सौ. स्मिता सुहास पंडित
इंद्रधनुष्य
☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
… एक अभ्यासपूर्ण लेख –
🎼 🎤🎻🎹 🎷🥁
रविवारी पुणे ओपीडी मधे कोणत्या रुग्णाला सांगितले नक्की आठवत नाही.
काय सांगितले ते आठवत आहे.
स्वयंपाक करत असताना, भोजन करत असताना आणि भोजन झाल्यानंतर १ तास ‘मंद स्वरातील’ संगीत घरी लावत जा.
इथे आपल्याला म्युझिक, डीजे, मॅश अप नको आहे. भावगीत, भक्तीगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यांचा शांत आवाज पुरेसे आहे.
त्याने काय होईल ?? रुग्णाचा प्रश्न!
दोन महिने न चुकता करा आणि मला तुम्हीच सांगा… माझे उत्तर!
संगीत – स्वर यांचा आणि आपल्या शरीरातील दोष स्थितीचा ‘थेट’ संबंध आहे.. त्या विषयी….
शरीरातील दोषांची साम्यावस्था आणि शरीराचा बाहेरच्या घटनांना मिळणारा प्रतिसाद यात पंचज्ञानेंद्रिय पैकी कानाशी बराच जवळचा संबंध असतो.
प्रकाश आणि आवाज याचा वेग प्रचंड असतो.
कित्येक मैल दूर वीज पडली तर आपला जीव घाबरा होतो.
चार रस्ते सोडून कोठे करकचून ब्रेक कोणी मारला तर आपण काळजी करतो.
घरी कोणी मोठ्याने बोलले तर नाजूक मनाच्या लोकांना चक्कर येते… इत्यादी!
पूर्वी जेव्हा लग्न हा संस्कार असायचा, इव्हेन्ट नसायचा तेव्हा बिस्मिल्ला साहेबांची सनई आपले स्वागत करायची.
आता योयो किंवा बादशाह, डीजे किंवा ढोल पथक आपले वेलकम करते.
संस्कारापेक्षा भपका जास्त.
शांती पेक्षा गोंगाट जास्त.
याने काय होते ? मूळ हेतुकडे दुर्लक्ष होऊन विनाकारण हृदयात धडधड वाढते.
पुढील वर्ग पहा –
१. जेवण बनवत असताना फोनवर बोलणारे.
२. जेवण करत असताना फोन वर बोलणे – व्हिडीओ पाहणे – टीव्ही पाहणे – इमेल्स पाहणे इत्यादी.
३. जेवण करत असताना भांडणे / मोठ्याने बोलणे, समोर असलेल्या प्रदार्थाबद्दल वाईट बोलणे.
४. गप्पा मारत जेवणे.
५. जेवण झाल्यावर ऑफिस चे काम / घरकाम / बाहेर जाणे इत्यादी.
या पाच प्रकारात आपण कोठे ना कोठे बसत असतो. अगदी रोज.
चार घास खायला मर मर करायची आणि चार घास युद्धभूमीवर बसून खायचे..
डोकं शांत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. जिभेवर नियंत्रण नाही. ही अनारोग्य निर्माण करणारी तिकडी!
संगीत हे नादावर आधारलेले आहे.
अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ‘नाद ‘ म्हणतात.
आपल्या हृदयात २२ नाडी आहेत असं मानले जाते. या क्रियाशील नाड्यानी हृदय आणि शरीर याचे संचलन होते.
याच आधारावर संगीतात २२ श्रुती मानल्या आहेत. या एका पेक्षा एक वरच्या पट्टीत आहेत.
बावीस श्रुती मधून बारा स्वर.
हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे :
– षड्ज (सा),
– कोमल ऋषभ (रे),
– शुद्ध ऋषभ (रे),
– कोमल गांधार (ग),
– शुद्ध गांधार (ग),
– शुद्ध मध्यम (म),
– तीव्र मध्यम (म),
– पंचम (प),
– कोमल धैवत (ध),
– शुद्ध धैवत (ध),
– कोमल निषाद (नी),
– शुद्ध निषाद (नी)
– आणि षड्ज (सा).
यातील षड्ज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा सूर्य.
श्रवणेंद्रिय मार्फत ऐकलेले जे ब्रह्मरंध्र पर्यंत पोहोचून त्या नादाचे विविध प्रकार होतात त्यांना श्रुती म्हणतात.
तीन सप्तक –
१. मंद सप्तक – हृदयातून निघणारा आवाज
२. मध्य सप्तक – कंठातून निघणारा आवाज
३. तार सप्तक – नाभी पासून निघून ब्रह्म रंध्र पर्यंत जाणारा आवाज.
आपल्या दोषांची स्थिती दिवसभरात बदलत असते. सकाळी कफ वाढतो. दुपारी पित्त आणि रात्री वात वाढतो.
रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय.
हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध, शुद्ध असणारे राग रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग.
यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशावेळी संधिप्रकाशसमयी सामान्यतः रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात.
सकाळी ७ ते १० व
रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून,
रात्री १० ते ४ व
दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. शरीरातील दोषांचे संतुलन करायची क्षमता या रागात, संगीतात आहे.. !
आपल्याला कायम उद्दीपित करणारे संगीत ऐकायची सवय झाली आहे.
बेशरम रंग असेल किंवा काटा लगा व्हाया बदनाम मुन्नी ते शीला ची जवानी.. स्पोटिफाय वर हेच ऐकणे सुरु असते.
मी संगीतातील तज्ज्ञ नाही. मी संगीत शिकलेलो नाही.
ठराविक आवाजाला शरीर प्रतिक्रिया देते हे सत्य आहे.
स्वयंपाक करत असताना कानावर भिगे होठ तेरे पडत असेल तर सात्विक मेनू पण तामसिक गुणांचा होतो.
जेवण करत असताना कानावर रडकी गाणी पडत असतील तर राजसिक वाढ होते.
आपण काय खातोय यापेक्षा आपण कोणत्या वातावरणात खातोय हे महत्वाचे असते!
वर उल्लेख केलेले संगीत आपल्या वृत्ती स्थिर करतात.
आपण जे काम करत आहोत त्यात एकाग्र करण्यास मदत करतात.
आपण जे खाल्ले आहे ते पचवायला मदत करतात… !
क्राईम पेट्रोल बघत जेवण करणारे कालांतराने आक्रमक होतात असे माझे निरीक्षण आहे!
कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर दोन महिने हे करून बघावे.
मी स्वतः स्वयंपाक करत असताना, जेवताना, रुग्ण तपासणी करत असताना गीत रामायण, मनाचे श्लोक, क्लासिकल इत्यादी ऐकत असतो.
आपल्याला कोठे ‘कुंडी ना खडकाओ राजा सीधे अंदर आओ राजा’ असे स्टंट करायचे आहेत.
आजूबाजूचे वातावरण सात्विक असेल तरच खाल्लेले अन्न सात्विक गुणाचे होते.
नाहीतर फक्त सलाड चरून कायम शिंग मारायची खुमखुमी असलेले मेंढे आपल्या आजूबाजूला शेकड्याने आहेतच की..
🎼 🎤 🎼
लेखक : डॉ. अनिल वैद्य
…. एक संगीत प्रेमी…
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈