श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “बालकांच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉक्टर !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती अकरा वर्षांची असताना तिची आई क्षयरोगाने दगावली… आणि तिलाही किंचित क्षय देऊन गेली. त्यामुळे तिचे ते दिवस आजारपणातच गेले. सततच्या खोकल्यामुळे तिच्या श्रवणशक्तीवर खूप विपरीत परिणाम झाला. नीट ऐकता न आल्यामुळे तिला वाचनही करता यायचे नाही… अक्षर-अक्षर जुळवून तयार होणारा एखादा शब्द तिचा मेंदू लवकर स्वीकारायचा नाही… आणि शिक्षणात तर हा सर्वांत मोठा अडथळा ठरला. पण हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ असलेल्या तिच्या वडिलांनी तिला प्रचंड आत्मविश्वास दिला. प्रश्न अभ्यासाचा होता. मग तिने अभ्यासाच्या निरनिराळ्या युक्त्या शोधल्या, एकदा लिहिलेले तीन तीनदा तपासून पाहिले आणि माध्यमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला… महाविद्यालयात ती उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध झाली होतीच. पण तिला डॉक्टरच व्हायचे होते! कारण तिचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांना जीवशास्त्र विषयात खूप रस होता. त्यांचीच प्रेरणा या मुलीने घेतली असावी.
आणि त्यावेळी महिलांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून प्रवेश मिळणे दुरापास्त होते. महिला परिचारिका उत्तम करू शकतात… मुलांना वाढवू शकतात पण मग डॉक्टर का नाही होऊ शकत? हा विचार त्यावेळी फारसा केला जात नव्हता. हार्वर्ड विद्यापीठाने तिला वैद्यकीय शिक्षणाच्या तासांना बसायची परवानगी तर दिली मात्र डॉक्टर ही पदवी देण्यास असमर्थतता दाखवली… म्हणून ती बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात गेली. हे विद्यापीठ मात्र महिलांना वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बाजूने होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेलेन तौसिग झाल्या … डॉक्टर हेलेन ब्रुक तौसिग. जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात निवासी वैद्यक अधिकारी होण्याची त्यांची संधी मात्र अगदी थोडक्यात हुकली. हृदयरोग विभागात एक वर्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांची पावलं बालरोग विभागाकडे वळाली…. आणि त्यांचे लक्ष बालकांच्या हृदयाकडे गेले !
बालकांच्या हृदयरोगावर उपचार करणा-या डॉक्टर एडवर्ड पार्क यांच्या क्लिनिकमध्ये त्या स्वयंस्फूर्तीने म्हणून काम करू लागल्या…. ही एका इतिहासाची पहिली पाऊलखूण होती. पुढे या क्लिनिकचा संपूर्ण ताबाच त्यांच्याकडे आला. त्यावेळी बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया ही कल्पनाच पुढे आलेली नव्हती. बालके हृदयरोगाने दगावत…. जगभरात अशी हजारो बालके आयुष्य पाहण्याआधीच जगाचा निरोप घेत होती… त्यांच्या जन्मदात्यांना दु:खाच्या खाईत लोटून निघून जात होती. ह्या कोवळ्या कळ्या अशा झाडावरच सुकून गळून पडताना पाहून डॉक्टर हेलन यांचे कोमल काळीज विदीर्ण होई.
स्टेथोस्कोप हे उपकरण म्हणजे डॉक्टर मंडळींचा कान. पण डॉक्टर हेलन यांचे कानच काम करीत नसल्याने स्टेथोस्कोप निरुपयोगी होता… मग त्यांनी बालकांच्या हृदयाची स्पंदने तळहाताने टिपण्याचा अभ्यास केला ! त्यांचा हात बालकाच्या काळजावर ठेवला गेला की त्यांना केवळ स्पर्शावरून, त्या स्पंदनामधून त्या हृदयाचे शल्य समजू लागले. फ्ल्रूरोस्कोप नावाचे नवीन क्ष-किरण तंत्रज्ञान त्यांच्या मदतीला आले. कित्येक लहानग्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून त्यांनी हृदयरोगाची कारणे शोधण्याचा अथक प्रयास आरंभला. हा साधारण १९४० चा सुमार होता… हृदयक्रिया बंद पडून बालके मृत होत आणि त्यावर काहीही उपाय दृष्टीपथात नव्हता. पण डॉक्टर हेलन यांचा अभ्यास मात्र अव्याहतपणे सुरूच होता. सायनोसीस नावाची एक वैद्यकीय शारीरिक स्थिती बालकांचे प्राणहरण करते आहे हे डॉक्टर हेलन यांना आढळले. एका विशिष्ट वैद्यकीय स्थितीत असलेल्या बालकांच्या फुप्फुसांना प्राणवायूयुक्त रक्त पुरेसे पोहोचत नाही हे त्यांनी ताडले. ह्रदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडली तर हा पुरवठा वाढू शकेल, असा तर्क त्यांनी लावला…. आणि तो पुढे अचूक निघाला !
ही युक्ती मनात आणि कागदावर ठीक होती, पण प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण होते. याच काळात जॉन्स हाफकिन्स मध्ये प्रसिद्ध सर्जन डॉक्टर आल्फ्रेड ब्लालॉक, त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक विवियन Thomos यांच्यासह संशोधन विभागात रुजू झाले होते. डॉक्टर हेलन यांनी आपली ही कल्पना त्यांना ऐकवली आणि ते कामाला लागले… विशेषत: विवियन यांनी ही कल्पना चांगलीच उचलून धरली ! आता तीन देवदूत बालकांच्या जीवनाची दोरी बळकट करण्याच्या उद्योगाला लागले. पण या कामात त्यांना मानवाच्या सर्वाधिक निष्ठावान मित्राची, श्वानाची मदत घ्यावी लागली… कित्येक श्वानांना या प्रयोगात जीव गमवावा लागला… आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे !
मानवाच्या हृदयात ज्या प्रकारे हृदयदोष निर्माण होतो, त्याचसारखा दोष कुत्र्याच्या हृदयात निर्माण करणे, आणि तो दुरुस्त करणे हे मोठे आव्हान होते.. ते विवियन यांनी पेलले.
दरम्यानच्या काळात डॉक्टर हेलन यांनी बालकांना हा हृदयरोग होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण शोधून काढले. त्यावेळी अमेरिकेत प्रसूतीपूर्व आजारावर Thalidomide हे औषध अगदी सर्रास दिले जाई. अत्यंत किचकट संख्यात्मक माहिती गोळा करून डॉक्टर हेलन यांनी हे औषध घेण्यातले धोके जगाला समजावले… आणि Thalidomide चा वापर टाळला जाऊ लागला… आणि त्यातून मातांच्या पोटातील बालकांना होणारा ‘ब्लू बेबी’ नावाने प्रसिद्ध असणारा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. निम्मी लढाई तर इथेच जिंकल्या डॉक्टर हेलन.
९ नोव्हेंबर, १९४४ रोजी पंधरा महिन्यांच्या एका बालिकेवर ब्लू बेबी विकार बरा करण्यासाठीची पहिली शस्त्रक्रिया झाली. यासाठी शोधल्या गेलेल्या प्रक्रियेला ‘ Blalock-Taussig-Thomos shunt ‘ असे नाव दिले जाऊन या तीनही जीवनदात्यांचा उचित सन्मान केला गेला.
डॉक्टर हेलन ब्रुक Taussig यांना पुढे विविध सन्मान प्राप्त झाले.. पण सर्वांत मोठा सन्मान आणि आशीर्वाद त्यांना जीव बचावलेल्या बालकांच्या पालकांनी दिला असावा, यात काही शंका नाही. त्यांना वैद्यकीय जगत “Mother of pediatric cardiology” म्हणून ओळखते.
याच डॉक्टर हेलन यांनी भारताला एक वैद्यकीय देणगी दिली…. भारताच्या पहिल्या महिला हृदयशल्य विशारद पद्मविभूषण डॉक्टर शिवरामकृष्णा पदमावती यांनी डॉक्टर हेलन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि भारतात अतिशय मोठे काम उभारले.. १०३ वर्षांचे कर्तव्यपरायण आयुष्य जगून डॉक्टर पदमावती कोविड काळात स्वर्गवासी झाल्या !
या दोन महान आत्म्यांना परमेश्वराने सदगती दिली असेलच.. आपण त्यांच्या ऋणात राहूयात…..
(माझ्या अल्पबुद्धीला अनुसरून या वैद्यकीय विषयावर लिहिले आहे. तांत्रिक शब्द, नावांचे उच्चार चुकण्याची शक्यता आहे आणि याबद्दल आधीच दिलगीर आहे. तज्ज्ञ मंडळींनी जरूर आणखी लिहावे आणि या महान आत्म्यांना प्रकाशात आणावे. संबंधित माहिती मी इंटरनेटवर वाचली (परवानगी न घेता केवळ सामान्य वाचकांसाठी भाषांतरीत केली. कारण मराठीत असे लेखन कमी दिसते) आणि जमेल तशी मांडली.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈