सुश्री विभावरी कुलकर्णी
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सगळे आनंदाचे प्रेक्षणीय क्षण अनुभवत मुख्य पुस्तक दालनात प्रवेश केला. आणि कुठे जाऊ हा प्रश्नच पडला. कारण समोर फारच मोठे पुस्तकांचे मायाजाल होते. लगेच लक्षात आले, हे एक दिवसाचे काम नव्हे. एकदा माणूस आत शिरला की किमान ४/५ तास हरवून जाईल. इतकी मोठी तीन दालने त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट बघून होणार नाही याचा अंदाज आला. शेवटी एक बाजू ठरवून आत शिरले. पहिलेच स्वागत जुन्या जिव्हाळ्याच्या पुणे मराठी ग्रंथालय याच्या स्टॉल वर झाले. तिथे उपस्थित जाणत्या मंडळींनी लगेच नावानिशी ओळखले. आणि “अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे यांच्या पुस्तक परीक्षणाचे पारितोषिक मिळालेल्या तुम्हीच ना?” असे स्वागत झाले. मग त्यांच्या समवेत छायाचित्रे काढली गेली. थोड्या गप्पा अर्थातच पुस्तकांच्या विषयी झाल्या. आणि पुढचे स्टॉल खुणावत असलेले दिसले. प्रत्येक स्टॉल व तेथील पुस्तके आपल्याला खुणावत असलेले दिसत होते.
प्रत्येक स्टॉलवर व्यवस्थित स्वागत व आवश्यक ती माहिती सांगणे होत होते. विशेष म्हणजे स्टॉल वर ३/४ खुर्च्या तर काही ठिकाणी टेबल पण दिसले. आणि त्यावर बसून मंडळी पुस्तक उघडून बघण्याचा आनंद घेत असलेली दिसली. स्टॉल मध्ये गेल्यावर त्या पुस्तकांना हातात घेताना फार समाधान व आनंद होत होता. ऑनलाईन पुस्तके मगवताना या आनंदाला पारखे झालो आहोत याची खंत वाटली.
सर्वात कौतुक वाटले ते पाठ्यपुस्तकांच्या स्टॉल वर. सर्व इयत्तांची पुस्तके एकाच छताखाली दिसली. व आपण शिकवलेली सगळीच पुस्तके बघायला मिळाली. आपल्या संविधानाची मूळ प्रत एका स्वतंत्र दालनात दिसली. त्याच्या वरील स्वाक्षरी असलेल्या पानाचा फोटो काढता येत होता. आणि ग्रुप फोटो सुद्धा काढता येत होता. त्याच्या जवळच
शिवरायांचा सिंहासनावर बसलेला तर कट आऊट इतका सुंदर, की प्रत्यक्ष शिवराय या महोत्सवाचे साक्षीदार आहेत असेच वाटत होते. सर्व वाचलेला शिवइतिहास आठवला. त्या भारावलेल्या इतिहासाची मनात उजळणी होत असतानाच समोर दिसला पु. ल. यांचा हसरा पुतळा. जणू तेही कोण काय वाचत आहे,काय चाळत आहे? हे आपल्या दृष्टीतून बघत असावेत. आणि सगळे बघून काही मिश्किल लिहिणार असे दृष्य डोळ्या समोर येत होते. ते विचार मनात घोळतच होते तोच समोर साक्षात हातात शिवपिंड घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा दिसला आणि नतमस्तक झाले! आश्चर्य म्हणजे तेथे असलेली मंडळी मोठ्या नम्रतेने “चप्पल बाहेर काढून आत या”, असे सांगत होते. तेथे आत प्रविष्ट झाल्यावर त्यांचे चरित्र चित्ररूपाने लावलेले दिसले. खूप छान वाटले. मात्र तेथे त्यांच्या विषयीची पुस्तके उपलब्ध नव्हती. म्हणून थोडी निराशाच झाली.
लगेच समोरच हॅपी थॉटस हे दालन दिसले. मग काय सरश्री यांची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी बघून फारच हरखून गेले. तेथील मंडळी खूप छान माहिती देत होती. पुस्तके शोधायला मदत करत होती. आणि तिथेच टेबल,खुर्ची याची व्यवस्था असल्याने चर्चाही करता येत होती.
किती विविध साहित्य! विविध भाषेतील साहित्य! ज्याला ज्याची आवड तो ते पुस्तक घेऊन बघत होता.
मुलांच्या साठी स्वतंत्र दालने, विविध रंगीबेरंगी पुस्तके, चित्र साहित्य! शालेय सहली बरोबर आलेल्या मुलांच्या हातात चांदोबा,किशोर, या बरोबरच शामची आई, स्वामी, छावा अशी पुस्तके दिसत होती. किती सुंदर दृश्य!!
मी तर वय विसरून तेच बघत बसले.
स्टॉलच्या शेवटी एक सुंदर स्टेज व खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर समजले तिथे लेखक आपल्या भेटीला येत होते. त्यांच्याशी बोलता येत होते.
गर्दी तर होती. पण त्याला एक शिस्त होती. सगळे जणू एका आनंद सोहळ्याला उपस्थित असावे असे वाटत होते. बंदोबस्त खूप होता. पण त्यातील महिला पोलिस आपल्या बाळांना घेऊन पुस्तक खरेदी करताना दिसत होत्या. खूप कौतुक वाटले त्यांचे!
विविध शाळांची मुले व शिक्षक दिसत होते. कॉलेज मधील तरुणाई दिसत होती. अक्षरशः आबाल वृद्ध दिसत होते. कॉलेज युवती सिनियर असणाऱ्यांना मदत करताना दिसत होत्या. इतके फिरून पाय बोलायला लागले होते. पण एका कॉलेज युवतीने बसायला लगेच स्वतःची खुर्ची दिली आणि मला अचंबित केले. बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा. एकंदर सर्व वातावरण संस्कारी, सकारात्मक दिसत होते.
यात गंमत म्हणजे व्यसनी लोक जसे एका ठिकाणी सापडतात तसे पुस्तक वाचनाचे व्यसन असणारे पण सापडले आणि आपली इथे भेट होणारच! अशी वाक्ये पण झाली. पुस्तकांवर चर्चाही झाली.
एकूणच पुस्तक महोत्सव हा एक सोहळाच झाला होता. वाचन संस्कृती लोप पावत आहे, याला उत्तर मिळाले आहे असे मनात आले. या सगळ्यात बाल चित्रपट मात्र बघता आला नाही. आणि बाहेरूनच त्याचा फलक बघावा लागला.
बरेच दिवस मनात रेंगाळणारी पुस्तके हाताळून खरेदी करता आली याचा खूप आनंद व समाधान मनात घेऊन परतले.
अशा महोत्सवाची कल्पना मांडणारे व ती साकार करणारे सर्वांना शतशः धन्यवाद ! आणि हा असा महोत्सव दर वर्षी अनुभवायला मिळावा ही मनापासूनची इच्छा!
– समाप्त –
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈