सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 दिनांक १४ ते २२ डिसेंबर २०२४.

ठिकाण – फर्ग्युसन महाविद्यालय.

विशेष काय? तर पुस्तक सोहळा! 

पुण्यात कायमच काही ना काही विशेष ज्ञान, सांस्कृतिक, कला, नाट्य, संगीत याची विविध प्रकारची रेलचेल चालू असते. आम्हा पुणेकरांना आता कोठे जावे ? असा प्रश्न नेहेमीच पडतो.

एकाच वेळी बालरंगभूमी संमेलन, भीमथडी जत्रा, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन, सवाई गंधर्व आणि विविध नाट्य गृहातील कार्यक्रम. सगळे एकाच वेळी. असे वाटले गोष्टीत जशी जादू घडते तसे पटापट एका ठीकाणहून दुसरीकडे जाता यायला हवे.

पण वाचन वेड असल्याने पुस्तक महोत्सव पाहूया असे ठरले. एक दिवस जाऊ असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर लक्षात आले, एकदाच जाऊन जमणार नव्हते. इतका खजिना आहे तर किमान २/३ वेळा तरी जावेच लागेल. आणि याची आठवण आकाशवाणी सतत करून देत होती. मुख्य आकर्षणे अशी होती, १) पुस्तक व लेखकांशी भेट २) खाद्य जत्रा ३) बाल चित्रपट महोत्सव आणि माझ्या दृष्टीने पुन्हा ज्ञान खजिन्याचा आनंद घेणे या निमित्ताने पुन्हा कॉलेजच्या आवारात जायला मिळणार होते.

जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागल्या पासूनच मामाच्या गावाला जाऊया! या धर्तीवर

पुस्तकांच्या गावा जाऊया..

पुस्तक महोत्सव पाहूया…

असेच मन घोकत होते. आणि त्या पर्वणीची आतुरतेने वाट बघत होते. आणि त्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुस्तकांचे दालन ( मोठे व त्यात छोटी छोटी दालने ) सर्वांसाठी खुले झाले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिथे मैत्रिणीसोबत पोहोचले. चौका चौकात मोठमोठे फ्लेक्स लागले होते. त्या रस्त्याने जाताना मागच्या वर्षीचा पुस्तक महोत्सव व तेथील अनुभव आठवत होते. त्या आठवणी व गप्पा करतच तिथे पोहोचलो. आणि ते भव्य प्रवेशद्वार दिसले. त्या दारातच इतकी गर्दी दिसली की मन धास्तावलेच! प्रवेश दारातच किमान ३/४ शाळांची मुले ओळीने बाहेर येताना दिसली. प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक आणि चेहेऱ्यावर नवल मिश्रित आनंद उतू जात होता. त्यांचे ते आनंदी चेहरे बघूनच मन प्रफुल्लित झाले. मग मीही थोडा वेळ त्यांचा आनंद बघत राहिले. नंतर आत प्रवेश केला. आत प्रवेश करताना अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करताना खुल जा सिम सिम म्हणून ते दार उघडल्यावर त्या अलीला वाटला असेल तसाच उत्सुकता मिश्रित आनंद वाटला. आत प्रवेश करताच एका झाडाला लटकलेली पुस्तके अर्थात प्रतिकृती दिसल्या. आणि भावना, विचार यांच्या बीजाला आलेली फळेच दिसली. ते बघून फारच छान वाटले. असे वाटत होते उड्या मारुन ती पुस्तकरूपी फळे घेऊन बघावित. पण मग लक्षात आले की पुढे तर हिरे, रत्ने, माणके, सोने यासम आणि न बघितलेली अनमोल रत्ने नुसतीच दिसणार नाहीत तर हाताळायला मिळणार आहेत. मग जास्त उशीर करायला नको म्हणून इकडे तिकडे बघायचे नाही असे ठरवले. पण आमचे बालमन तिथली एकूणच सजावट बघून कुठले ऐकायला. मग रमले तिथे. तिथे इतक्या सुंदर संदेश देणाऱ्या शिल्पाकृती उभारल्या होत्या की ते संदेश स्वीकारल्या शिवाय पुढे कसे जाणार? शिवाय सेल्फी काढण्याचा मोह होताच. प्रत्येक आकृती वेगळा संदेश देत होती. प्रथम दिसले एक गोंडस बाळ, जे पुस्तकांच्या ढिगाऱ्यावर बसून चेहेऱ्यावर आश्चर्य घेऊन जगाकडे बघत होते. जणू आपल्याला सांगत होते, या पुस्तक रुपी ज्ञानातून इतके ज्ञान मिळते की सर्व जगावर राज्य करु शकता. आणि प्रगतीच्या उंच जागी जाऊ शकता. तो बघे पर्यंत तिथे फोटो घेणाऱ्यांची गर्दी झाली. पुढे तर पुस्तक वाचताना गुंग असणारा माणूस असा पुतळा दिसला. त्याच्या हातातील पुस्तकावर व अंगावर अक्षरेच अक्षरे होती. मग आम्हीही त्याच्या समोर फोटो घेतला.

थोडे पुढे आल्यावर दिसले एका ठिकाणी एका शाळेचे विद्यार्थी व त्यांचे सर उभे आहेत. मग मीही त्यात सामील झाले. त्यांच्या समोर एक आकृती होती. त्यात उघडून ठेवलेले भव्य पुस्तक होते. व त्यातून एक अळी सारखा प्राणी बाहेर पडत होता आणि त्याचे तोंड मात्र भव्य ड्रॅगन प्रमाणे होते. जणू ज्ञान घेतल्यावर आपण कसे मोठे होऊ शकतो हेच दर्शवित होते.

त्यानंतर एक पुतळा असा दिसला की मी तर बघतच राहिले. त्या पुतळ्याच्या डोक्याच्या ठिकाणी पुस्तक होते आणि डोके त्याच्या हातात होते. आणि तो ते पुस्तक एकाग्रतेने वाचत होता. यातून माझ्या मनात बरेच अर्थ आले. असे वाटले आपले तन मन, मस्तिष्क एकाग्र करून सगळे विसरून पुस्तक वाचावे असा संदेश देत आहे. एकदा वाटले डोक्याच्या ठिकाणी पुस्तक ठेवून प्रथम स्वतःला वाचा आणि स्वतःचे परीक्षण करा असा संदेश देत आहे. त्या मार्गावर जागोजागी छोटे मांडव होते. त्यातूनच प्रवेश करावा लागत होता. त्या मांडवाच्या छताला पुस्तकांच्या प्रतिकृती खूप आकर्षक रीतीने टांगल्या होत्या. एका ठिकाणी तर त्यांचा आकार मराठी व इंग्रजी अक्षरांचा होता. आणि दोन्ही बाजूला महोत्सवात काय बघू शकाल याची चित्रे होती. याच मार्गावर जागोजागी पुस्तकांच्या विविध रंगाच्या, विविध आकाराच्या शिल्पाकृती दिसत होत्या. आणि बसायला पुस्तक दुमडल्यावर जसे दिसेल तशा आकाराचे अक्षरे असलेले बेंच होते.

सगळीकडे असलेले पुतळे मात्र मोठे आकर्षक आणि संदेश देणारे होते. एका ठिकाणी एका बेंचवर गावातील माणसाची पुस्तक वाचनात गुंग असलेली आकृती होती.

तेथून पुढे गेल्यावर एका मार्गावर प्रवेश केला. आणि डाव्या बाजूला दिसली खाद्य जत्रा. खूप विशेष वाटले. तिथे एक मॅडम विद्यार्थ्यांना सांगत होत्या, ज्यांना काही खायचे असेल त्यांनी खाऊन घ्या. त्यांची सूचना जरा विचित्र वाटली पण विचार केल्यावर योग्य वाटली. एकदा पुस्तके बघायला लागलो की पुन्हा भूक लागली म्हणून बाहेर यायला नको. आम्ही मात्र थेट मुख्य प्रवेश दारातच प्रवेश केला. त्या लाल कार्पेट वरून चालताना आपण वाचकही विशेष आहोत असेच वाटत होते. आत प्रवेश करताच भव्यता लक्ष वेधून घेत होती. डाव्या बाजूला सुंदर स्टेज व समोर ठेवलेल्या खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर त्या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे समजले. पण या वेळी तिथे काही मुले चित्रे काढताना दिसली. आणि त्यांच्या शिक्षिका त्यांना सूचना देत होत्या. उजवीकडे उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी आपले मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांचे कट आऊट ठेवले होते. त्यांच्या हातात समृध्द भारताचे पंचप्राण लिहिलेले प्रमाणपत्र होते. आणि ते आपल्याला देत आहेत असा फोटो काढण्याची व्यवस्था होती. तेथे आलेले सर्वच त्या ठिकाणी फोटो काढत होते. आणि त्याच्या बाजूलाच प्रत्येक मुलाला पुस्तक दिले जात होते. आता प्रत्यक्ष पुस्तकांच्या गुहेत प्रवेश करायचा होता. गर्दीचा अंदाज बाहेरच आला होता. त्यामुळे आतही गर्दी असणार हे गृहीत धरूनच आत प्रवेश केला.

– भाग पहिला 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments