सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ अभिजात मराठीपुढील आव्हाने… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
मिरज विद्यार्थी संघातर्फे “जागर मराठीचा २०२४”, सन २०२५ च्या १०० व्या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने विशेष व्याख्यानमाला झाली. या मध्ये सांगली येथील प्रा अविनाश सप्रे यांचे “अभिजात मराठी पुढील आव्हाने” या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाचा मिरजेतील श्री मुकुंद दात्ये यांनी अत्यंत प्रभावी घेतलेला आढावा, आपणापर्यंत पोहोचवल्याशिवाय रहावले नाही.
सरांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणात अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? तो कसा मिळतो? याचे सविस्तर विवेचन केले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होते? त्यामुळे काय आव्हाने उभी आहेत हे सांगितले. ते एका प्रकारे आपलेच कठोर परीक्षण होते.
भाषा म्हणजे संस्कृती. पुर्वी इंग्लंडमध्ये लॅटिन भाषा बोलली जात असे. इंग्रजीला गावंढळ भाषा समजली जात असे. अगदी शेक्सपीअरच्या नाटकातही दुय्यम पात्रे इंग्रजीत बोलत असत. पुढे इंग्रजी भाषेवर लेखकांनी व अनेकांनी खूप काम केले व तिला पुढे आणले.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषा मोठी होत नाही. ती मोठी असतेच. तिला तसा दर्जा शासनदरबारी दिला जातो. तिच्या मोठेपणावर एक शासकीय मुद्रा लावली जाते एवढेच.
शासनाने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती कमीतकमी दोन हजार वर्षे पुरातन असली पाहिजे. ती सतत वापरली जात असली पाहिजे असे काही निकष ठरवले आहेत. अर्थात निकषांची पूर्तता होते की नाही हे अखिल भारतीय पातळीवरची समिती ठरवते. त्या समितीत तीन अमराठी भाषेतील लेखक सदस्य असतात.
दक्षिणेकडील राज्ये भाषेच्या बाबतीत फारच स्वाभिमानी आहेत. संवेदनशील आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते त्यांच्या भाषेबाबत अभिमानीच असतात. त्यामुळे भिजात भाषेच्या दर्जा देण्याचे ठरवल्यानंतर तसा दर्जा मिळविण्याचा पाहिला मान तामिळ भाषेने मिळवला.
त्यानंतर एक दोन वर्षच्या अंतराने तो मान मल्ल्याळम, कन्नड, उडीसी भाषेने मिळवला. त्यांनी अर्ज करायचा. पुरावे द्यायचे आणि दर्जा मिळवायचा असे घडत गेले. त्यासाठी दिल्लीत मोठे राजकीय पाठबळ, प्रश्न पूढे रेटण्याची ताकद असावी लागते. त्याबाबतीत आपले लोक फारच थंड असतात. त्यांना भाषेच्या प्रश्नाचे काहीच पडलेले नसते. ते आपले राजकारण आणि निवडणुका यात गर्क असतात.
यशवंतराव चव्हाण दिल्लीत असताना त्यांचे मराठी भाषा, मराठी लेखक यांच्याकडे लक्ष असे. लेखकांच्या वैयक्तिक कामातही ते मदत करत.
ना. धो. महानोर याचे दिल्लीत काही काम होते. ते त्या ठिकाणी पोचण्याच्या आधीच यशवंतरावांचा संबंधितांना फोन गेला होता. “उद्या तुमच्याकडे मराठीतील मोठे कवी येणार आहेत. त्यांचा योग्य सन्मान करा व त्यांचे काम पहा. ” महानोर ऑफीसात पोचण्यापूर्वी त्यांची ओळख पोचली होती. काम झाले.
इतर राज्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आपले लोक जागे झाले. सरकारने रंगनाथ पठारे यांस निमंत्रक करून एक समिती तयार केली. समितीने खूप तातडीने शोधकार्य सुरु केले.
शिलालेख, ज्ञानेश्वरी, तुकोबाचें अभंग, लीलाचरित्र वगैरे पुरावे पहिल्या शतकापासून मराठी होती आणि ती सलग वापरात आहे हे दाखवत होते. अहवाल सादर झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास संमती दिली आणि तो केंद्रीय समितीकडे पाठवला.
अनेक वर्षे तो तेथे पडूनच राहिला. दिल्लीत पुढाकार घेऊन अहवाल पुढे रेटण्यास कोणीच काही केले नाही. कोणी ते प्रकरण कोर्टातही नेले. तिथे काही वेळ गेला.
शेवटी अहवाल साहित्य अकॅडमीकडे आला. तेथे मराठी भाषेसाठी भालचंद्र नमाडे होते. अनेकांच्या प्रयत्नास यश आले आणि तेवीस ऑक्टोबर २०२४ ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
ज्ञानेश्वरी एकदम आकाशतुन उतरली नाही. त्यापुर्वीही मराठी होतीच. ती महाराष्ट्री प्राकृत अशा स्वरूपात होती.
आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या निमित्ते काही कोटी रुपये काही काम करण्यासाठी प्राप्त होतील. कामे होतील. पण तेवढ्याने भागणार आहे का हा प्रश्न आहे? प्रत्यक्षात मराठी भाषेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.
पालकच वाचन करेनासे झालेत. वाचनालये ओस नसतील पडली पण ओढ कमी झालीये. अनेक कपाटे उघडलीही जात नाहीत. इंग्रजी शाळांच्या प्रेमामुळे तिकडे ओढा वाढत आहेत. इतके इंग्रजी आल्यावर कित्ती मुले इंग्रजीत बोलणारी, पुढे जाणारी दिसली पाहिजेत. तसे काहीच दिसत नाही. मराठी शाळा व वर्ग बंद पडत चाललेत.
या शाळा काही वाईट नाहीत. कवी नामदेव माळी यांनी “शाळा भेट” हे पुस्तक लिहिले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा किती चांगले काम करत आहेत ते दाखवले आहे. तरीही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्यासाठी किती जण तयार होतील.
मराठी भाषा टिकवून, वाढविण्यासाठी ती ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, पुस्तके मराठीत निघाली पाहिजेत. मातृभाषा मराठीत हे ज्ञान मिळाले तर तीचा फायदा होईल. हे सर्व क्षेत्रात व्हायला हवे. एकोणीसव्या शतकात हे काम मोठया प्रमाणात झाले होते. कोष वाङमय मराठी भाषेत सर्वात जास्त झाले आहे.
अनुवाद हे दुसरे आव्हान भाषेपूढे आहे. मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषात जाणे व त्या भाषांतील साहित्य मराठीत येणे आवश्यक असते.
टागोरांची कविता बंगालीतच होती. ती इंग्रजीत गेल्यावर जगाला माहिती झाली. दिलीप चित्रे यांनी तुकाराम “तुका सेज” ना नावाने इंग्रजीत नेला तेव्हा तुकाराम हे केवढे मोठे कवी आहेत, दार्शनिक आहेत हे समजले.
तामिळ, कन्नड, बंगाली या भाषात हे खूप होत असते. कन्नड मधील इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक हे काम करतात. आपल्याकडील इंग्रजीचे प्राध्यापक, आपण इंग्रजी शिकवतो म्हणजे मोठेच आहोत या भ्रमात वावरतात. त्यांचे इंग्रजी सुद्धा चांगले नसते. गोकाक, मुगली हे इंग्रजीचे प्राध्यापक कन्नड साहित्य इंग्रजीत नेतात. कन्नड आवृत्तीबरोबर इंग्रजी आवृत्ती येते.
भैरप्पा यांचे कन्नड साहित्य उमा कुलकर्णी, वीरूपाक्ष कुलकर्णी यांनी मराठीत आणून मोठेच काम केले आहे. त्यांनी काही मराठी साहित्यही कन्नडमध्ये नेले आहे.
गेली पंचवीस वर्षे पुण्यात भाषांतर करण्याचे काम भाषांतरु आनंदे नावाने करत आहे.
साहित्य अकॅडमी मिळवताना साहित्य इंग्रजीत नसणे हा मोठाच अडसर होतो. कुसुमाग्रजांना ते देण्याच्या वेळेस हीच अडचण आली. काही घाई करून ते काम करावे लागले.
विकीपीडिया हे नवे माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यात तामिळच्या सोळा हजार नोंदी झाल्या तर मराठीच्या सहाशे. त्या नोंदी करण्याची विशिष्ट पद्धत असते. जयंत नारळीकर यांनी त्यांची सर्व पुस्तके विकीपीडियाला दिलीत. ती वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. पु. लं. ची काही पुस्तकं आहेत.
इकडे अभिजात राजभाषा म्हणून कौतुक करायचे आणि व्यवहारात तीला वापरायचेच नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा दुटप्पीपणा. दर साहित्य संमेलनात “मराठी भाषा जगेल का?” या विषयावर परिसंवाद घ्यायचे आणि करायचे काहीच नाही हे दुर्देव आहे.
राजकारण्यांनी भाषणांत मराठी भाषेला अत्यंत खालच्या स्तरावर नेली.
पुस्तकाचे रुप बदलेल, पण पुस्तक संपणार नाही या विषयावर “धिस ईझ नॉट द एन्ड ऑफ द बुक” असे पुस्तक लिहिले आहे. वेळ आहे काही विचार करण्याची आणि भाषेसाठी कृती करण्याची..
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈