सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट” हे गाणं मनावर रुंजी घालत होतं. आणि तेव्हाच ‘स्वातंत्र्याची गाथा’, मला डोळ्यासमोर दिसायला लागली. यावर्षी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत आहे.गेल्या 75 वर्षांचा लेखाजोखा पहाण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यासाठी कित्येकजण आपल्या संसारावरच काय,पण आयुष्यावरही तुळशीपत्र ठेवून मृत्यूला सामोरे गेले आहेत. इंग्रजी सत्ता संपुष्टात आणण्यात यश मिळालं, पण तरीही पूर्णविराम झालाच नव्हता.

1947 पर्यंत 600 पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थाने भारतात होती. त्यांना मर्यादित स्वायत्तता असली तरी, सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्याबरोबरच सरंजामशाही संपुष्टात आणून,खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होऊन, अखंड भारत व्हायला हवा, अशी होती. त्यावेळेचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांशी बोलणे करून, त्यांना पटवून, भारतात विलीन करून घेतले. शेवटी काश्मीर 27 ऑक्टोबर 1947 ला,आणि जुनागढ 20 फेब्रुवारी 1948 ला विलीन झाले. शेवटी राहिले ते हैदराबाद संस्थान. 1900 साली एका करारान्वये,ब्रिटिशांचे संरक्षित राज्य म्हणून दर्जा असलेले हैदराबाद संस्थान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते. शिवाय दक्षिण- उत्तर भारताच्या मध्ये, म्हणजे भारताच्या ह्रदय स्थानावर असल्याने,  व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणाचे भाग मिळून हे संस्थान होते.तीनही भाषा तेथे बोलल्या जात होत्या. 85 टक्के लोक हिंदू होते. उरलेले मुसलमान, ख्रिश्चन, अशी विभागणी होती. वल्लभभाई पटेल यांची वर्षभर निजामाबरोबर बोलणी चालू होती. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यापूर्वीच 11 जून 1947 रोजी निजामाने, ” आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही”,अशी घोषणा केली. ‘आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू शकतो ‘, अशी स्वप्ने तो पहात होता. हैदराबादला समुद्रकिनारा नसल्याने, पोर्तुगीजांकडून गोवा आपण विकत घ्यावे व बंदर वापरण्याचे अधिकार मिळवावेत, असे त्याचे प्रयत्न सुरू झाले.

निजाम उल मुल्क म्हणजे जगाचा प्रशासक. ती एक पदवी होती.सात निजामांनी मिळून, दोनशे वर्षे हैदराबादवर राज्य केले. हा शेवटचा निजाम म्हणजे, उस्मान अली खान.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती !. त्याकाळात त्याची संपत्ती 250 अरब अमेरिकी डॉलर, शिवाय सोने, आणि आभूषणांची भांडार होती.स्वतःला तो अहम समजत होता. राज्यकारभारात अल्पसंख्य मुस्लिमांना प्राधान्य देऊन, हैदराबाद इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनावे,यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्या काळात लोकमान्य टिळकांनी शाली बंडा येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत गेली.त्यामुळे जनतेत चेतना निर्माण झाली. हैदराबादची  जनता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा  हा एक भाग समजत होती. राज्यात तिरंगा फडकवता  येत नव्हता. मुल्ला अब्दुल कयूम खानानेही  स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. इतकेच नाही तर,त्याने गणेशोत्सवालाही पाठिंबा दिला होता. रँड खून खटल्यातील चाफेकर यांना सहा महिने हैदराबादला लोकांनी लपवून ठेवले होते. अखेर निजामाच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. न जुमानणाऱ्या ‘ शौकत उल इस्लाम ’ सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू झाली. १८८५ च्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जनमत त्यांच्या बाजूनेच होते.पण निजामाने त्यांच्याविरोधात जायला सुरुवात केली. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. प्रत्यक्ष भूभागातील 40 टक्के भाग जमीनदारांचा, आणि 60 टक्के निजामाचा. प्रत्यक्ष कारभार असा होता. बेहिशोबी सारावसुली, वेठबिगारी पद्धती, राबवून घेणं, शेतकऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणं, जुलूम जबरदस्ती, कर्जफेड न झाल्यास जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणे, हे प्रकार चालू होते. असह्य होऊन अखेर जनता असंतोषाने पेटली. 1946 मध्येच सरंजामशाही विरोधात चळवळ सुरू झाली.  चितल्या ऐलम्मा या नावाच्या एका कर्तबगार स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली. आणि ते नंतर 4000 खेड्यात पसरले. दलित समाजानेही संघटित होऊन चळवळ सुरू केली. जनतेने विलीनीकरणासाठी सशस्त्र आंदोलन व सत्याग्रह करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ,  गोविंद भाई श्रॉफ, नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली,जीवाची पर्वा न करता, संग्राम सुरु केला, व संस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पिंजून काढला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.

क्रमशः....

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments