सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नारी शक्ती दिवस…☆ सुश्री शोभा जोशी ☆

राणी मां गाईदन्ल्यू

“नारी शक्ती दिवस …”

हम इस देश की नारी है!

फूल नही चिंगारी है

असं गर्वाने सांगणार्‍या या पराक्रमी स्रियांचा सन्मान करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपला पराक्रम सिध्द करणार्‍या अनेक स्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. अगदी देवी देवतांपासून अलिकडच्या स्रियांपर्यंत. अगदी जनजातीतील स्रिया सुध्दा याला अपवाद नाहीत.

२६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून का निवडला?जी महिला ब्रिटिशांविरूध्द लढा देताना ऐन तारूण्यात १४ वर्षं ब्रिटिशांच्या कैदेत राहिली, त्या राणी मां गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस.

पूर्वेकडील मणीपूर राज्यात, काला नागा पर्वतांची रांग आहे. तेथील लंकोवा गावामध्ये,रोंगमै जनजातीतील लोथोनाग व करोतलीन्ल्यू या दांपत्त्याच्या पोटी,२६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यूचा जन्म झाला. ७ बहिणी व १ भाऊ असा त्यांचा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखविणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीनुसार,गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न आणि चिंतनशील होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिश्र्चनांचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून संरक्षण करणं,रूढी परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं,तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून उराशी बाळगलं होतं.

‘हेरका’ या धार्मिक आणि नंतर स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलेल्या आंदोलनाचा प्रणेता,गाईदन्ल्यूंचा चुलत भाऊ,हैपोऊ जादोनांगला ब्रिटिशांनी फासावर लटकावले आणि वयाच्या १६ व्या वर्षी या लढ्याचे नेतृत्व गाईदन्ल्यूंकडे आले.

इंग्रजांना टॅक्स न देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. साथीदारांच्या साथीने,गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले केले. असे करून त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्यांना पकडण्यासाठी आधी २००/- रू. आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं पण त्या इंग्रजांच्या हाती लागल्या नाहीत.

१६ फेब्रु. १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण पोलोमी गावी आऊट पोस्ट बनवत असताना,एका बेसावध क्षणी त्या पकडल्या गेल्या. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला.

१९३७ साली पं. नेहरूंनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. त्यांचा पराक्रम पाहून, ‘ आपण तर नागांची राणी आहात ‘या शब्दात त्यांचा गौरव केला. राणी माॅं गाईदन्ल्यूची तुरूंगातून सुटका करावी,ही नेहरूंची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली. स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सूर्याला तात्पुरते ग्रहण लागले म्हणून तो कायमचा निस्तेज होत नाही. तसेच तुरूंगातून सुटल्यावर राणी माॅं पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं. १९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. १७ फेब्रु. १९९३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. त्यांचे देशासाठीचे योगदान पाहून त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले होते.

जनजातीमध्ये इतरही अनेक स्रियांनी मुघलांविरूध्द आणि इंग्रजांविरूध्द लढताना परा क्रम गाजवला आहे. वेळप्रसंगी प्राणांचे बलिदान दिले आहे. उदा.

महाराणी दुर्गावती. – ५ आॅक्टोबर १५२४ ला गोंंडवनातील कालिंजर किल्ल्यात जन्मलेली दुर्गावती पुढे गढमंगला राज्याची राणी झाली. या कुशल प्रशासक,पराक्रमी, शूर वीर राणीने अकबराच्या सैन्याचा युध्दात दोनदा पराभव केला. तिसर्‍या वेळी हार समोर दिसत असताना,ती बादशहा अकबराला शरण गेली नाही. तिने स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून मरण जवळ केले.

झलकारीबाई – 

‘दैवायत्त कुले जन्मं

मदायत्तं तु पौरूषम् ‘

माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे हातात नसलं तरी जन्म कसा घालवावा हे आपल्याला ठरवता येतं. ही उक्ती खरी करून दाखवली ती झलकारीबाईंनी. बुंदेल खंडातील भोजला गावामध्ये जनजातीतील एका निर्धन कोळी कुटूंबातील,खांदोबा आणि धनिया या दाम्पत्यापोटी २३ नोव्हेंबर १८३० रोजी जन्मलेल्या झलकारीबाई पुढे राणी लक्ष्मीबाईंच्या ‘दुर्गा ‘ नावाच्या सेनेच्या महिला तुकडीच्या सेनापती झाल्या. तलवारबाजी,बंदुका, तोफा चालविण्यात त्या पटाईत होत्या. झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी,राणी लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे हे झलकारीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी राणींच्या दत्तक पुत्राला घेऊन,किल्ल्यातून बाहेर पडण्याचा सल्ला राणींना दिला.

झलकारीबाई आणि राणींच्या चेहर्‍यात खूप साम्य असल्याने त्या राणींच्या वेशात इंग्रज सैन्याला सामोर्‍या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवले.

फुलो आणि झानो – संथाल परगण्यातील सिध्दो – कान्होंच्या या बहिणी कुर्‍हाडीने शत्रूला मारण्यात तरबेज होत्या. त्यांनी इंग्रज आणि जनतेच्या शोषणकर्त्या जमीनदारांविरूध्द सशस्र संघर्ष केला.

अंदमानची लीपा,मिझोरामची राणी रोपुईलियानी,अरूणाचलच्या सीमावर्ती भागातील नीरा आणि सेला,छत्तीसगड मधील दयावती कंवर, राजस्थानची कालीबाई,उत्तराखंडची गौरादेवी,गोंडवनाची राणी फुलकंवर इ. या निरनिराळ्या राज्यातील सर्व स्रियांनी इंग्रजांविरूध्द लढा दिला आहे. जनजातीतील अशा अजून कितीतरी स्रिया आहेत.

या अधुनिक काळातील महिलाच पराक्रमी होत्या असं नाही. तर वारसा अगदी आपल्या देवी देवतांपासून चालत आला आहे. महिषासूर मर्दिनी,काली माता,चंडिका अशा अनेक देवता ज्यांनी आपल्या शक्तीने आणि पराक्रमाने अनेक राक्षसांचा नाश केला.

इतिहासात डोकावले तर राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,राणी ताराबाई,राणी चेन्नम्मा अशा कितीतरी स्रियांची नावं समोर येतील. या झाल्या युध्दभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या स्रिया. पण बौध्दिक क्षेत्रातही स्रिया मागे नाहीत. पुराणातील गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा इत्यादींनी आपल्या बुध्दीचातुर्याने मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना हरवले होते. विद्वत्तेच्या बाबतीत डाॅ. आनंदीबाई जोशी,डाॅ. रखमाबाई राऊत,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले इ. स्रियांनी आपली विद्वत्ता अशा काळात सिध्द केली की, ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती.

या स्रियांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी,पराक्रमी राणी गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. 💐🙏

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

वनवासी कल्याण आश्रमाच्या उपक्रमातून माहिती नसलेल्या स्त्रियांची ओळख करून दिली आहे.