श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
राम राम मंडळी !!
ईश्वर कृपेने आपण सर्वजण सकुशल असाल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हा अक्षररूप तिळगुळ पाठवीत आहे.
” तिळगुळ घ्या गोड गोड बोला।”
पारंपारिक पद्धतीने मकरसंक्रांती साजरी करीत असताना आपण सर्वांना तिळगुळ देतो आणि त्यावेळी आपल्या तोंडात वरील उद्गार सहज येत असतात. हे नुसतं ऐकायलाही किती गोड वाटतं. आज सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळात सुद्धा एका अर्थाने निर्जीव तिळगुळ आपण एकमेकांस पाठवतो आणि त्यात सुद्धा खरा तिळगुळ मिळाल्याचा, खाल्याचा आनंद मानतो. किती लोकविलक्षण आहे हे! हिंदू धर्म सोडला तर जगाच्या पाठीवरील आज अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या कोणत्याही धर्मात अशी परंपरा असल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असेल याच्यामागे ? असे कोणाला सुचले नसेल की तशी बुद्धीच झाली नसेल ? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. आता एखाद्याच्या मनात प्रश्न का यावेत याचे वस्तुनिष्ठ उत्तर देणे तसे अवघडच. वरील प्रश्नाचा विचार करताना असे जाणवले की केवळ आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. तो ‘भोगावर’ आधारित नाही तर ‘त्यागावर’ आधारित आहे. ज्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याजवळील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला देण्यात समाधान मानते तसे हिंदू धर्म देखील देण्यात समाधान मानणारा, त्यागावर श्रद्धा ठेवणारा आहे. नुसता श्रद्धा ठेवणारा नाही तर तसे आचरण करणारा आहे.
“पेड हमे देते है छाया,
हवा नया जीवन देती है।
भूख मिटाने को हम सबकी,
धरती पर होती खेती है।।”
औरोंका भी हीत हो जिसमे
हम भी तो कुछ करना सिखे।”
मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यास कधी सुरुवात झाली ? पहिला सण (संक्रांत ) कधी साजरी केली गेली याची नोंद इतिहासास ठाऊक नाही. अर्थात ही झाली पुस्तकी माहिती. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मात असे लिहून ठेवणे, त्याचे श्रेय (स्वामित्व) घेणे आणि ‘स्वामीत्वा’च्या जीवावर ज्ञान बंदिस्त ठेवणे अपेक्षित नसावे म्हणून तर आपल्याकडील विविध प्राचीन विश्वविद्यालयात ज्ञान निःशुल्क मिळत असे आणि ते सर्वांना सुलभ होते. इतिहासात असे वर्णन आहे की परदेशातून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात / विषयांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असत.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रमण असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्रमण अर्थात दक्षिणायन सुरु होते, तर मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. फार पूर्वी ही संक्रांत २३ डिसेंबर ला साजरी केली जायची. परंतु सूर्याच्या गतीचे गणित लक्षात घेता तर ७८ वर्षांनी ती एकेक दिवस पुढे जात ती आज १४ जानेवारी पर्यंत पुढे आली आहे. अशी हळूहळू ती पुढेच जात राहील. खगोल अभ्यासक असे म्हणतात की की ही संक्रांत काही शे वर्षांनी मार्च महिन्यात अर्थात ऐन उन्हाळ्यात येईल.
मकरसंक्राती आपल्याकडे साधारण तीन दिवस साजरी करण्यात येते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत. संक्रांत ही देवी असून देवीने शंकासूर आणि किंकरासूर राक्षसांवर मिळविलेला विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हीचे स्वरुप नेहमीप्रमाणे प्रसन्न, मंगलदायक नसून लांब ओठ, एक तोंड, दीर्घ नाक, नऊ बाहू असे आहे. थोडी अक्राळविक्राळ आहे. दरवर्षी हिचे वाहन, अस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वेगवेगळे असतात. आपले अलंकार आणि वस्त्र यातून ती भविष्यकाळ सुचवीत असते, असे मानले जाते. ‘संक्रांत आली’ अशी म्हण यामुळेच असावी असे म्हणता येईल.
दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो काळ थंडीचा असतो. त्यामुळे त्यावेळी तीळ आणि गूळ खाण्याची पद्धत आहे. तीळ हे थंड, स्निग्ध असतात तर गूळ उष्ण, बलवर्धक आहे. शरीर बळकट होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पदार्थ सामान्य मनुष्यास सहज उपलब्ध आहेत. हा सण देशाच्या विविध भागात विविध नावाने साजरा केला जातो.
*आपल्याकडील कोणताही सण साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन ‘सामाजिक बांधिलकी’ हेच असते. खास करुन रक्षाबंधन आणि मकरसंक्राती हे दोन सण विशेष करुन सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. एका सणात भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसे कंकणच बांधून घेतले आहे. जर अगदी मनापासून आणि व्यापक बुद्धीने हे कंकण प्रत्येक भाऊ (पुरुष) आपल्या मनगटावर बांधेल तर प्रत्येक बहीण (स्त्री )निरंतर सुरक्षित राहील. तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे सूत्र समाजातील प्रत्येक घटक पाळेल तर सारा भारत एक क्षणात तंटामुक्त होईल.
आपल्याकडे सर्व आहे. ज्ञान, विज्ञान अगदी सर्व आहे. फक्त डोळसपणे त्याकडे बघण्याची गरज आहे, काळानुरूप सणांचे अर्थ लावून ते समजून घेण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे. पूर्वी उद्योगांचा एकेक आदर्श नमुना आपल्याकडे होता. यास ‘स्वयंपूर्ण खेडी’ असे म्हटले जायचे. बारा बलुतेदार होते. ही बारा लोकं एकत्र येऊन एकदिलाने गावागाडा नुसती हाकत नव्हती तर कुटिरोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग घेत होती. कोणी मोठा नव्हता आणि छोटा नव्हता. सर्व एकसमान होते. इंग्रज येईपर्यंत ही परंपरा टिकली. परंपरागत व्यवसाय असल्यामुळे कारागीर गुणवत्तावान, कुशल होते. १४ विद्या आणि ६४ कला जगाला अलंकृत करीत होत्या. परंतु हे पांढऱ्या पायाच्या इंग्रजांना रुचले नाही, त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडले, हात तोडले, पाय तोडले नि देशी उद्योग नष्ट केले. बेकारी हा शाप इंग्रजांनी दिलेला आहे. त्यांनीच जातीपातींना उच्च नीच असा दर्जा दिला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमूळे आपल्याला सुद्धा इंग्रज सांगून, लिहून गेले तेच खरे वाटते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ढाक्क्याची मलमल प्रसिद्ध होती. त्यावेळी तलम पातळाची ( साडीची) घडी काडेपेटीत राहत असे वर्णन खुद्द इंग्रजांनी केलेले आहे. आज पुन्हा याचे स्मरण करण्याची गरज आहे. जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे आपण आपला जाज्वल्य पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास न विसरता पुढील पिढीत संक्रमीत करण्याची गरज आहे. ती काळाची मागणी आहे असे मला वाटते. सर्व काही सरकार करेल ह्या भ्रमात आपण राहू नये यापेक्षा जे मी करु शकतो ते मीच करेन आणि अगदी आत्तापासून करेन असा संकल्प आपण सर्वांनी या संक्रांतीच्या निमित्ताने करुया. *
देवीने शंकासुर आणि किंकरासुरावर विजय मिळविला. आपण मनातील शंकाकुशंका, हेवेदावे, समजगैरसमज, अनिष्ट रूढी, वाईट चालीरीती, भेदाभेद यावर विजय मिळवून एकसंघ, समरस हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. आज दुष्ट शक्ति जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. पण हिंदू विचार जा जोडणारा आहे. आणि दैनंदिन व्यवहारात तोडणाऱ्या पेक्षा जोडणाऱ्यालाच जास्त प्रतिष्ठा मिळते हे कोणीही विसरु नये. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून किंवा अशी वाक्ये नुसाती तोंडपाठ करुन आता चालणार नाही तर हे सर्व कृतीत आणण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया. माझे घर सोडून शेजारी, गावाच्या शेजारी असलेल्या माझ्या बंधूला मी तिळगूळ देईन आणि परस्परातील सुप्त रुपात असलेला स्नेह प्रगट करुन वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय आपण सर्वांनी करुया आणि ‘विश्वमैत्री दिन’ साजरा करुया
“तिळगूळ देऊ तिळगूळ खावू|
मनामनात स्नेह उजळवू|”
जन मनात विश्व मैत्र रुजवू||
भारतमाता की जय।
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈