सुश्री प्रज्ञा मिरासदार
इंद्रधनुष्य
☆ — वाऱ्याचे शहर — शिकागो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
सहा वेळा अमेरिकेत जाऊन मी बरीच शहरे पाहिली. तशी या वर्षांत देखील पाहिली. संपूर्ण कॅलिफोर्निया पाहिला. पण मनात भरले ते फक्त शिकागो शहर !! विंडी सिटी म्हणजे वाऱ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर मिशिगन राज्यात मिशिगन लेक या समुद्रासारख्या मोठ्या सरोवराकाठी वसले आहे. खूप वर्षांपासून मला ते सुंदर शहर पहायचे होते. यावर्षी तो योग आला.
हे शहर पाहण्याचे मुख्य कारण केवळ स्वामी विवेकानंद हे होय. शिकागोमध्ये झालेली सर्व धर्म परिषद, फक्त गाजली ती स्वामीजींनी केलेल्या भाषणामुळेच !!!! प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा प्रचंड अभिमानच आहे.
The Art Institute of Chicago या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिल्डिंगमध्ये स्वामीजींनी सर्व धर्म परिषदेत जे व्याख्यान दिले, ते जगप्रसिद्ध आहे. जगभरात खूप सर्वधर्म परिषद झालेल्या आहेत. पण ही सर्वधर्म परिषद आजतागायत सर्वांच्या स्मरणात आहे– ते फक्त स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच!!!!
या परिषदेस हिंदू धर्माच्या एकाही प्रतिनिधीला निमंत्रण नव्हते. या आधीच्या कुठल्याही सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी नसे. पण स्वामीजी या परिषदेसाठी भारतातून कसेबसे शिकागोला पोहोचले. खूप प्रयत्न करून, असंख्य लोकांना भेटून शेवटी त्यांनी या सर्व धर्म परिषदेत प्रवेश मिळविला. आर्थिक मदत मिळविली आणि बोटीत बसून दोन महिन्यांनी ते शिकागोत पोहोचले. अर्धपोटी व प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले.
सर्वात शेवटी पाच मिनिटे भाषण करण्याची त्यांना परवानगी कशीबशी मिळाली. त्यांनी आपला धर्मग्रंथ म्हणून श्रीमद् भगवद्गीता नेलेली होती. तीही आयोजकांनी सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. सर्वांची व्याख्याने झाल्यावर स्वामीजी बोलायला उभे राहिले. इतर सर्वजण सुटा बुटात होते. एकटे स्वामीजी भगव्या वस्त्रात होते.
त्यांनी सुरुवातीलाच शब्द उच्चारले “माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” !!!!!
आणि जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अडीच मिनिटे त्या भल्या मोठ्या सभागृहात निनादत होता. पुढे पाच मिनिटांचे भाषण दीड तास लांबले. पूर्ण सभागृह दीड तास मंत्रमुग्ध झाले होते. स्वामीजींनी इतिहास रचला होता. त्यात त्यांनी हिंदू धर्माविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि हिंदू धर्माविषयी इतरांच्या मनातील गैरसमज दूर केले. जगात हिंदू धर्माला मानाचे स्थान स्वामीजींनी मिळवून दिले. शेवटी त्यांनी सांगितले की, “हा माझा धर्मग्रंथ– सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवला आहे. याचे कारणच असे आहे की, जगातील सर्व धर्मांचे व धर्मग्रंथांचे तत्वज्ञान याचे मूळच या भगवद्गीते मध्ये आहे. “
याच कारणाने ही सर्व धर्म परिषद गाजली. ती जिथे झाली ती इमारत आम्ही पाहिली. तिथे एका रूम मध्ये स्वामीजींविषयी, त्या परिषदेविषयी सर्व पुस्तके आहेत. स्वामीजींची छोटी मूर्ती तिथे ठेवलेली आहे. बाहेर हमरस्ता जो आहे, त्यावर “स्वामी विवेकानंद पथ” अशी इंग्रजीतली ठळक निशाणी आहे. ती पाहून अभिमानाने ऊर भरून आला.
शिकागो जवळच्याच नेपरविले या गावाकडे जाताना वाटेवरच स्वामी विवेकानंदांच्या स्मृती जपणारा “विवेकानंद वेदांत सोसायटी” नावाचा आश्रम आहे. आजूबाजूस संपूर्ण जंगल भोवती असून, मध्ये हा आश्रम होता. आश्रमात पोहोचेपर्यंत रस्ता चांगला असूनही, कुठेही माणूसच काय, पण गाडीही दिसत नव्हती.
आम्ही बाहेर गाडी पार्क केली आणि बंद दार उघडून आत गेलो. तिथे मात्र दोघे तिघेजण होते. त्यांनी आम्हाला तेथील मोठी लायब्ररी, स्वयंपाक घर डायनिंग हॉल सगळं दाखवलं.
लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक ध्यानमंदिर आहे. ते एक मोठे सभागृह आहे. 100 जण बसतील एवढ्या खुर्च्या तिथे आहेत. एखाद्या देवघरात बसल्यानंतर शांत वाटावे तसे इथे वाटते. देवघरासारख्या या ध्यानमंदिरात आम्ही काही वेळ शांत बसलो. तिथे — विवेकानंद सर्व धर्मामधील काहीतरी चांगली तत्त्वज्ञाने आहेत– असे मानत होते. त्यामुळे अनेक धर्मांची प्रतीके तिथे लावलेली आहेत.
बाहेरच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचे पूर्ण चरित्र, काही चित्रे, फोटो आणि माहिती या स्वरूपात भिंतीवर लावलेले आहे. त्यामध्ये स्वामीजी अमेरिकेत कसे आले, त्या सर्वधर्म परिषदेत भाषण देण्यासाठी ते कुणाकुणाला भेटले, कोणी त्यांना मदत केली तर कोणी झिडकारून लावले. शेवटी कशीबशी परवानगी स्वामींना मिळाली. ही सर्व माहिती व फोटो आम्ही वाचले, आम्ही पाहिले. तिथेच आम्हाला स्वामीजींच्या विषयी खूप माहिती मिळाली आणि अभिमान वाटला.
अजून एक The Hindu Temple of Greater Chicago या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. इथे अनेक देवतांचे छोटे छोटे गाभारे आहेत. अमेरिकेत जी जी हिंदू मंदिरे पाहिली तिथे असेच स्वरूप दिसते. या ग्रेटर शिकागो मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्म प्रसाराचे हे एक मोठे केंद्र आहे. खूपच मोठा विस्तार आहे या मंदिराचा!!!
मंदिर जरा चढावर आहे. येण्याच्या वाटेवर खूप सुंदर परिसर आहे. एके ठिकाणी उजव्या हाताला एक मोठी व रेखीव सुंदर मेघडंबरी आहे. त्यात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तो पाहून खूप आनंद आणि समाधान झाले.
परक्या देशातही आपल्या सनातन धर्माची ध्वजा स्वामीजींनी आजही फडकवत ठेवली आहे. आणि त्या देशाने या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपल्या आहेत. याचा आम्हास नितांत गर्व आहे.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈