सौ. मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था – लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावणे हे आईचे संस्कार, लावलेले वळण, म्हणून आईला घरी जाऊन आवरून येतो असे सांगून, नर्सताईंना किती वेळाने परतेन ही कल्पना देऊन रस्त्याने भराभर चालत हॉस्पिटलमधून घरी पोहचलो. हातपाय धुवून देवा समोर दिवा लावला व तास दीड तासात घरातील आवरले. स्वतःशीच म्हणालो आता जरा निवांत बसू व मग पुन्हा हॉस्पिटलला आईकडे जाऊ. जेमतेम १५ मिनिटे झाली असतील तर दाराची बेल वाजली, समोर पाहतो तर साहेबराव.
आत ये म्हणून त्यास खुणावले तसे तो म्हणाला ” सिक्युरिटीने सांगितले तुम्ही घरी आला असे, म्हणून आईंची तब्येत कशी आहे ते जाणून घ्यायला इकडेच वळलो. ” मी त्याला खाली बसण्यास खुणावले. त्यास म्हणालो “आईची तब्येत स्थिर आहे. श्री गुरुमाऊली, डॉक्टर व देवमाणसे आहेत सोबतीला मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा व आपले प्रयत्न सुरु ठेवायचे, नसती चिंता करून काय साधणार”.
साहेबरावाने माझे उत्तर ऐकून सरळ मुद्दयाला हात घातला, “दादा तुमचं बोलणं कधी कधी उलगडतच नाही. अहो आईंची तब्येत सिरीयस आहे माहित आहे मला, पण मला समाधी अवस्थेबद्दल सांगताना तुम्ही सांगितलेले, तसे काहीसे बोलताना शांत वाटता व आम्ही कोड्यात पडतो”.
मी म्हणालो “साहेबा, अरे मी इतका मोठा निश्चित नाही, बस श्री गुरुसेवक आहे हेच काय ते पुरेसे आहे. अरे बाबा ती पातळी गाठणे फार कर्मकठीण, दुर्लभ अवस्था आहे. पराकोटीच्या श्री गुरुदेवसेवेनंतर श्री गुरुराव कृपेनेच लाभते त्याला ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था म्हणतात”.
साहेबराव तो काय मला सोडणार नव्हता, “दादा मी सोडतो तुम्हाला हॉस्पिटलला, पण वेळ असेल जवळ तर सांगता का जरा काही स्थितप्रज्ञ अवस्थेबाबत”. मला देखील साहेबरावाच्या विचारण्याचे कौतुक वाटले, परमार्थाच्या वाटेवर, अर्थ जाणून घेण्यास आपण जर उत्साह, आतुरता दाखवली नाही तर आपल पाऊल पुढे पडत नाही.
तासभर अवधी हातात होता त्यामुळे म्हणालो…..
“जेवढे मला आजवर उलगडले ते सांगतो, पहा तूला किती समजते, कारण हा विषय अतिशय खोल आहे. साहेबा अरे समजा एखादया जागी जिथे वारा वाहात नाही अशा ठिकाणी तेवत असलेली समईची ज्योत जशी निश्चल असते, तसेच श्री गुरुदेव मार्गदर्शनानुसार प्रामाणिक साधना करणाऱ्या व्यक्तीचे मन हे स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल, स्थिर, ताब्यात, नियंत्रणात असते. अशा गुरुसेवकाचे मन चंचल नसते, त्याची मनःस्थिति डळमळीत, अस्थिर, दोलायमान नसते. आयुष्यात अडचणीच्या, संकटाच्या, अटीतटीच्या, संघर्षप्रसंगी माणसाचे मन जर स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल असेल तर तो कोणत्याही बिकट प्रसंगावर श्री गुरुकृपेने मात करू शकतो. ”
“ साहेबा आपण सामान्य माणसे असल्या प्रसंगी फार गोंधळतो, काय करावे ते सुचत नाही, बावरतो, मायेच्या मोहात वेढले जातो. अगदी पुरते भावविवश होतो. परिणामी स्वधर्म, म्हणजे प्रसंगानुरूप कसे वागायला हवे ह्याचा आपणास विसर पडतो. ज्ञान, बुद्धीचे दरवाजे स्वतःच बंद करून, स्वतःस कोंडून घेतो व बुद्धिभ्रंश झाल्याप्रमाणे वागू, बोलू लागतो. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की तो माणूस आत्मघात, आत्मविनाशाकडे कधी कसा वळला हे त्याचे त्यालाच कळत नाही. ”
“ वास्तविक पाहता प्राणीमात्रात माणूस हा अत्यंत बुद्धिमान प्राणी पण बहुतेक वेळा स्थितप्रज्ञता.. म्हणजे निश्चलतेच्या अभावामुळे जनावरापेक्षा अधिक बहिर्मुख होतो. अति सुखात श्री गुरुरायांनी दर्शविलेला मार्ग विसरतो. यशाच्या धुंदीत बेधुंद होतो, हुरळून जातो. मग कधी कधी आनंदाच्या उकळ्या, तर कधी कधी तो चिडतो, अकारण संतापतो. सत्य मात्र इतकेच की कधी अति आनंदाने तर कधी घोर निराशेने त्याचे मन, त्याची बुद्धी, वादळात सापडलेल्या होडीसारखी हेलकावे खात असते. ह्या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम काय तर जणू रात्रीच्या अंधाराने सूर्यप्रकाशास गिळंकृत करावे तसे चंचल माणसाचा बुद्धिभ्रंश अंतरातील ईश्वरास झाकोळून टाकतो. त्या माणसास श्री गुरुदेव दत्त ह्यांचे तसेच त्यांच्या वचनांचे, शिकवणीचे विस्मरण होते. “
“साहेबराव अरे स्थितप्रज्ञ किंवा निश्चल माणसाचे वागणे अगदी ह्याच्या विरुद्ध असते. तो श्री गुरुवचन अनुसरणारा असतो, पूर्णतः अंतर्मुख होऊन विचार करणारा, वागणारा, बोलणारा असतो. प्रारब्धाने, श्री गुरुकृपेने लाभलेल्या भौतिक सुखाने तो हुरळून जात नाही आणि अडचणीत, दुःखात हतबलही होत नाही. सदैव आत्मानंदाच्या नदीत डुंबत असतो, स्वस्थचित्त, शांत, ज्ञानाने परिपूर्ण असतो. त्यास सुख किंवा दुःख ह्या भावना स्पर्शत नाहीत. ”
“स्थितप्रज्ञ किंवा निश्चल मनाच्या व्यक्तीचे मोठे लक्षण म्हणजे तो अहंकारी नसतो. त्याने अहंकार, अहंभाव, घमेंड श्री गुरुचरणी गुरुसेवामार्गे नियंत्रणात राखलेली असते, हेच कारण म्हणून स्थितप्रज्ञ माणसास सर्व जीवाबद्दल आत्मीयता असते, प्रेम असते, जिव्हाळा असतो. तो सदैव श्री गुरुसेवेची संधी मानून दुसऱ्यांना साह्य करण्यासाठी तयार असतो. तो कोणाचे भले करू शकला नाही, तरी त्याच्या मनात कोणाबद्दलही कधीच वाईट येत नाही, अथवा तो कोणाचे वाईट करू अथवा चिंतू शकत नाही. ‘हे विश्वची माझे घर’ ह्या भावनेने प्रेरित होऊन तो सूर्यप्रकाशासारखा उजळून निघालेला असतो. ह्याचे मूळ कारण श्री गुरुकृपेने लाभलेले ज्ञान, सदाचारी वर्तणूक, सद्वर्तन व संयम ह्या अंगी विकसित केलेल्या सद्गुणांमुळे त्याच्या मनावर त्याने ताबा, नियंत्रण मिळवलेले असते. ”
“साहेबा अशी व्यक्ती म्हणजे देवमाणूसच. ज्यांचे अंतरी श्री गुरुदेव अनुभवावे. अखंड श्री गुरुसेवेत रमणारी व सर्वाना शक्य ती मदत सदैव करणारी. अरे ह्या देवमाणसांना माझ्या मते स्वतः श्री गुरुमाऊलीच घडवतात, जागोजागी भक्त रक्षणार्थ योजतात. आज आईचे उपचार शक्य झाले ते ह्यांचे कृपेनेच. अरे श्री गुरुमाऊली स्वस्वरूपात येऊन नाही तर ह्या देवमाणसांच्या हस्ते आपणास साह्य करीत असतात. अशी व्यक्ती आयुष्यात भेटलीच तर त्या क्षणीच विनम्र नमस्कारावे.
अशा व्यक्तीला कशाचाही व कोणाबद्दल राग, लोभ, मत्सर आणि द्वेष नसतो, अशी व्यक्ती सदैव प्रसन्न चित्त असते. एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यातील पाण्यात ओत, पाणी पाण्यास काय बुडवणार, ते फक्त मिसळते, पूर्वावस्था कायम असते.. तसेच शरीरधर्मानुसार जरी स्थितप्रज्ञ व्यक्तीचा चेहरा उदास, मलूल किंवा शारीरिक मरगळ आपणास जाणवली तरी ह्यांच्या अंतरंगाची प्रफुल्लित अवस्था, मानसिक प्रसन्नता अखंड कायम स्वरूपी असते. ”
“साहेबा एकदा का आपली बुद्धी अंतरंगातील भगवंताचे ठायी केंद्रित झाली की चित्त, अंतःकरण, मन केव्हाही किंचित देखील सैरभैर, अस्थिर, विचलीत होत नाही. खरच ज्यास असे व्हावे असे वाटते त्यासाठी साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे म्हणजे नित्य श्री गुरुस्मरण, माझे श्री गुरुदेव दत्त निरंतर माझ्यासोबत आहेत, असा भाव मनात दृढ खोलवर रुजवणे. अरे साहेबा हे तितके सोपे पण नाही आणि मनात दृढ निश्चय केल्यास कठीण देखील नाही. मात्र दृढ श्रद्धा, एकाग्रता, निष्ठा, मनाचा निग्रह आवश्यक आहे. अंतरातील श्री गुरुमूर्तीचा अनुभव, आपण ओठी श्री गुरुस्मरण करीत घ्यायचा आहे. तेव्हा कुठे तुझा अंतरात्मा आणि भगवंत श्री गुरुदेव दत्त भिन्न, वेगळे नाहीत अशी श्री गुरुनाम व श्री गुरुरूपाच्या समरसतेची अंतरंगास अनुभूती येते. ”
“स्थितप्रज्ञ माणसाचे मन हे समुद्रासारखे अक्षुब्ध, क्षोभरहित, दु:खरहित असते. अशी माणसे समाजात कितीही, कशीही, कुठेही वावरली, मिसळली तरी त्यांची मानसिक स्थिती स्थिर, त्यांची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर असते. कितीही नद्यांचे पाणी येऊन समुद्रात मिसळले तरी समुद्र पातळी स्थिर असते, नद्यांच्या प्रवाहाच्या मिसळण्याने समुद्रास महापूर आला असे ऐकलेले आठवते का कधी तुला साहेबा ? उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी समुद्रात मिसळले नाही तरी समुद्र पातळी कायम असते, तो कधी आटत नाही. ”
“ज्याचे उभे आयुष्य श्री गुरुदेव दत्त ह्यांचे कृपेने, शिकवणीने उजळून निघाले आहे, तो सूर्यप्रकाशासमक्ष पणती कशी लावेल आणि पणती लावली नाही म्हणून अंधारात सूर्यप्रकाशास कोंडणे जितके अशक्य तितकेच स्थितप्रज्ञ व्यक्तीची मानसिकता विचलीत होणे केवळ असंभव आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या समोर सर्व प्रलोभने पुसट ठरतात कारण श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या आत्मज्ञानाने ही व्यक्ती इतकी ऐश्वर्य संपन्न झालेली असते की ह्यांना जगातील कोणतेही इतर ऐश्वर्य कवडीमोल वाटते. सत्यच आहे ज्याचे जवळ श्री गुरुदेव दत्त माउली त्यास कशाची कमतरता जाणवणार. ”
“स्थितप्रज्ञ व्यक्ती आत्मसंधान साधण्यात मग्न असते. अंतरिक परमोच्च सुखाच्या आनंदाने तृप्त असते. श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या अंतर्ज्ञानाने संतुष्ट असते. ज्याचे मनी साक्षात श्री गुरुदेव दत्त अखंड त्याचे सोबत आहेत असा भाव पूर्णतः विकसित झाला आहे अशी स्थितप्रज्ञ व्यक्ती श्री गुरुमाऊली कृपेने परमानंदाने पुष्ट असते, मात्र स्थितप्रज्ञ व्यक्ती कधीच आत्मकेंद्री, स्वार्थी नसते तर त्यांच्या मनात ….
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
…. हीच सर्वांबाबत सद्भावना.. साह्य करण्याची भावना आरूढ झालेली असते. “
“काय साहेबराव, ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था व अशी असते स्थितप्रज्ञ किंवा निश्चल, स्थिर, न डगमगणारी मानसिकता असलेली व्यक्ती. काय उलगडला का काही अर्थ ? चला आता बाईक काढा आणि सोड मला हॉस्पिटलला आईकडे, चल निघूया “.
साहेबरावाच्या चेहरा समाधानी वाटत होता, बऱ्यापैकी अर्थ लागला होता बहुतेक त्याला, जाणवत होते आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने निघालो.
*******
लेखक : श्री गिरीश ओक
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈