श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
ओ. पी. नय्यर
“मी कंपोजर म्हणून जन्माला आलो.. कंपोजर म्हणुनच देह ठेवणार”
हे उद्गार आहेत ओ. पी. नय्यरचे. ओपीचा जन्म लाहोरचा. जगण्याची ऐट बघावी तर लाहोरमध्ये असा तो काळ. मदन गोपाल नय्यर या सरकारी हुद्देदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा संगीत क्षेत्रात नाव काढील असं खरं तर कोणालाही वाटलं नसेल. लाहोरच्याच शाळेत तो शिकला. माध्यम उर्दू. अभ्यासात त्याचं लक्ष कधीच नव्हतं. छंद गाणी म्हणण्याचा.
असंच एकदा लाहोर रेडिओ वर गाणं म्हणण्याची त्याला संधी मिळाली. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ.
… आणि मग त्याला रेडिओवर कामं मिळतंच गेली. कधी लहान मुलांच्या कार्यक्रमात तर कधी कोरसमध्ये. त्याकाळी लाहोर फिल्म इंडस्ट्री जोरात होती. त्याला एक दोन चित्रपटात कामेही मिळाली. घरच्यांचा अर्थातच विरोध. पोरगं वाया गेलं.. गाणं बजावण्याच्या मागे लागलं ही भुमिका.
तो मॅट्रीक झाला. जेमतेमच मार्क मिळाले. लाहोरमधल्या यथातथा कॉलेजमध्ये एडमीशन मिळाली. आता त्याला वेड लागले इंग्रजी चित्रपट बघण्याचे. त्यातील पात्रांचे रहाणीमान,स्टाईलच्या तो प्रेमात पडला. त्यानेही आपली स्टाईल बदलली. सिल्कचा फुल स्लीव्ह शर्ट, ट्राऊजर,पायात चकचकीत शुज,आणि डोक्यावर हैट.
देशाची फाळणी झाली आणि सगळंच बदलुन गेलं. तो मुंबईत आला. काही चित्रपट मिळत गेले. पण हवं तसं यश काही मिळत नव्हतं. पण ‘आरपार’ आला आणि ओपीचं नशीब बदललं. एकामागोमाग एक हिटस्. फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. यश.. पैसा.. किर्ती कशालाच कमी नाही. मोती माणकांचा पाऊस पडत होता. ओपी म्हणतो..
माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे ‘लव अफेअर’ दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरशः सोन्याचे मढवुन काढली. यश.. पैसा.. किर्ती.. सुंदर, बुध्दिमान ललनांचा सहवास.. सगळं सगळं उपभोगलं. यथेच्छ.
आणि मग त्याच्या लक्षात येत गेलं. मोठे निर्माते आपल्याला टाळताहेत. काही बी ग्रेड.. सी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यातही एखाद दुसरं गाणं हिट जायचं.
ओपीने काळाची पावलं ओळखली. काही प्रॉपर्टीज विकल्या. शेअर्स मध्ये पैसे अडकवले. मरीन ड्राईव्ह वरचा प्रशस्त फ्लॅट ठेवला. देवाला विनवले..
शेवटपर्यंत माझी ऐट सांभाळ.
आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीपासुन अलगदपणे दुर झाला. नवीन आयुष्य सुरु झाले. सकाळी जरावेळ हार्मोनियम घेऊन बसायचे. त्यानंतर देवाचा जप. एका वहीत तो ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असं लिहीत. पण उर्दूत. ओपीला देवनागरी लिपी लिहीता वाचता येत नव्हती. कारण शिक्षण झालेलं उर्दू माध्यमात.
संध्याकाळ तो पेशंट तपासे. हो तो आता किंचितसा डॉक्टर झाला होता. झालं काय कि.. एकदा त्याला कसलासा त्रास होत होता. आशा भोसले आणि सुधीर फडके त्याला घेऊन गेले डॉ. फाटकांकडे. डॉ. फाटक होमिओपॅथीत निष्णात. त्यांच्या औषधाने ओपींना आराम वाटला. ओपीने डॉक्टरांचे शिष्यत्व पत्करले. होमिओपॅथीची ओळख झाली. आणि मग संध्याकाळी दोन तीन पेशंटस् तपासु लागले. पण मोफत.
फी साठी नाही.
कधी रात्री जेवण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वर जाऊन बसावे.. तर कधी इंग्रजी चित्रपटाला. रिगल.. लिबर्टी.. इरॉस ही आवडती थिएटर्स. जायचं ते थाटात. एकदम चार पाच तिकिटं खरेदी करायची. आजुबाजुच्या खुर्च्या रिकाम्या. त्यावर कोट.. हॅट ठेवायची. पाय लांब करायचे.. आणि चित्रपट एंजॉय करायचा.
१६ जानेवारी म्हणजे ओपीचा जन्मदिवस. आदल्या दिवशी भरपूर मिठाया.. ड्राय फ्रुटस् आणुन ठेवायचा. दिवसभर चाहत्यांची गर्दी. पहिला बुके येणार एच. एम. व्ही. कडुन.
संध्याकाळी गाण्यांची मैफल जमायची कोणी कोणी येत.. ओपीची गाणी म्हणत. कधी सुरात.. कधीच बेसुरातही. पण ओपीला ते आवडे.
असेच एकदा एका नवोदित गायकाने गाणं म्हणायला सुरुवात केली.
‘चल अकेला.. चल अकेला.. ‘
आणि ओपीला तो दिवस आठवला……
एस. मुखर्जी ‘संबंध’ बनवत होते. गाणी होती कवी प्रदिप यांची. संगीत ओपी. त्यादिवशी प्रदिप यांनी गाणं लिहुन आणलं. हेच ‘चल अकेला.. चल अकेला.. ‘ आणि मुखर्जींकडे हट्ट धरुन बसले. याला चाल मीच लावणार.. गाणारही मीच.
ओपीने ते गाणं वाचलं. आणि त्यांच्या लक्षात आलं. प्रदिप या चांगल्या गाण्याचा विचका करणार. ते चिडले. आणि घरी निघून आले. ते गाणं डोक्यात घोळत होतंच. शब्द कसदार होते. अर्थ प्रवाही होता. पियानोवर बसले आणि एक अफलातुन चाल त्यांच्याकडून तयार झाली.
थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग प्रदिप आणि मुखर्जी ओपींकडे आले. त्यांची समजूत घालायला. आल्यानंतर प्रदिप यांनी ते गाणं.. ती चाल ऐकली आणि म्हणाले..
“ओपी तुम्ही माझ्या गाण्याचं लखलखतं झुंबर करुन टाकलंय”
ओपीने नंतर ते गाणं रेकॉर्ड केलं. मुकेशच्या आवाजात. वास्तविक मुकेश ओपीकडे फारसा गायला नाही. पण या गाण्यासाठी मुकेशच हवा हा आशा भोसलेचा हट्ट.
“या गाण्याचं मुकेश सोनं करील”
हा आशाचा अंदाज सहीसही खरा ठरला.
————————————-
या गीतातील शब्द खरे ठरतील.. तेही आपल्या आयुष्यात हे ओपीला ठाऊकच नव्हते. निवृत्तीनंतरचं सुखासीन आयुष्य सुरु होतं. पण नशीब पालटलं. कौटुंबिक वाद सुरु झाले. प्रत्यक्ष बायको, मुलांनीच इस्टेटीवरुन त्याच्यावर दावा ठोकला. आणि ओपी कोसळला.
कोणताही विरोध न करता त्याने आपला फ्लॅट सोडला. अंगावरच्या कपड्यानिशी ओपी बाहेर पडला. सोबत घेतला फक्त हार्मोनियम.. जो त्याने लाहोरला पहिल्या कमाईतून घेतला होता. आणि घेतल्या नोटेशन्सच्या वह्या.
सगळं सोडुन दुर विरारला एका साध्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रहायला आला. दुर तिकडे लाहोरला पर्वत पहाडांच्या मुलखात जन्माला आलेला.. मुंबईत सागर किनारी स्थिरावलेला.. यश,किर्ती सगळं काही मिळवलेला ओंकार प्रसाद नय्यर. शेकडो गाणी ज्याने आपल्या सुरांनी मढवली.. त्याच्या आयुष्याची आता संध्याकाळ झाली होती. अगदी
‘लागले नेत्र रे पैलतीरी’
ही अवस्था. वारंवार जुने दिवस आठवताना त्याच्या लक्षात आले..
मागे नसतं पहायचं आठवणीत शिरताना..
पावलं जड पडतात
तिथुन मागे फिरताना.
आणि मग साऱ्या जुन्या आठवणींना त्याने मागे सारले. आपला जुना.. लाडका हार्मोनियम पुढे ओढला. आणि तेच गीत पुन्हा पुन्हा आळवु लागला…
‘चल अकेला चल अकेला चल अकेला…
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.. ‘
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈