इंद्रधनुष्य
☆ मी आहे तुझाच….☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆
काही वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला,
माझ्याविना आयुष्य कसं वाटतंय ? कानाशी पुटपुटला… ठीक चाललं आहे…. मी म्हटलं
संसाराच्या गाड्यात सहाजिकच तुझं थोडं विस्मरण झालं..
अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस ?
रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरले होते..
चाकोरीत फिरताना नकळत तुझे बोट सोडले होते..
शाळा कॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून
अशक्य ते शक्य झालं,
मेहनतीने का असेना यशाचं शिखर गाठता आलं…
आता संसारात सगळ्यांसाठी तडजोड करावी लागते, कधी मनही मारावं लागतं…
एवढं करूनही हिला काही येत नाही असं त्यांना वाटतं…
दोन पुस्तकं शिकून मुलं शहाणी होतात..
पहिला गुरु आई,
हेच नेमकं विसरतात..
नवऱ्याच्या पाठीशी बायको
खंबीरपणे उभी रहाते,
पण कौतुक सोडून,
‘वेंधळीच आहेस बघ’ हेच ऐकायची सवय होते…
मी मात्र मागे राहिले..
स्वतःसाठीचं जगायचं विसरले…
मित्रा आता घे परत हातात हात, पूर्वीसारखी असू दे तुझी कायम साथ..
तो म्हणाला, मिळवण्यासाठी मला कणखर व्हावं लागतं,
नवा दिवस उगवण्यासाठी तर पृथ्वीलाच सूर्याभोवती फिरावं लागतं…
हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास ?
तो ही हसला.. म्हणाला,
ओळखलं नाहीस अजून..?
मी आहे तुझाच….
आत्मविश्वास
संग्राहक :– कालिंदी नवाथे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈