुढच्या वाटचालीतही प्रत्येक बाबतीतले त्यांच्या मनातले ‘कां?आणि कशासाठी?’ हे प्रश्न सतत स्वत:लाच विचारत स्वतःच त्यांची उत्तरेही शोधत राहिल्या. या शोधातूनच आकाराला येत गेलेलं त्याचं प्रचंड कार्य आणि त्यातून सिध्द झालेलं त्यांचं कर्तृत्त्व हीच त्यांची नवी ओळख विविध सन्मानांनी आज अलंकृत होत त्यांचा सक्रिय वानप्रस्थ खऱ्या अर्थाने कृतार्थ करीत आहे!!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments